Next
‘मल्लखांबा’तली लक्षवेधी खेळाडू
BOI
Friday, June 01, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this story

मिताली सोमणदोरीवरचा मल्लखांब हा भारताचा खऱ्या अर्थाने पारंपरिक खेळ. या खेळाला राजमान्यता नसली, तरी त्याकडे आकर्षित होत आजवर अनेक खेळाडूंनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे.... ‘क्रीडारत्ने’ सदरात आज पाहू या मल्लखांब हा पारंपरिक खेळ खेळणारी खेळाडू ‘मिताली सोमण’बद्दल..
...............................
वयाच्या सहाव्या वर्षी केवळ गंमत म्हणून मल्लखांब या खेळाची प्रात्यक्षिके पाहायला मिताली तिच्या पालकांबरोबर एका मैदानावर गेली आणि तेव्हापासून तिला या खेळाबद्दल आवड निर्माण होऊ लागली. त्याच वर्षीपासून ती हट्ट धरून बसली, की मला हाच खेळ खेळायचा आहे. मग तिच्या पालकांनी मितालीला श्री स्वामी समर्थ अकादमीत घातले. सध्या ती अकादमीबरोबरच पुण्यातील परांजपे शाळेतील मैदानावर राष्ट्रीय खेळाडू रूपाली मडके यांच्याकडे सराव करत आहे. ती आता अकरा वर्षांची असून न्यू इंडिया स्कूलमध्ये पाचव्या इयत्तेत शिकत आहे.

आंतरक्लब स्पर्धा, महापौर करंडक स्पर्धा यांच्या जोडीला ती दहा आणि बारा वर्षांखालील गटाच्या स्पर्धेतही सहभागी होत प्रगती करत आहे. शारीरिक तंदुरुस्ती, हाताच्या स्नायूंची मजबूत पकड आणि दोरीवर शरीराचा तोल सांभाळत विविध प्रात्यक्षिके ती लिलया करते. पुण्यातील संस्कृती विद्यालयात तसेच विविध स्पर्धांच्या ठिकाणी हा खेळ लोकप्रिय व्हावा, त्याचा प्रसार व्हावा म्हणून अकादमीतर्फे प्रात्यक्षिके आयोजित केली जातात, त्यात मिताली सातत्याने लक्षवेधी ठरली आहे.

शिक्षणाच्या बाबतीतही ती तेवढीच गंभीर आहे. येत्या मोसमात ती राज्यस्तरीय पात्रता स्पर्धेतही सहभागी होणार आहे. या स्पर्धेत तिची कामगिरी सरस झाली तर ती मुख्य राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरेल आणि तिच्यातील खेळाचे कौशल्य आणि तिच्या कर्तृत्वाला मोठे व्यासपीठ मिळेल. तिच्या आई आदिती सोमण यादेखील माजी कबड्डीपटू असल्याने मितालीला त्यांचा विशेष पाठिंबा लाभत आहे. या खेळात कारकीर्द घडली, तर तिच्या पालकांचे प्रयत्न आणि पाठिंबा सत्कारणी लागला असे म्हणता येईल.

एक किंवा दोन सेंटिमीटर जाड आणि साडेपाच मीटर लांब दोरीवर हा खेळ खेळला जातो. मिताली जेव्हा या खेळासाठी सराव करू लागली, तेव्हा प्रथम तिला जमिनीवरील योगा आणि इतर विविध आसने शिकावी लागली. कोणत्याही खेळाडूला एकदमच दोरीवरचा सराव करणे शक्य नसते. त्यासाठी हातांची पकड घट्ट व्हावी लागते, स्नायू मजबूत व्हावे लागतात. तिने जेव्हा सराव सुरू केला, तेव्हा ती खुपच लहान होती. म्हणून तिच्या प्रशिक्षकांनी आधी तिच्या तंदुरुस्तीकडे जास्त लक्ष दिले. योगाचा भरपूर सराव करून घेतला आणि मगच तिला हे कौशल्य आता दोरीवर करण्यासाठी प्रोत्साहित केले.

दोन्ही पायांच्या अंगठ्यामध्ये व दोन्ही किंवा कधी एकाच हाताने ही दोरी धरून त्यावर नियंत्रण ठेवत विविध आसने केली जातात. जमिनीत उभा केलेला लाकडी मल्लखांब जसा पुरूष खेळाडूंचा मानला जातो तसाच दोरीवरचा मल्लखांब हा मुख्यत्वे मुलींचा खेळ म्हणून ओळखला जातो. भारतीय मल्लखांब महासंघ दरवर्षी या खेळाच्या स्पर्धा आयोजित करतो. सर्वात पहिली स्पर्धा पंचवीस वर्षांपूर्वी खेळवली गेली होती, मात्र त्यावेळी याकडे खेळ म्हणून पाहण्याची दृष्टी लोकांकडे नव्हती.  आता महासंघाकडून बारा, चौदा, सोळा आणि अठरा वर्षांखालील वयोगटात पुरूष आणि महिला अशा दोन्ही वर्गांत या स्पर्धा आयोजित केल्या जातात.

स्पर्धांच्या आयोजनाचे प्रमाण कमी असले, तरी या खेळाची वाढती लोकप्रियता लक्षात घेता येत्या काळात स्पर्धा वाढतील व मितालीसारख्या खेळाडूंना जास्तीत जास्त स्पर्धा खेळायला मिळतील. महासंघाव्यतिरिक्त राज्यातील व पुण्यातील काही शाळा, महाविद्यालये व क्लब, वैयक्तिक पातळीवर या खेळाच्या स्पर्धा आयोजित करतात. त्यातील शालेय गटातील स्पर्धेत मितालीची कामगिरी पहिल्या क्रमांकाची नसली, तरी पहिल्या तीन खेळाडूंत ती सातत्याने स्थान टिकवून आहे. आता येत्या काळात तिसऱ्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकापर्यंत प्रगती करण्याचे तिचे ध्येय आहे आणि त्यासाठीच तिचा कसून सराव सुरू आहे. अमेरिकेतही लोकप्रिय झालेल्या या खेळाला आपल्याकडेही अच्छे दिन येतील अशी आशा आहे.  

या खेळात सहभागी होणारे खेळाडू मुख्यत्वे शारीरिक तंदुरूस्ती टिकावी यासाठी येतात. त्यांचा मुख्य खेळ वेगळाच असतो. मितालीचे तसे नाही. तिला या खेळाची आवड आहे आणि पालकांच्या पाठिंब्यामुळे विविध स्पर्धा खेळण्याची सवडही आहे. त्यामुळे येत्या काळात ती निश्चितच नावारूपाला आलेली पाहायला मिळेल.
मिताली केवळ दोरीवरचा मल्लखांब खेळते असे नाही, तर ती जेमतेम अकरा वर्षांची असूनही तिला चतुरस्र व्यक्तिमत्त्व लाभले आहे. ती भरतनाट्यमदेखील शिकत आहे आणि त्याच्या जोडीला तिने गाण्याच्या तीन परीक्षाही दिल्या आहेत.  अभ्यासातही ती हुशार आहे, स्लॉलरशिप मिळवते. यंदाच्या मोसमात ती किती स्पर्धा गाजवते आणि भविष्यात काय काय मिळवते, याची उत्सुकता आपल्या सर्वांनाच आहे. एक मात्र निश्चित, की तिचा प्रवास एक सामान्य खेळाडू ते एक असामान्य खेळाडू बनण्याकडे सुरू झालेला आहे.

मल्लखांबाचा इतिहास पाहता पेशवे काळापासून या खेळाला राजाश्रय आहे. अगदी झांशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, नाना साहेब इतकेच नव्हे तर बाजीराव पेशवे यांनीही हा खेळ आत्मसात केल्याचे व त्यातून शारीरिक तंदुरूस्ती टिकवल्याचे दाखले मिळालेले आहेत. मितालीसारख्या असंख्य मुली या खेळाकडे अधिकाधिक आकर्षित झाल्या, यशस्वी झाल्या, तर या खेळाला राजश्रयाबरोबरच लोकाश्रयही मिळेल.

- अमित डोंगरे
ई-मेल : amitdongre10@gmail.com

(लेखक पुण्यातील मुक्त क्रीडा पत्रकार आहेत. क्रीडारत्ने सदरातील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Fot1VH या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link