Next
तृतीयपंथीय सरपंचांचा आश्वासक प्रवास
माधुरी सरवणकर
Monday, May 21, 2018 | 04:44 PM
15 0 0
Share this story

ज्ञानेश्वर कांबळे ऊर्फ माऊलीगडद मेकअप, भडक वेशभूषा करून सार्वजनिक ठिकाणी विशिष्ट पद्धतीने टाळी मारून पैसे मागणाऱ्या तृतीयपंथीयांकडे समाज किळस, घृणा, थट्टा किंवा फार फार तर कुतुहलाच्या नजरेने पाहतो. काही काळापूर्वी मुख्य प्रवाहापासून वंचित असलेल्या या समाजाने मोठा संघर्ष करून विविध क्षेत्रात स्वत:चे अस्तित्व निर्माण करण्यासाठी पावले उचलली आहेत. स्वकर्तृत्वाने एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या तृतीयपंथीयांपैकी एक म्हणजे ज्ञानेश्वर कांबळे ऊर्फ माऊली. सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील तरंगफळ गावच्या सरपंच असलेल्या माऊली या भारतातील पहिल्या तृतीयपंथीय सरपंच आहेत. पुण्यात नुकत्याच झालेल्या त्यांच्या सत्काराच्या पार्श्वभूमीवर त्यांची ही विशेष मुलाखत...
...

-   तृतीयपंथीय असल्याची पहिली जाणीव तुम्हाला कधी झाली?

-  माझा जन्म मुलगा म्हणून झाला होता. वयात येताच मला महिलांसारखे राहायला व वावरायला आवडायला लागले. वाढत्या बायकी हावभावांमुळे शाळेत माझे हसू होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे सातवीपर्यंत कसेबसे शिक्षण घेतले. पुढे मी तृतीयपंथीय असल्याची जाणीव झाली. घरच्यांना माझा स्वीकार करणे तसे कठीण होते. गावातील लोकसुद्धा विचित्र नजरेने पाहायचे. या सगळ्या कारणांमुळे मी वयाच्या १५व्या वर्षीच घर सोडले. आई-वडिलांची सेवा करण्यासाठी मी १२ वर्षांनंतर पुन्हा घरी परतलो.

-  राजकारणात प्रवेश घेण्याचा निर्णय केव्हा व कसा घेतलात?

-  माझ्या घरात राजकारणाची पार्श्वभूमी आहे; मात्र राजकारणात येण्याची माझी इच्छा नव्हती. मी  राजकारणात पदार्पण करावे, अशी गौरी सावंत यांची इच्छा होती. तृतीयपंथीय व स्त्री-पुरुष यांच्यात भेद नसल्याचे पंतप्रधान मोदी यांचे वक्तव्य ऐकले. त्यातून प्रेरणा घेऊन मी राजकारणात पाऊल टाकले.

-  तुम्ही निवडणूक लढवणार असल्याचे कळताच कशा प्रतिक्रिया उमटल्या?

- एक तृतीयपंथीय निवडणूक लढवणार म्हटल्यावर विरोध होणारच होता. माझे मनोबल कमी करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. अनेकांनी खिल्ली उडवली. सरपंच होण्यापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. मी गावात समाजकार्य केल्याने नागरिकांनी विरोध केला नाही. मी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला होता. समाजकार्याची आवड व लोकांनी ठेवलेल्या विश्वासामुळे इथपर्यंत पोहोचू शकलो.

-  सरपंच झाल्यावर तुमच्याकडे पाहायचा लोकांचा दृष्टिकोन बदलला का?

-  आधी लोक बोलायलाही घाबरायचे; मात्र आता लोक माझ्यासोबत ‘सेल्फी’ घेतात. देशभरात माझे कौतुक झाले. मला मिळालेल्या यशामुळे तृतीयपंथीयांना प्रेरणा मिळाली.

-  सरपंच झाल्यावर गावात कोणती कामे केलीत?

-  शासनाच्या विविध योजना नागरिकांना माहीत नव्हत्या. मी विविध योजनांची माहिती तळागाळातील घटकांपर्यत पोहोचवून गावामध्ये समाजोपयोगी उपक्रम राबवण्यास सुरुवात केली. गोरगरीब स्त्रियांना आधार कार्ड मिळवून देणे, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ मदत योजना यांसारख्या शासकीय योजनांचा लाभ अनेक लोकांना मिळवून दिला. आता गावातील रस्ता बांधण्याचे काम चालू आहे. समाजोपयोगी कार्यांमुळे माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत गेला. आता मुख्यमंत्र्यांनी माझे गाव दत्तक घेतले आहे.
 
-  दुसरीकडे तुम्ही तृतीयपंथीयांच्या मागण्यांसाठीही लढत आहात...

-  लोकांनी आमचा स्वीकार करावा यासाठी आम्ही अनेक वर्षांपासून प्रयत्नशील आहोत. आमच्याबद्दलचे समज-गैरसमज दूर करून लोकांनी माणूस म्हणून आमचा स्वीकार करावा. नोकरीत आरक्षण मिळावे. योग्य आरोग्यसेवा मिळाव्यात, सरकारी पेन्शन मिळावे, तसेच स्वतंत्र ओळख मिळावी, अशा आमच्या मागण्या आहेत.

-  तुमचे पुढील ध्येय काय आहे?

-  तृतीयपंथीय व्यक्तीही आमदार व खासदार झाल्या पाहिजेत. संधी मिळाली, तर आमदार बनण्याचीही माझी इच्छा आहे. आमच्या समाजाचे प्रश्न गंभीर आहेत. आमदार किंवा खासदार झाल्यास आमचे प्रश्न सरकारकडे मांडणे सोपे होईल. सत्ता असली की अनेक गोष्टी सोप्या होतात.

पुण्यात विशेष सत्कार

विविध क्षेत्रांत मोलाची कामगिरी केलेल्या १० तृतीयपंथीयांच्या सत्काराचे आयोजन रविवारी (२० मे २०१८) पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात करण्यात आले होते. या वेळी माऊली कांबळे यांच्यासह तृतीयपंथीय अनाथ आश्रमाचे गुरू रंजिताबाई नायक, निर्भया आनंदी जीवन संस्थेच्या चांदणी गोरे, समाजसेविका सोनाली दळवी, पन्ना गुरू, संचिता पाटील, ऐश्वर्या, दिशा शेख, रेशमा पुणेकर, प्रेरणा वाघेला आदींचा सन्मान पुण्याचे उपमहापौर सिद्धार्थ धोंडे यांच्या हस्ते करण्यात आला. सन्मानचिन्ह, पैठणी साडी असे पुरस्काराचे स्वरुप होते. या प्रसंगी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले, रूपाली पाटील-ठोंबरे आदी मान्यवर उपस्थित होते.

(कार्यक्रमाचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link