Next
परस्परांच्या भावनांचा आदर करा..
BOI
Saturday, March 24, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this story


त्याचा स्वभाव हुकुमशाही स्वरूपाचा होता. त्याची निर्णय क्षमताही चांगली असल्याने ऑफिसमध्ये, घरात बऱ्याचशा गोष्टींत त्याचा सल्ला घेतला जायचा. यामुळे नकळत त्याचा हुकुमशाही स्वभाव वाढत गेला. आई-वडिलांना याची सवय असल्याने त्यांना यात काही वेगळे वाटले नाही; पण कस्तुरीला मात्र त्याच्या या स्वभावाचा खूप त्रास होत होता. त्याच्या या स्वभावामुळे बऱ्याचदा तिची घुसमट होत होती.... ‘मनी मानसी’ या सदरात या वेळी पाहू या नात्यातील तणावांबद्दल... 
........................................
कस्तुरीची आई तिला घेऊन समुपदेशनासाठी आली होती. दोघीजणी तणावाखाली असल्याचं त्यांच्याकडे पाहून लगेचंच लक्षात येत होतं. आईने आल्यावर कस्तुरीची ओळख करून दिली. कस्तुरी २७ वर्षांची होती. वर्षभरापूर्वी तिचं आणि किरणचं लग्न झालं. लग्नानंतरचे सुरुवातीचे दिवस चांगले गेले; पण नंतर मात्र दोघांमध्ये सारखे खटके उडू लागले. छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद होऊ लागले. हळूहळू हेच वाद इतके वाढले, की कस्तुरी या साऱ्याला कंटाळून आईकडे निघून आली. किरणकडे परत जाण्याची तिची इच्छाच नव्हती. 

आई हे सगळं सांगत असताना कस्तुरीला खूप रडू आलं. ते पाहून आईलाही रडू आवरणं अवघड झालं. त्यामुळे दोघींना थोड मोकळं होऊ दिलं. थोड्या वेळाने तिने स्वतःला सावरलं. ती थोडी शांत झाल्यावर तिच्याशी संवाद साधायला सुरुवात केली. त्यानंतरच्या दोन सत्रांतही तिच्याशी संवाद साधून दोघांच्या नातेसंबंधात नेमकी काय समस्या आहे ते जाणून घेतलं.

‘किरण तसा खूप चांगला वाटला म्हणून मी होकार दिला त्याला. लग्नानंतर तो सुरुवातीला चांगला वागला; पण नंतर नंतर त्याचं वागणं जास्तच खटकू लागलं. नेहमी त्याचंच म्हणणं मान्य करायचं आणि तो सांगेल त्याप्रमाणेच वागायचं. त्याच्या म्हणण्याप्रमाणे नाही वागलं, तर त्याचंच म्हणणं पटेपर्यंत तो समोरच्याला समजावत राहतो. तसंच वागायला भाग पाडतो. त्याचं बोलणंही खूप हुकमी असतं. आपण त्याला काही समजवायला गेलो, तर आपलं म्हणणं तो खोडून काढतो. आपण कितीही बरोबर किंवा योग्य बोलत-सांगत असलो, तरी स्वतःचाच मुद्दा तो पुढे पुढे करतो आणि मी कशी चुकीची आहे, हे दाखवतो. वर्षभरात क्वचितच मी सांगितलेली गोष्ट त्याने ऐकली असेल. स्वतःच्या म्हणण्याप्रमाणेच तो वागतो. एखादा निर्णय चुकला तरी तो ते कधीच मान्य करत नाही. माझ्या इच्छा, माझं म्हणणं, अपेक्षा, भावना याला त्याच्या दृष्टीने काहीच महत्त्व नाही. सतत मन मारून मला आता खूप ताण यायला लागलाय. आमच्यातले वाद वाढत चालले आहेत आणि त्याच्या मते या साऱ्याला मी कारणीभूत आहे. त्याचं यात काहीच चुकत नाहीये. तो नेहमी बरोबर आणि मी नेहमी चूक. मला नाही जायचं त्याच्याकडे. कंटाळलेय मी आता..’, कस्तुरी रडकुंडीला येऊन सांगत होती. 

तिचं हे सगळं बोलणं ऐकल्यावर त्यांच्या नात्यात तणाव निर्माण करणारा मुद्दा किंवा समस्या लक्षात आली. तिच्याशी बोलून झाल्यावर किरणलाही सत्रांसाठी बोलावण्यात आलं. सुरुवातीला त्याने येण्यासाठी खूप विरोध केला; पण घरच्या मोठ्यांनी समजावल्यावर तो नाखुशीनेच, पण भेटायला आला. सुरुवातीच्या एक दोन सत्रांत तो फारसा मोकळा झाला नाही. नंतर हळूहळू तो बोलायला लागला आणि त्याच्या बोलण्यातून असं लक्षात आलं, की कस्तुरीवर त्याचं खरंच मनापासून प्रेम होतं. ती माहेरी निघून गेल्यामुळे तोही खूप अस्वस्थ झाला होता; पण त्याचं बोलणं ऐकल्यावर आणि एकूण निरीक्षणावरून हे लक्षात येत होत, की लहानपणापासूनच त्याचा स्वभाव हुकुमशाही स्वरूपाचा होता. त्याची निर्णय क्षमताही बरीच चांगली होती. त्यामुळे ऑफिसमध्ये, घरात बऱ्याचशा गोष्टींत त्याचा सल्ला घेतला जायचा. यामुळे नकळत त्याचा हुकुमशाही स्वभाव वाढत गेला. आई-वडिलांना त्याच्या या स्वभावाची सवय असल्याने त्यांना यात काही वेगळे वाटले नाही; पण कस्तुरीला मात्र त्याच्या या स्वभावाचा खूप त्रास होत होता. त्याच्या या स्वभावामुळे बऱ्याचदा तिची घुसमट होत होती.

ही समस्या लक्षात आल्यानंतर पुढच्या सत्रांत किरणला त्याच्या या स्वभावाची जाणीव करून देण्यात आली. त्यामुळे त्या दोघांमध्ये निर्माण होत असलेले ताण व वाद याचीही त्याला वेगवेगळी उदाहरणे देऊन जाणीव करून देण्यात आली. त्याच्या या स्वभावामुळे तिची होणारी भावनिक घुसमट, तिला होणारा त्रास या साऱ्याची त्याला हळूहळू जाणीव होत गेली व त्यानंतर त्याने स्वतःहूनच बदलाची तयारी दाखवली आणि त्याने खूप प्रयत्न करून स्वतःला बदलले.

मित्र-मैत्रिणींनो, कोणत्याही नात्यामध्ये जर भक्कमपणा आणायचा असेल, ते नात घट्ट करायचं असेल, तर प्रत्येकाला त्याचे विचार, भावना, इच्छा-अपेक्षा यांचा समोरच्याकडून आदर होणं, महत्त्व मिळणं खूप महत्वाचं असतं. तुम्ही समोरच्याचा जितका आदर कराल, तितकंच तुमचं नातं घट्ट होईल आणि तुमच्याबद्दलचा आदरही निश्चितच वाढेल आणि मग या दोघांत निर्माण झालेला ताण-तणाव तुमच्यात निर्माण होण्याची शक्यताही आपोआपच कमी होईल.      

(केसमधील नावे बदलली आहेत.) 

- मानसी तांबे-चांदोरीकर 
मोबाइल : ८८८८३ ०४७५९ 
ई-मेल : tambe.manasi11@gmail.com

(लेखिका पुण्यात समुपदेशक म्हणून कार्यरत आहेत.)

(दर शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘मनी मानसी’ या लेखमालेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/a3SDSr या लिंकवर उपलब्ध आहेत)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link