Next
डाळिंब उत्पादनातून शाश्वत शेतीची ‘नांदी’
‘महिंद्रा’च्या वर्ध्यातील उपक्रमाचे यश
BOI
Wednesday, August 22, 2018 | 04:37 PM
15 0 0
Share this story


मुंबई : वेगाने विकसित होणाऱ्या मात्र अद्यापही कृषिप्रधान असलेल्या भारतासारख्या देशात शेतीला विविध प्रकारच्या अस्मानी आणि सुलतानी संकटांना तोंड द्यावे लागते. या पार्श्वभूमीवर शेतीची शाश्वतता वाढविणे म्हणजेच अनिश्चितता कमी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन महिंद्रा अॅग्री सोल्यूशन्स लिमिटेड कंपनीने शाश्वत शेतीचे मॉडेल उभारण्यासाठी २०१५मध्ये वर्धा येथील नांदी फाउंडेशन या सामाजिक संस्थेशी सहकार्य करार केला होता. त्या प्रकल्पाअंतर्गत पीकपद्धतीत बदल करून लागवड करण्यात आलेल्या डाळिंबाचे पहिले उत्पादन नुकतेच हाती आले असून, त्याला विक्रमी किंमत मिळाली आहे. 

‘वर्धा फॅमिली फार्मिंग प्रोजेक्ट’ (डब्लूएफएफपी) २०१५मध्ये सुरू करण्यात आला. शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देईल, अशा शाश्वत शेतीसाठी शेतकऱ्यांना मदत करणे, हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी आवश्यकतेनुसार पीकपद्धतीत बदलही केले जात आहेत. वर्ध्यातील कापूस उत्पादक गावांपैकी ७९ गावांमधील अंदाजे एक हजार एकरवर पारंपरिक कापूस पिकाऐवजी डाळिंबाची लागवड करण्यात आली. कापसावर येत असलेल्या विविध किडी-रोग यांमुळे, तसेच अन्य कारणांमुळे त्या पिकापासून मिळणाऱ्या उत्पादनाची शाश्वतता कमी झाली होती आणि पर्यायाने उत्पन्न कमी झाले होते. त्यामुळे त्याऐवजी अधिक उत्पादन देणाऱ्या डाळिंब पिकाची लागवड करण्याची शिफारस त्यांना करण्यात आली आणि तशी लागवड करण्यात आली. या वर्षी मे ते जुलैदरम्यान डाळिंबाचे पहिले उत्पादन मिळाले आहे. प्रकल्पाच्या अडीच वर्षांच्या काळात, शेतकऱ्यांचे उत्पन्न शून्यापासून प्रति एकर अंदाजे साठ हजार रुपयांपर्यंत वाढण्यास मदत झाली. ‘महिंद्रा’ व ‘नांदी’ यांच्या या उपक्रमामुळे अंदाजे ७५० शेतकरी कुटुंबांना फायदा झाला असून, त्यांना उत्पन्नाचा शाश्वत स्रोत मिळाला आहे.

जमिनीची मशागत, पिकांसाठी ठिबक सिंचन व्यवस्था बसवणे, कुंपण घालणे व आंतरपिके घेणे, बायो-डायनॅमिक फार्मिंग करणे व क्षमताविकास अशा अनेक टप्प्यांचा या प्रकल्पात समावेश आहे. महिंद्रा अॅग्री सोल्यूशन्स लिमिटेड (एमएएसएल) ही ‘महिंद्रा अँड महिंद्रा’ची संपूर्ण मालकीची उपकंपनी असून, या प्रकल्पासाठी कार्यक्षम व शाश्वत मार्केट लिंकेज निर्माण करण्यासाठी ती महत्त्वपूर्ण काम करते.

‘महिंद्रा अॅग्री सोल्यूशन्स लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शर्मा म्हणाले, ‘महिंद्राचा भारतातील शेतकऱ्यांशी दीर्घ कालावधीपासून संबंध आहे. शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा चांगला स्रोत निर्माण करणे व त्यांना शाश्वत शेतीद्वारे सुरक्षित रोजगार मिळवण्यासाठी मदत करणे, हे वर्धा फॅमिली फार्मिंग प्रोजेक्ट सुरू करण्यामागील उद्दिष्ट आहे. शेतकऱ्यांची भरभराट करतील असे आणखी काही उपक्रम राबवण्याची प्रेरणा आम्हाला डाळिंब पिकाच्या पहिल्या उत्पन्नामुळे मिळाली आहे. आता तिसऱ्या टप्प्यामध्ये, शेतकऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाची माहिती पुरवून त्यांच्या उत्पन्नात व उत्पादकतेमध्ये वाढ करणे, हे आमचे लक्ष्य आहे.’

नांदी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज कुमार म्हणाले, ‘आरकू कॉफी प्रकल्पाप्रमाणे, ‘नांदी’ने मांडलेल्या बऱ्याचशा गोष्टी आधी अशक्य वाटतात. त्यामुळे, वातावरणातील बदलांमुळे निर्माण झालेली आव्हाने व शेतीविषयक समस्या यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या वर्धा या विदर्भातील भागामध्ये शेकडो लहान शेतकरी कुटुंबांना एकत्र आणणे आणि त्यांना जागतिक दर्जाच्या सेंद्रिय डाळिंबांचे उत्पादन घेण्यासाठी शेतीचे नवे, परिवर्तनशील शाश्वत स्वरूप समजून सांगणे, हे निश्चितच आव्हानात्मक होते. सुदैवाने, महिंद्रा समूहाने भारतीय शेतीसाठी हा पूर्णतः नवा असलेला प्रकार प्रत्यक्षात साकारण्यासाठी आम्हाला मोठी मदत केली. तीन वर्षांहून कमी काळामध्ये, पर्जन्यछाया असलेल्या भूप्रदेशामध्ये आमचा प्रकल्प म्हणजे वाळवंटामध्ये सापडणाऱ्या मृगजळाप्रमाणे ठरला आहे. शेतकऱ्यांना डाळिंब पिकाचे पहिले उत्पादन चांगले मिळाले असून, त्याची विक्रमी किंमत मिळाली असल्याने ते आनंदी आहेत. ‘रेड रुबीज रिव्होल्युशन’ नुकतीच सुरू झाली आहे आणि भारतातील शेतीच्या पुनरुत्थानामध्ये वर्धा हे केंद्र असेल, असे आम्हाला वाटते.’

महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा, इन्फोसिसचे सह-संस्थापक सेनापती बाळकृष्णन, ‘डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज’चे अध्यक्ष के. सतीश रेड्डी व सोमा एंटरप्राइज लिमिटेडचे अध्यक्ष एम. राजेंद्र प्रसाद असे उद्योजक ‘नांदी’च्या संचालक मंडळामध्ये ट्रस्टी आहेत. या अंतर्गत चारशेहून अधिक पूर्ण वेळ प्रोफेशनल्स आणि अंदाजे पाच हजार विकास कार्यकर्ते सोळा राज्यांत कार्यरत आहेत. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
ढाकणे शिवाजी कारभारी About 178 Days ago
मलाही डाळींब शेतीत तुमच्या कडे सहभागी होता येईल का ?
0
0

Select Language
Share Link