Next
या बियांमध्ये दडलंय काय.?
BOI
Wednesday, May 02 | 09:45 AM
15 0 0
Share this story


काही भाज्या व फळे जसे वांगी, दुधी भोपळा, पेरू यांच्या बियाही आपण सरसकट खातो, पण लाल भोपळा, टरबूज, कलिंगड, संत्र, लिंबू यातील बिया मात्र फेकल्याच जातात. खरे तर इथेच आपण मोठी चूक करतो.... ‘पोषणमंत्र’ सदरात आज पाहू या फळे आणि भाज्या यांमधील बियांचे महत्त्व... 
.........................
आजकाल टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या डान्स रिअॅलिटी शोजमुळे ‘पॉवर पॅक कामगिरी’ असे शब्द बऱ्याचदा आपल्या कानावर पडतात. खरे तर आपल्या आहाराच्या बाबतीतही ही संज्ञा लागू पडू शकते. आपल्या रोजच्या आहारात काही अन्नपदार्थ असेच ‘पॉवर पॅक’ किवा ‘छोटा पॅकेट, बडा धमाका’ यांसारखे असतात. ते म्हणजे भाज्या, फळांच्या बिया व नट्स. काही भाज्या व फळे जसे वांगी, दुधी भोपळा, पेरू यांच्या बियाही आपण सरसकट खातो, पण लाल भोपळा, टरबूज, कलिंगड, संत्र, लिंबू यातील बिया मात्र फेकल्याच जातात. खरे तर इथेच आपण मोठी चूक करतो.

या बिया सगळ्यांसाठीच चांगल्या आहेत. त्यातही जे लोक शुद्ध शाकाहारी आहेत, त्यांनी तर याचे महत्त्व विशेष करून लक्षात घ्यायला हवे. ह्या बिया आपण घेण्याचे प्रमाण तसे अत्यल्पच असते, परंतु त्या अत्यंत पौष्टिक आहेत. यात मुख्यत्वे फॅट सोल्युबल जीवनसत्त्वे जसे अ, क, काही प्रमाणात ‘ब’ गटातील जीवनसत्त्वे आहेत. कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, मॅग्नेशियम, झिंक यांसारखी खनिजे आहेत. प्रथिने आहेतच पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे चांगले व गरजेचे मोनो व पॉली असंपृक्त चरबी घटक आहेत. 

‘ओमेगा ३’सारखे आवश्यक फॅटी आम्ल सगळ्यांनाच परिचित आहे. विशेषतः शुद्ध शाकाहारी लोकांना हे फार कमी प्रमाणात मिळते. शाकाहारी पदार्थांमध्ये फार थोड्या घटकांमध्ये ते उपलब्ध असते. असे हे फॅटी अॅसीड या फळांच्या बियांमध्ये असते. या घटकाच्या अभ्यासात काही निष्कर्ष असेही निघाले आहेत, की नैराश्य, ताण-तणाव, चिंता यांसारख्या अडचणींवर ह्या बियांचा उपचार म्हणून चांगला उपयोग होतो. कारण त्यात ‘सेरटोनिन’ नावाचा घटक असतो, जो विमोचन वाढवून आपली मनस्थिती म्हणजेच ‘सो कॉल्ड मूड’ ठीक करायचे काम करतो. 

या बियांमध्ये ‘पॅालिफिनॅाटस’पण असतात, जे अँटिऑक्सिडेंट, मधुमेह आणि हृदयरुग्णांसाठी खूप चांगले असतात. शिवाय या बियांमध्ये ‘फायबर’चे प्रमाण चांगले असल्याने पोट साफ होण्यासही मदत होते. संत्र व लिंबाच्या बिया तर आपण हमखास फेकून देतो. परंतु त्याच बिया आपण खाल्या (फळांसोबतच) तर पोटात जंत होत नाहीत. त्यामुळे लहान मुलांना तर या बिया आवर्जून खाऊ द्यायला हव्यात. डाळिंबाच्या बियाही खूप पौष्टिक असतात. त्या आवर्जून खाव्यात. केस, त्वचा, डोळे यांचे आरोग्य उत्तम राखण्यामध्ये या डाळिंबाच्या बिया खूपच महत्त्वाचे कार्य करतात. 

कलिंगड, टरबूज व लाल भोपळयाच्या बिया तर आजकाल सुक्या मेव्याच्या दुकानात सहज मिळतात. किंवा ही फळे आपण हमखास घरी आणतो, तेव्हा घरीसुद्धा त्यातील बिया फेकण्याऐवजी त्या धुवून वाळवल्या व भाजून नीट ठेवल्या, तर खाता येतील. एका डब्यात या सर्व बिया एकत्र करून ठेऊन दररोज एक चमचा खाल्ल्यास उत्तम. 

काही सुका मेवा जसे बदाम, अक्रोड व मसाल्याचे पदार्थ तीळ, खसखस हेदेखील या बियांमध्ये मोडतात. परंतु सुक्या मेव्याचा अतिरेक नको. मसाल्याचे पदार्थ आपण रोजच्या स्वयंपाकात वापरत असतो, त्यातही अनेक प्रकारच्या बियांचा समतोल साधलेला असतो. कलिंगड, टरबूज, लाल भोपळा यांच्या बिया सॅलड, पुलावसारखा भात यांवर सजावटीसाठी घालाव्यात. असे हे साधे सोपे ‘छोटा पॅकेट’ व ‘पॉवर हाउस’ आपल्या घरात कायम असू द्यावेत.

- आश्लेषा भागवत
मोबाइल : ९४२३० ०८८६८ 
ई-मेल : ashlesha0605@gmail.com

(लेखिका पुण्यातील आहारतज्ज्ञ आहेत.) 

(‘पोषणमंत्र’ या लेखमालिकेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/4tP7a7 या लिंकवर उपलब्ध असतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link