Next
‘त्यांना’ घडली ‘मर्सिडीज’मधून सफर...
BOI
Tuesday, August 14, 2018 | 05:25 PM
15 0 0
Share this article:

पुणे : जगातील सर्वांत दिग्गज कंपनीची आलिशान अशी चकचकीत, लांबलचक कार मुलांसमोर उभी होती. काय बघू आणि काय नको असे त्यांना झाले होते. त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. आलिशान ‘मर्सिडीज बेंझ’मध्ये बसून त्यांना फेरीही मारायची होती. लाइफस्कूल फाउंडेशनच्या ‘कीप मूव्हिंग मूव्हमेंट’ उपक्रमांतर्गत नुकतेच पुणे महापालिकेच्या शाळेतील ४० गुणवंत विद्यार्थ्यांना ‘मर्सिडीज बेंझ’मधून फेरी मारण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्या चेहऱ्यावरून उत्साह, आनंद ओसंडून वाहत होता.

हे दृश्य होते मुंबई-बेंगळुरू महामार्गावरील बी. यू. भंडारी मर्सिडीज बेंझ शोरूममधले. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना येथे आमंत्रित करण्यात आले होते. सर्वोत्तम गुणांचा विक्रम मोडणाऱ्या विद्यार्थ्यांना नव्या कोऱ्या मर्सिडीज बेंझमधून सफर घडवून आणण्यात आली. त्यांच्या स्वागतासाठी, त्यांचे कौतुक करण्यासाठी अनेक मान्यवर आवर्जून उपस्थित होते. यामध्ये ‘थरमॅक्स ग्लोबल’च्या मेहर पदमजी, ‘बी. यू. भंडारी’चे चंद्रवदन भंडारी, देवेन भंडारी, ‘लाइफस्कूल फाउंडेशन’चे संचालक नरेंद्र गोईदानी, विकास भंडारी, कुलदीप रुचंदानी, राज मुछाल, भारती गोईदानी यांचा त्यात समावेश होता. 

आपल्या मुलांचा होणारा हा कौतुक सोहळा पाहून, बेताची आर्थिक परिस्थिती असतानाही केवळ मुलांनी चांगले शिक्षण घ्यावे यासाठी रात्रंदिवस कष्ट करणाऱ्या आई-वडिलांचे डोळे पाणावले. शैक्षणिक गुणवत्तेच्या जोरावर जगातील कोणतीही गोष्ट अशक्य नसते, याचीच प्रचिती विद्यार्थ्यांनी घेतली आणि अतिशय जिद्दीने शिकून यशस्वी होणार असे आश्वासन त्यांनी उपस्थितांना दिले. या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यातही आले.

‘लाइफस्कूल फाउंडेशन’च्या ‘कीप मूव्हिंग मूव्हमेंट’ या उपक्रमांतर्गत पुण्यातील महानगरपालिकेच्या विविध शाळांमध्ये तीन महिन्यांत सात मार्गदर्शन सत्रे घेतली जातात. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, ध्येयवाद, प्रेरणा निर्माण व्हावी या दृष्टीने त्यांना शिकविले जाते,  जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मकता निर्माण होईल. या विद्यार्थ्यांमधील सर्वोत्तम विद्यार्थ्यांना मर्सिडीज बेंझमधूर फिरण्याची संधी मिळते. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. 

या वेळी मेहेर पदमजी म्हणाल्या, ‘विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांची महत्त्वाची भूमिका असते. विद्यार्थ्यांमध्ये एखाद्या गोष्टीबद्दल आवड निर्माण करण्याचे काम शिक्षक करू शकतात. विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळाले म्हणजे त्यांनी डॉक्टर किंवा इंजिनीअरच व्हायला हवे असे नाही. शिक्षणानंतर मुलांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात काम करू द्या. त्यांची स्वप्ने त्यांना जगू द्या. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाच्या जोरावर यश मिळवावे.’

नरेंद्र गोईदानी म्हणाले, ‘महानगरपालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असते. परंतु या विद्यार्थ्यांमध्येदेखील यशस्वी होण्यासाठीचे सर्व गुण आहेत. योग्य मार्गदर्शनाने त्यांचे आयुष्य बदलू शकते.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search