Next
सफर म्हैसूरची – भाग दोन (वृंदावन)
BOI
Wednesday, October 03, 2018 | 06:45 AM
15 1 0
Share this article:

वृंदावन उद्यान
‘करू या देशाटन’ या सदरात कर्नाटकातील म्हैसूर या निसर्गरम्य जिल्ह्याची सफर आपण करतो आहोत. म्हैसूर सफरीच्या दुसऱ्या भागात आज फेरफटका वृंदावनचा...
.........
वृंदावन उद्यानाशिवाय म्हैसूर ट्रिप पूर्ण होत नाही. वृंदावन उद्यान हे म्हैसूर जिल्ह्यात नसून, मंड्या जिल्ह्यात आहे; पण म्हैसूरपासून वृंदावनचे अंतर फक्त २० किलोमीटर आहे. हे सर्वांचे आवडते ठिकाण असल्याने वृंदावन उद्यानापासूनच सुरुवात करू. उद्यानाची माहिती घेण्यापूर्वी कृष्णराज सागर धरणाची माहिती घेणे आवश्यक आहे.

कृष्णराज सागर
१८७५च्या सुमारास पडलेल्या दुष्काळामुळे मंड्या भागातील एक पंचमांश जनतेला प्राणांतिक झळ बसली होती. तेव्हापासून यावर उपाय शोधण्यासाठी म्हैसूर सरकारचे प्रयत्न सुरू होते. त्या वेळचे मुख्य अभियंता डॉ. विश्वेश्वरय्या यांनी याबाबत कावेरी योजनेचा प्रस्ताव मांडला होता. अनेक विरोध बाजूला सारून म्हैसूर सरकारचे दिवाण आनंद राव व कृष्णराज वाडियार चौथे यांनी या योजनेला गती दिली. ११ ऑक्टोबर १९११ रोजी आदेश प्राप्त होऊन बांधकाम सुरू झाले. या गोष्टीला आता १०७ वर्षे होत आहेत.धरणाचे काम १९३१ साली पूर्ण झाले. हे धरण १३१ फूट उंच व ८६०० फूट लांबीचे आहे. १९२० साली वृंदावन उद्यानासाठी धरणात खास व्हॉल्व्ह बसवून घेण्यात आला. कृष्णराज वाडियार चौथे यांच्या स्मरणार्थ या धरणाचे ‘कृष्णराज सागर’ असे नामकरण करण्यात आले. कृष्णराज वाडियार चौथे हे अतिशय लोकाभिमुख राजे होते. आपण म्हैसूरमध्ये आज बघतो त्यापैकी अनेक इमारती त्यांच्या ५० वर्षांच्या कारकिर्दीत उभ्या राहिल्या. त्या वेळच्या जगातील श्रीमंत लोकांत त्यांची गणना होत असे. त्यांच्या कारकिर्दीत म्हैसूरमध्ये अनेक उद्योग, शैक्षणिक संस्था उभ्या राहिल्या. ते संगीतप्रेमी तर होतेच; पण ते स्वतः बासरी, व्हायोलिनसह आठ प्रकारची वाद्ये वाजवायचे. स्टेट बँक ऑफ म्हैसूरही त्यांच्या कारकिर्दीतच स्थापन झाली.

सर मिर्झा इस्माइलवृंदावन उद्यान कावेरी नदीवरील कृष्णसागर धरणाच्या खालील बाजूला आहे. म्हैसूरचे दिवाण सर मिर्झा इस्माइल यांच्या कल्पनेतून हा प्रसिद्ध बगीचा साकारला. मुघल शैलीतील काश्मीरच्या शालिमार गार्डनच्या डिझाइनवर आधारित असलेले हे उद्यान आहे. १९२७मध्ये बांधकाम विभागाने तीन टप्पे (स्टेप्स) करून ६० एकर क्षेत्रावर हे उद्यान उभारले आहे. कृष्णसागर धरणाच्या पाण्याच्या उच्च दाबाचा वापर करून धरणाचे पाणी बागेत खेळविले आहे. बोगनवेलीच्या निरनिराळ्या रंगांच्या झाडांमुळे याची शोभा खुलून दिसते. डेडोनियाच्या झाडांचे वेगवेगळ्या आकारात प्रुनिंग करून आकर्षक प्राणी, छत्र्या बनविल्या आहेत. संपूर्ण बागेमध्ये हिरवेगार लॉन बनविण्यात आले आहे. रंगीत चेकर्ड फरश्या बसविलेले पदपथ, विश्रांतीसाठी बाके आहेत. धरणाच्या पाण्याच्या दाबावर चालणारी कारंजी, त्यावर सोडलेले प्रकाशझोत आणि तालबद्ध संगीत यामुळे हे उद्यान पर्यटन क्षेत्रात अधिकच वैशिष्ट्यपूर्ण आहे.

वृंदावन उद्यान मुख्य गेटवृंदावन उद्यान मुख्य गेट, उत्तर वृंदावन, दक्षिण वृंदावन आणि चिल्ड्रेन गार्डन या चार उद्यानांत विभागले आहे. इंडिया गेटच्या धर्तीवर असणारे प्रवेशद्वार व पुढे पहिला भाग असून, त्यात दोन्ही बाजूला गुलाबवाटिका आहेत. आकर्षक लॉन, बारमाही फुलांची झाडे, तसेच सजावटीची फुलझाडे येथे पाहता येतात.

दक्षिण वृंदावन हे प्रसिद्ध कावेरी मूर्तीजवळील भागात आहे. येथे एक काचघर असून, तेथे सजवटीची नाजूक फुले पाहायला मिळतात. कावेरी सर्कलमध्ये पाण्याची कारंजी आहेत. सायपेरस वनस्पती आणि इतर पुष्पवर्गीय झाडे-झुडपे टेरेसवर वाढतात आणि संध्याकाळच्या वेळी खूपच आकर्षक दिसतात. पर्यटक येथे रोपांची खरेदी करू शकतात. दक्षिण वृंदावनमध्ये सजावटीच्या वनस्पती असलेले काचेचे घरदेखील आहे. पर्यटक येथे काही खरेदीदेखील करू शकतात.

उत्तर वृंदावन चार विस्तृत टेरेसमध्ये विभागले केले आहे. त्यामध्ये विस्तृत लॉन्स, सजावटीची बारमाही फुले आणि सुगंधी झाडांच्या रांगा आढळतात. टेरेस गार्डन्समधील कारंजी विद्युत प्रकाशझोतांनी सायंकाळी उजळून निघतात. मुख्य धरणाच्या रस्त्याच्या समांतर असलेल्या मार्गावर साग, पाम वृक्ष लावलेले आढळतात. बोगनवेल, बदाम, बिग्नोनिया बागेच्या दोन्ही बाजूंच्या मार्गावर आढळतात. येथेही रोपांची खरेदी करता येते.

बालोद्यानबालोद्यान : दक्षिण वृंदावनच्या उजव्या बाजूला चिल्ड्रन्स पार्क आहे. पार्कमध्ये स्लाइड्स, काँक्रीटपासून बनविलेले प्राण्यांचे पुतळे, पक्षी आणि जलीय प्रजाती, मुलांना खेळण्यासाठी झोपाळे, घसरगुंड्या आहेत.

शासकीय फळबाग : कृष्णराजसागर धरणाच्या उत्तरेस ७५ एकर जागेत शासकीय फळबाग तयार करण्यात आली आहे. येथे संशोधन केंद्र असून, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित फळबाग प्रशिक्षण दिले जाते. येथे भरघोस उत्पादन देणारी संकरित नारळाची रोपे तयार करण्यात येतात. तसेच आंबा, मल्याळी सफरचंद, लिची, आवळा अशा अनेक प्रकारच्या फळझाडांची रोपवाटिकाही येथे आहे.

चंद्रवन कृषी फार्म : कावेरी नदीच्या मध्यभागी पाच एकर क्षेत्रात विकसित केले आहे. या शेतामध्ये नारळ आणि आंबे यांची रोपे तयार करण्यात येतात. हे शेत जुलै ते जानेवारीदरम्यान पाण्याने वेढलेले असलेले सुंदर बेटासारखे दिसते.

कॅक्टी आणि सेक्युलंट गार्डनकॅक्टी आणि सेक्युलंट गार्डन : हॉल्टिकल्चरच्या सीनियर असिस्टंट डायरेक्टर ऑफिसच्या जवळ एक छोटे कॅक्टी आणि सेक्युलंट गार्डन तयार करण्यात आले आहे. निवडुंग आणि अन्य अनेक प्रजाती येथे जोपासल्या जातात. हे आवर्जून पाहण्यासारखे आहे.

बाल्मुरी व एडमुरी फॉल्सबाल्मुरी व एडमुरी फॉल्स : म्हैसूरहून कृष्णसागर धरणाकडे जाताना तीन किलोमीटरवर हिरव्यागार वनश्रीने नटलेले हे दोन सुंदर धबधबे आहेत. येथे अनेक चित्रपटांचे शूटिंग होत असते. येथे एक प्राचीन गणेश मंदिर आहे.

ब्लू लागॉनब्लू लागॉन : कृष्णसागर धरणापासून आतील बाजूला दोन किलोमीटर अंतरावर बॅकवॉटर्समध्ये हे एक लहान सुंदर बेट बनवले आहे. आपण बेटाभोवतीच्या पाण्यातून बोटिंग करून या ठिकाणी पोहोचू शकतो. हे एक उत्कृष्ट सहलीचे ठिकाण आहे आणि आपण या सुखद बेटावर जाऊन कृष्णसागरचा आनंद घेऊ शकता.

जीआरएस वॉटर पार्कजीआरएस वॉटर पार्क : म्हैसूर शहरातील आबालवृद्धांचे आकर्षण असलेला, मनोरंजन व जलक्रीडेची सोय असलेला हा ३० एकर क्षेत्रावरील वॉटरपार्क आहे. येथे अनेक प्रकारचे निरनिराळ्या वयोगटातील लोकांना झेपतील असे इनडोअर व आउटडोअर खेळ उपलब्ध आहेत. पॅडल बोट, बेबी ट्रेन, रॉक क्लायम्बिंग, अनेक प्रकारच्या घसरगुंड्या व मनोरंजक खेळ आहेत. उद्यान दररोज सकाळी साडेदहा ते सायंकाळी सहापर्यंत उघडे असते.

प्लॅनेट एक्सप्लॅनेट एक्स : हे म्हैसूर शहरातील आणखी एक आधुनिक मनोरंजन केंद्र आहे. म्हैसूर झूपासून प्लॅनेट एक्स सुमारे पाच किलोमीटरवर आहे. मित्रांबरोबर, नातेवाईकांबरोबर सुट्टीत किंवा वाढदिवसासारखे छोटे कार्यक्रम साजरे करण्यासाठी, मेजवानीसाठी हे आकर्षक ठिकाण आहे. गो-कार्टिंग, मिनी गोल्फ कोर्स, व्हिडिओ गेम्स, बार कम कॉकटेल लाउंज आणि रेस्टॉरंटची व्यवस्था येथे आहे.

वृंदावन गार्डन परिसरात राहण्यासाठी उच्च दर्जाची हॉटेल्स आहेत. वृंदावन परिसर पाहण्यासाठी दोन दिवस हवेत, निदान एक दिवस संपूर्ण हवाच. कारण बोटिंगचा आनंद, तसेच चार उद्यानांचे एकत्रित क्षेत्रफळ १७० एकर व दोन किलोमीटर लांबीचे धरण निवांतपणे पाहायचे असेल तर एवढा वेळ लागतोच. रात्रीचा रंगीत फाउंटन शो पाहून रात्री म्हैसूर येथे मुक्कामाला येऊ शकता.

वृंदावन उद्यान व म्हैसूर शहरातील मनोरंजनाची ठिकाणे या लेखात पाहिली. पुढच्या भागात पाहू या म्हैसूर शहरातील ऐतिहासिक मंदिरे व आसपासची ठिकाणे.

- माधव विद्वांस
ई-मेल : vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.) 

पाण्याची कारंजी

( वृंदावनची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Sameer About 350 Days ago
मस्त
0
0

Select Language
Share Link
 
Search