Next
‘देशाच्या सुरक्षेसाठी भारतीय सैनिक कटिबद्ध’
प्रेस रिलीज
Friday, July 27, 2018 | 04:50 PM
15 0 0
Share this story

कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनच्या बोधचिन्हाचे अनावरण करताना संजीव शहा, कर्नल (निवृत्त) ललित रे, महापौर मुक्ता टिळक, लेफ्ट. जन. (निवृत्त) राजेंद्र  निंभोरकर, शीला निंभोरकर आणि संजय नहार आदी मान्यवर.

पुणे : ‘पाकिस्तानच काय सगळे जग विरोधात गेले, तरीही देशाच्या सुरक्षेसाठी भारतीय सैनिक कटिबद्ध आहेत. आजपर्यंत पाकिस्तानच्या सैनिकांना जसे पळवून लावले, तसेच इथून पुढेही पळवून लावण्यासाठी भारतीय सेना सज्ज आहे. हमारा जोश हमेशा बरकरार रहेगा,’ अशा शब्दांत कारगिल विजयाचे नायक कर्नल (निवृत्त) ललित रे यांनी भारतीय सैन्याचा गौरव केला.

कारगिल विजय दिनानिमित्त सरहद संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्यांचा आणि सर्जिकल स्ट्राइकचे नेतृत्व करणारे ले. जन. (निवृत्त) राजेंद्र निंभोरकर यांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अण्णा भाऊ साठे सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात व्यासपीठावर पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार, विश्वस्त शैलेश वाडेकर, समन्वयक संजीव शहा उपस्थित होते. दोन सप्टेंबर २०१८ रोजी कारगिलमध्ये होणाऱ्या सिस्का कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनच्या बोधचिन्हाचे अनावरण या वेळी लेफ्ट. जनरल (निवृत्त) निंभोरकर, कर्नल (निवृत्त) रे, महापौर टिळक, शहा, नहार यांच्या हस्ते करण्यात आले.   

रे म्हणाले, ‘कारगील युद्ध झाल्यावर सहा-सात वर्षांनंतर दिल्लीत एक परिषद झाली. त्यावेळी परवेझ मुशर्रफही उपस्थित होते. ‘परवेझ साहेब काश्मीरचा प्रश्‍न सुटला नाही तर तुम्ही काय करणार,’ असा प्रश्‍न त्यावेळी काही पत्रकारांनी त्यांना विचारला. तेव्हा ‘हम और सो साल जिहाद लडेंगे...’ असे उत्तर त्यांनी दिले. कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने मला त्यांच्या या वाक्याची आठवण होते आहे. जिवाची पर्वा न करता आपले सैनिक देशासाठी लढत असतात. शत्रूला या देशावर कधीही विजय मिळवता येणार नाही; मात्र देशासाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या सैनिकांसाठी आपण काय करतो, हाही विचार आपण केला पाहिजे.’

अनुभवकथन करताना ते म्हणाले, ‘एकदा मला दोन सुटकेस भरून लहान मुलांनी पत्र पाठवली. लहान मुलांच्या माझ्याबद्दलच्या प्रेमाच्या भावना वाचून मी आयुष्यात पहिल्यांदा खूप रडलो. देशातील नागरिकांची ही छोटी कृतीही आमचे मनोबल वाढवते. छोट्या छोट्या गोष्टींतून सैनिकांबद्दल वाटणारे प्रेम आणि आदर त्यांच्यापर्यंत पोचवायला हवा.’
 
सर्जिकल स्ट्राइक नेमके कसे घडले, त्याची गुप्तता कशी पाळली गेली, याची कथा सांगून निंभोरकर म्हणाले, ‘सर्जिकल स्ट्राइकचा भारतीय जनतेला आपल्या सैनिकांचा खूप अभिमान वाटला. मी अनेक ठिकाणी जातो तेव्हा हा मला ते अनुभवायला मिळते. असा सर्जिकल स्ट्राइक पुन्हा करू शकतो का, असेही अनेकदा विचारले जाते. याचे उत्तर अर्थातच करू शकतो असेच आहे. तुमच्या भागात जाऊन आम्ही तुम्हाला प्रत्युत्तर देऊ शकतो. हे या कृतीमुळे पाकिस्तानला कळले. या गोष्टीचा पाकिस्तानला इतका धक्का बसला की यापुढे पाकिस्तान आपल्याला घाबरून राहील. मुख्य म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरही या कृतीचा सर्वांनी स्वीकार केला. एकाही देशाने सर्जिकल स्ट्राइक का केला, असे विचारले नाही. हीच आपल्या जमेची बाजू आहे.’टिळक म्हणाल्या, ‘१९७१चे युद्ध झाले, तेव्हा युद्धाची भीती काय असते, याचा अनुभव मी घेतला. त्यावेळी माझे वय लहान होते, पण तो अनुभव आठवला की आपण किती सुरक्षित आहोत. याची जाणीव होते. प्रतिकूल परिस्थितीत लढणारे लष्करी सैनिक आणि सर्वसामान्य माणूस यांच्यातले अंतर कमी करण्यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न व्हायला हवा.’

नहार म्हणाले, ‘देशात विविध मुद्यांवर कितीही मतभेद असले, तरी शत्रूशी लढताना देश एकत्र येतो. हे कारगिल युद्धातून आपण अनुभवले आहे. कारगिल हे शांततेचा आणि शौर्याचा संदेश देणारे जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ व्हावे यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवेत.’ कारगिल मॅरेथॉनमध्ये मराठी माणसांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले.  

कार्यक्रमाआधी गायक जितेंद्र भुरूक यांच्या ‘एक शाम कारगिल के नाम’ या देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम झाला. प्रास्ताविक संजीव शहा यांनी केले. निवेदन गोपाळ कांबळे यांनी केले. आभार शैलेश वाडेकर यांनी मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link