Next
पिरॅमिड्सबद्दल हे माहिती आहे का?
BOI
Sunday, June 17, 2018 | 12:45 PM
15 0 0
Share this story

गिझाचा पिरॅमिड

इजिप्तमधील पिरॅमिड्स हे जागतिक महान आश्चर्य आहे, हे साऱ्यांनाच माहिती आहे. तरीही त्याबद्दलच्या अनेक आश्चर्यकारक गोष्टी सर्वांनाच माहिती असतात, असे नाही. म्हणूनच ज्येष्ठ लेखक आणि पुरातत्त्व विषयाचे अभ्यासक रवींद्र गुर्जर त्यांच्या ‘किमया’ सदरातून पिरॅमिड्सच्या आश्चर्यांबद्दल सांगत आहेत. त्याचा हा पूर्वार्ध...
..........
पुरातत्त्वज्ञ आणि पर्यटक यांच्या आकर्षणाचे एक महान प्राचीन स्थान म्हणजे इजिप्तचे पिरॅमिड्स. ईश्वरी अंश मानण्यात आलेले त्या देशाचे राजे आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या दफनांच्या जागा म्हणजेच हे पिरॅमिड्‌स होत. आजमितीला त्यावर प्रचंड संशोधन झालेले आहे आणि होत आहे. इ. स. पू. २६५० ते १५५० म्हणजे ११०० वर्षांमध्ये त्यांची उभारणी झाली. 

कैरो शहराच्या बाहेर गिझा येथे असलेले पिरॅमिड्‌स सर्वाधिक प्रसिद्ध आहेत आणि तिथला ‘खुफू’चा पिरॅमिड म्हणजे जगातील सर्वांत मोठे बांधकाम ठरले आहे. प्राचीन जगातील आज अस्तित्वात असलेले पहिले महान आश्चर्य! मेम्फिसच्या वायव्येला असलेले ‘सकारा’चे पिरॅमिड्‌स आणि त्यातील ‘जोझर’ पिरॅमिड सर्वांत प्राचीन मानले जातात. अजस्र आकाराचे अन् वजनाचे दगड तासून, घडवून तिथे वापरण्यात आले आहेत. बरेचसे पिरॅमिड्‌स आजही सुस्थितीत उभे आहेत. काही ठिकाणी प्रचंड स्फिंक्स (सिंहाचे शरीर आणि मानवी मस्तक) दिसून येतात.

स्फिंक्स

इजिप्तच्या सोळाव्या राजघराण्यातील राजा तुतानखामेन सगळ्यात लोकप्रिय ठरला. नोव्हेंबर १९२२पर्यंत त्याच्या जागेला कोणत्याही प्रकारचा धक्का लागला नव्हता (चोरी, उत्खनन, संशोधन, हवामान इत्यादी कारणाने); मात्र त्या वेळेपर्यंत या राजाची नगण्य माहिती मिळालेली होती. अवघ्या अठरा वर्षांचे आयुष्य त्याला लाभले होते. तुतानखामेनचा जन्म इ. स. पू. १३४६मध्ये झाला. त्या वेळी अखेतातेन ही इजिप्तची राजधानी होती. नवव्या वर्षी त्याला राज्यपद मिळाले आणि अकाली मृत्यूमुळे फक्त नऊ वर्षे त्याला ते पद उपभोगता आले. त्यानंतर सुमारे तीन हजार वर्षांनी ब्रिटिश पुरातत्त्वज्ञांच्या एक गटाने त्याच्या दफनभूमीचा शोध लावला. त्या जागी अत्यंत मौल्यवान खजिना हाती लागल्यामुळे तुतानखामेनला खूपच प्रसिद्धी मिळाली. शोधकर्त्या पुरातत्त्वज्ञाचे नाव होते हॉवर्ड कार्टर. आधीच्या शोधामध्ये तुतानखामेन आणि त्याच्या राणीचे नाव आढळले होते. त्यामुळे त्यांचा पिरॅमिड खोऱ्यामध्ये जवळपास कुठेतरी असला पाहिजे, असा विश्वास हॉवर्डला वाटत होता. थिब्ज या जागी राजाला घाईघाईत तयारी करून पुरण्यात आले होते.

चार नोव्हेंबर १९२२ रोजी सहाव्या रामसेसच्या दफनासमोरील बाजूला खाली उतरणाऱ्या सोळ्या पायऱ्या प्रथम सापडल्या. त्या भागातच अनेक राजांना पुरण्यात आले होते. तुतानखामेनला मृत्यूनंतर ठेवण्यात आलेली जागा अन्य राजांच्या तुलनेत लहान होती. तिथे सापडलेल्या शेकडो वस्तू कैरोच्या इजिप्शियन म्युझियममध्ये ठेवण्यात आल्या आहेत. मृत्यूनंतरच्या जीवनावर प्राचीन लोकांचा विश्वास असल्यामुळे राजाला ज्या ज्या गोष्टी दफनभूमीत लागू शकतील, त्या सर्व तिथे ठेवण्यात येत असत. अशा तीन हजारांहून अधिक मौल्यवान वस्तू तुतानखामेनजवळ सापडल्या. त्याच्या ममीची (मृत्यूनंतर प्रेताची केलेली खास व्यवस्था) फॉरेन्सिक तपासणी केल्यानंतर, वयाच्या अठराव्या वर्षी तो मरण पावला असावा, असा शोध लागला. त्याच्या चेहऱ्यावर सोन्याचा मुखवटाही होता. तिथेच ठेवलेल्या मद्याच्या बुधल्यांवरील मातीच्या झाकणांवर मद्याचा प्रकार आणि राजाच्या शासनाचे वर्ष या गोष्टीही नोंदलेल्या होत्या. १९६८मध्ये ममीचा एक्स-रे काढल्यानंतर असा धक्कादायक शोध लागला, की त्याच्या कवटीवर (डोक्यावर) जड वस्तूने आघात केले गेले असावेत. २००६ मधील ममीच्या नव्या ‘सीटी स्कॅन’नंतर असा अंदाज व्यक्त करण्यात आला, की तुतानखामेनचा खून झाला नसून, पाय मोडल्यामुळे झालेल्या जंतुसंसर्गामुळे त्याला जीव गमवावा लागला. अचानक मृत्यू झाल्यामुळे घाईगडबडीतच त्याचे दफन करण्यात आले. पिरॅमिड (दफन) फोडण्याचा प्रयत्न कोणी केल्यास ममीचा दुर्धर शाप त्याला भोगावा लागेल, अशी जुनी समजूत आहे.

पिरॅमिडच्या आतमध्ये

उत्खनन झालेल्या (शोध लागलेल्या) सर्व पिरॅमिड्‌सची सविस्तर नोंद ठेवण्यात आलेली आहे. उदाहरणार्थ, राजाचे नाव - जोझर, प्राचीन नाव - माहीत नाही, नवीन नाव - जोहरचा उतरता पिरॅमिड, राजघराणे - तिसरे (इ. स. पू. २६८६ ते २६१३ अंदाजे), ठिकाण - सकारा, तळाचे क्षेत्र - १२१ मी. बाय १०९ मी. आणि उंची ६० मीटर, एकूण आकारमान (घनता) - ३,३०,४०० घनमीटर इत्यादी. तुतानखामेनचे राजघराणे अठरावे होते. चौथ्या राजघराण्यातील राजा ‘स्नेफ्रू’ याचा पिरॅमिड ‘दहशर’ भागात असून, त्याचे आकारमान सर्वांत जास्त म्हणजे १२ लाख ३६ हजार घनमीटर एवढे आहे. ‘झुकलेला पिरॅमिड’ म्हणून तो ओळखला जातो.

गिझा येथील काही पिरॅमिड्‌सची माहिती आपण करून घेऊ. इजिप्तच्या चौथ्या राजवटीतील राजा ‘स्नेफ्रू’ (इ. स. पू. २६८६-२६६७) याने सर्वांत प्रथम पिरॅमिड्‌स या प्रकारचे स्थापत्य निर्माण केले. त्याने एकूण तीन पिरॅमिड्‌स बांधले; पण त्यातल्या दोन वास्तूंत त्याला अपयश आले. पहिल्या पिरॅमिडमध्ये लाइमस्टोनचा वापर झाला होता; पण ते घसरू लागले आणि त्या वेळी त्यांचा नाद सोडण्यात आला. दुसऱ्या वास्तूला आज आपण ‘झुकलेला पिरॅमिड’ म्हणून ओळखतो. कारण त्याची वरची बाजू एका बाजूला थोडी झुकलेली आहे. स्नेफ्रूने एका मैलावर तिसऱ्या पिरॅमिडचे बांधकाम सुरू केले. त्यासाठी लाल रंगाचे लाइमस्टोन वापरल्यामुळे त्याला ‘लाल पिरॅमिड’ म्हणून ओळखले जाते. हाच जगातील यशस्वी ठरलेला पहिला खरा पिरॅमिड होय. शवपेटीतील ममी ठेवण्याची जागा (कक्ष), मृताचे मंदिर, खाद्यपदार्थ, मद्य आणि उपयुक्त मौल्यवान वस्तू ठेवण्याची जागा या सर्व बाबतीत स्नेफ्रूने ‘आदर्श वस्तुपाठ’ घालून दिला. त्याचा मुलगा खुफू याने गिझातील सगळ्यात मोठा पिरॅमिड बांधला. इजिप्तच्या उत्तरेला नाईल नदीच्या पश्चिमम किनाऱ्याला खडकाळ पठारावर उत्तरेला गिझाचा पिरॅमिड उभारण्यात आले. खुफूचा काळ होता इ.स.पू. २५७५-२५६६. तिथला ‘ग्रेट पिरॅमिड’ या नावाने ओळखला जाणारा तिघांतील एक पिरॅमिड हे खरोखरच बांधकामाचे मोठे आश्चर्य ठरले आहे. त्या कामाला वीस वर्षे लागली. एक लाख लोक त्यासाठी खपत होते. नाईल नदीला पूर आल्यानंतर शेती अशक्य असल्यामुळे बेकार झालेले ते लोक दर वर्षी तीन महिने (रोजगार हमी योजना?) तिथे काम करत. त्या वेळी राजा कामगारांना उत्तम अन्न, वस्त्रे पुरवत असे.

पिरॅमिडच्या आतमध्येपिरॅमिडच्या पायाच्या चारही बाजू प्रत्येकी ७५५ फूट लांबीच्या आहेत. या निमुळत्या होत जाणाऱ्या बाजू सुमारे ५१ अंशांत वळलेल्या आहेत. मुळातली उंची ४८१ फूट होती. ती आता ४५१ फूट झालेली आहे. पिरॅमिडसाठी सुमारे २३ लाख लाइमस्टोनचे घडवलेले दगड (घन) वापरण्यात आले. प्रत्येक दगडाचे वजन सरासरी अडीच टन होते. काही दगडांचे वजन तर सोळा टनांपर्यंतसुद्धा होते. त्यानंतरच्या खाफ्रे (इ. स. पू २५५८-२५३२) राजाने बांधलेला पिरॅमिड वैचित्र्यपूर्ण होता. त्याला सूर्यदेवतेचे प्रतीक मानले जाई. त्यावरील स्फिंक्सचा चेहरा खाफ्रेच्या चेहऱ्याशी मिळताजुळता होता. दुर्दैवाने सरत्या वर्षांमध्ये या ‘ग्रेट पिरॅमिड’ची पडझड सुरू झाली. त्याची डागडुजी सुरू राहिली. इ. स. १३००मध्ये सुलतान मोहम्मद अन-नासीर याने स्फिंक्सचा विध्वंस केला. १७९८मध्ये नेपोलियनच्या सैनिकांनी नेम धरण्यासाठी वापर केल्यामुळे स्फिंक्सचे नाक (शूर्पणखेप्रमाणे) नष्ट झाले. खाफ्रेच्या पिरॅमिडची मुळातील उंची २२८ फूट होती. त्यात खालच्या थरांसाठी लाल ग्रॅनाइट वापरला आहे, तर वरच्या बाजूला चमकता पांढरा लाइमस्टोन मुळात उपयोगात आणला होता. जुन्या काळानंतर प्राचीन इजिप्तच्या नव्या राजवटींमध्येही अधिक उत्तम प्रकारे, आकार आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने गौरवास्पद पिरॅमिड उभे होत राहिले. मधल्या काळातही (इ. स. पू. २०५५-१६५०) बांधकाम झाले होते. परंतु त्यासाठी मुख्यत: मातीच्या विटांचा वापर झाल्यामुळे पुढे त्यांचे ढिगारे बनले.

खुद्द इजिप्तमध्ये शंभरहून अधिक राजांशी संबंधित पिरॅमिड्‌स आहेत. त्यांच्या बांधकामासाठी अवाढव्य खर्च झालेला होता आणि ते सर्वांचे लक्ष वेधून घेत असल्यामुळे खजिन्याच्या आशेने चोरांच्या आकर्षणाला बळी पडत होते. सगळ्यात शेवटचा शाही पिरॅमिड अठराव्या राजघराण्यातील पहिला राजा आहमोझ (इ. स. पू. १५५० ते १५२५) याने बांधला. त्यानंतर मात्र इजिप्तच्या लोकांनी राजदफनासाठी पिरॅमिड नावाच्या अतिभव्य वास्तू बांधणे बंद केले.

रवींद्र गुर्जर
संपर्क : ९८२३३ २३३७०
ई-मेल : rvgurjar@gmail.com

(‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/TiSWnh या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Kumar Joshi About 264 Days ago
खूपच छान लेख. धन्यवाद.
0
0
नीलकंठ भालेराव About 275 Days ago
चांगली आणि सविस्तर माहिती मिळाली धन्यवाद
0
0
मंजिरी About 276 Days ago
Khupach sunder lekh
0
0
संजीवनी अत्रे About 276 Days ago
उपयुक्त माहिती. धन्यवाद सर !!
0
0

Select Language
Share Link