Next
‘नाटकाचं ओपनिंग करायचं, तर बालगंधर्व रंगमंदिरातच’
प्रसन्न पेठे (Prasanna.pethe@myvishwa.com)
Tuesday, June 27 | 06:00 PM
15 0 0
Share this story

भालचंद्र पानसे ऊर्फ अण्णा हे पुण्यातले एक ज्येष्ठ नाट्यनिर्माते, दिग्दर्शक आणि कलाकार!! १९६८ सालापासूनच बालगंधर्व रंगमंदिराशी कायम संबंध असलेले हे बुजुर्ग व्यक्तिमत्त्व. ‘नाटकाचं ओपनिंग करायचं, तर ते ‘गंधर्व’मध्येच,’ अशी बहुसंख्य पुणेकर रंगकर्मींप्रमाणेच अण्णांचीही भावना आहे!
..................
अण्णा पानसे यांच्या मते बालगंधर्व रंगमंदिर म्हणजे सर्वांत आदर्श नाट्यगृह.  त्यासाठी ‘पुलं’च्या दूरदृष्टीचं कौतुक करावं तितकं थोडंच, असं ते म्हणतात. ‘त्याचं सर्वांत महत्त्वाचं कारण हे होतं, की ‘पुलं’ हे स्वतः उत्तम रंगकर्मी होते. त्यामुळे त्यांना नाटकाच्या सर्व अंगांची संपूर्ण माहिती होती आणि त्यामुळे रंगमंच, प्रकाशयोजना, ध्वनी, रंगभूषा इथपासून ते सेट्स आणि प्रॉपर्टी रंगमंचावर सहज आणण्यासाठी आणि ठेवण्यासाठी भरपूर जागा, इथपर्यंचा कुठलाही बारीकसारीक तपशील त्यांच्या नजरेतून सुटला नाही. ‘गंधर्व’च्या रंगमंचाखाली सामान ठेवण्यासाठी प्रशस्त गोडाउन्स आहेत,’ असं पानसे यांनी सांगितलं.

‘त्या वेळी ‘गंधर्व’चे व्यवस्थापक अत्यंत आत्मीयतेने संपूर्ण नाट्यगृहाच्या कानाकोपऱ्यात फिरून व्यवस्था बघत असत. प्रेक्षागृहाची स्वच्छता, टापटीप उत्तम राखली जाई. त्या वेळी प्रेक्षकांमध्ये त्या वेळच्या कितीतरी सेलेब्रिटी व्यक्ती येत असत. ग. दि. माडगूळकर, सी. रामचंद्र, विठ्ठल तुपे, उल्हास पवार, मामा तोरडमल, शंकर पाटील असे दिग्गज प्रेक्षकांमध्ये असत,’ अशा आठवणी पानसे यांनी सांगितल्या.

पुण्यातल्या सर्व रंगकर्मींचं ‘गंधर्व’ हे आवडीचं ठिकाण होतं आणि गप्पा मारायलाही बहुतेक जण तिथेच पडीक असत. अण्णा पानसे यांनी ‘हयवदन’सारख्या स्पर्धेच्या नाटकापासून आणि ‘ऐक जन्मेजया’ या आदिरंगाचार्यांच्या, मानवी आयुष्यातल्या तीन अवस्थांवर (अंतरंग, बाह्यरंग आणि रणरंग) भाष्य करणाऱ्या, वेगळ्या धर्तीच्या नाटकापासून ते सुपरहिट फार्सिकल कॉमेडी ‘कुर्यात सदा टिंगलम्’सारख्या सुमारे ३५ नाटकांची निर्मिती/दिग्दर्शन केलं आहे आणि त्यांच्या प्रत्येक नाटकाचा शुभारंभ हा 'गंधर्व' मधेच झाला आहे. ‘रखेली’सारखं काहीसं बोल्ड नाटक, ज्यात अरुण सरनाईक, आशा पोतदार यांसारखे बडे कलाकार होते, त्याचाही शुभारंभाचा आणि शंभरावा प्रयोग ‘गंधर्व’मध्येच झाला होता. ‘त्या वेळी 'गंधर्व' मध्ये राहण्याची व्यवस्था इतकी सुंदर होती, की अरुण सरनाईकसारखे बडे कलाकार तिथेच उतरत असत. नवीन नाटकांची डिस्कशन्स तिथेच करत असत. ‘गंधर्व’मध्ये नाटकानंतर नाटक कलावंतांची आणि इतर आर्टिस्टची जेवणाची उत्तम सोय विवेक जोशी यांच्यातर्फे केली जात असे,’ असंही पानसे यांनी सांगितलं. 

अण्णा पानसे यांच्या सर्वांत हिट नाटकाची एक गमतीदार आठवणही त्यांनी सांगितली!! ‘कुर्यात सदा टिंगलम्’ नाटकाच्या ४२५व्या प्रयोगानिमित्त त्यांनी वर्तमानपत्रात जाहिरात केली होती, की रात्री साडेनऊ वाजता या नाटकाचा एक प्रयोग ‘गंधर्व’मध्ये होईल आणि त्याच वेळी दुसरा प्रयोग ‘टिळक स्मारक’मध्येही होईल. दोन्ही ठिकाणी शम्मी कपूर उपस्थित राहतील, असंही त्या जाहिरातीत लिहिलं होतं! पुणेकर आचंबित झाले होते, की हे नक्की कसं काय करणार! त्या रात्री दोन संचांत (एकीकडे प्रमुख भूमिकेत स्वरूपकुमार आणि दुसरीकडे प्रमुख भूमिकेत मोहन जोशी) अशी विभागणी केली होती. नाटकाची सर्व प्रॉपर्टीही दुसऱ्या ठिकाणासाठी नव्याने घेतली होती. शम्मी कपूर यांनी अगदी बालपणापासून पृथ्वीराज कपूर यांच्या ‘पृथ्वी थिएटर्स’मधून हिंदी नाटके केली असल्याने त्यांनी नाटकांच्या प्रेमापोटी आनंदाने दोन्हीकडे हजेरी लावली होती. ‘गंधर्व’मध्ये विंगेतून अर्धे नाटक बघितल्यावर त्यांनी ‘टिळक’ला जाऊन तोपर्यंत तिथे सुरू झालेल्या नाटकाचा पुढचा अंक तिथे पाहिला होता (सामानाच्या लिफ्टने वर जाऊन!) आणि नंतर त्या अद्भुत प्रकाराविषयी त्यांनी असे उद्गार ही काढले होते, ‘कमाल है. ऐसा कभी पहले देखा नही था. वही स्टोरी, लेकीन आधा हिस्सा एक थिएटरमें और दुसरा हिस्सा दूसरे थिएटरमें....!!’ 

अण्णा पानसे यांनी या निमित्ताने त्या काळच्या यशवंत दत्त, रवींद्र मंकणी, आशू, चंद्रकांत गोखले, सुमन धर्माधिकारी, मंगेश तेंडुलकर यांसारख्या अनेक कलाकारांबरोबरच्या आठवणींनाही उजाळा दिला.

(पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिराचं सुवर्णमहोत्सवी वर्ष २६ जून २०१७ रोजी सुरू झालं. त्या निमित्तानं, या रंगमंदिराशी निगडित असलेल्या अनेक मान्यवरांच्या आठवणींचा खजिना ‘गंधर्वनगरीची पन्नाशी’ या विशेष लेखमालेद्वारे ‘बाइट्स ऑफ इंडिया’ उलगडत आहे. या लेखमालेतले सगळे लेख एकत्रितरीत्या या लिंकवर उपलब्ध असतील.) 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link