Next
साकारले पहिले ‘पुस्तकांचे गाव’
BOI
Thursday, April 27, 2017 | 04:44 PM
15 4 0
Share this article:


मुंबई : भारतातील पहिल्या पुस्तकांच्या गावाचे उद्घाटन येत्या चार मे रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे. सातारा जिल्ह्यातील स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध असलेले भिलार हे गाव ‘पुस्तकांचे गाव’ या अभिनव स्वरूपात पुढे येत आहे.  पाचगणी ते महाबळेश्वर रस्त्यावर पाचगणीपासून सुमारे ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या भिलार गावातील जननीमाता मंदिर परिसरात दुपारी तीन वाजता उद्घाटन सोहळा योजण्यात आला आहे,  अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
‘‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने’ ही भावना मनात ठेवून भिलार गाव पर्यटकांचे आणि रसिक-वाचकांचे स्वागत करायला सज्ज झाले आहे. घरे, मंदिरे आणि शाळा यांमध्ये एकूण २५ ठिकाणी कथा, कविता, कादंबरी, संत साहित्य, स्त्री-साहित्य, बालसाहित्य, इतिहास निसर्ग-पर्यावरण-पर्यटन, लोकसाहित्य, चरित्रे-आत्मचरित्रे, दिवाळी अंक अशा विविध प्रकारची पुस्तके ठेवण्यात आली आहेत. प्रत्येक ठिकाणी सुमारे ४०० ते ४५० अशी एकूण सुमारे १५ हजार पुस्तके वाचकांसाठी गावात उपलब्ध आहेत. सरकारच्या वतीने प्रत्येक ठिकाणी कपाट, टेबल, खुर्च्या, सुशोभित छत्री, बीन बॅग इत्यादी वस्तूही पुरवण्यात आल्या आहेत. पर्यटक किंवा रसिक-वाचक घरांमध्ये जाऊन निवांत वाचन करू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. प्रकल्पात सहभागी असलेल्या २५ ठिकाणांचे (घरे व सार्वजनिक जागा) सुसज्ज व सुंदर ग्रंथालयांत रूपांतर करण्यात आले आहे. पर्यायाने, संपूर्ण भिलार गावच एक ग्रंथालय बनले आहे,’ अशी माहिती तावडे यांनी दिली.
मराठी भाषा विभागाच्या राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने उभारण्यात आलेल्या या प्रकल्पात अनेकांनी योगदान दिले आहे. प्रामुख्याने भिलारवासीयांनी सरकारच्या या पुढाकाराला सकारात्मक आणि उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मुळातच निसर्गरम्य असलेल्या या गावात स्वत्व या गटाच्या सुमारे ७५ चित्रकारांनी गावातील २५ ठिकाणे आपल्या कलेच्या माध्यमातून सुंदर रंगवली आहेत.  

या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी पर्यटकांनी, साहित्यिक-प्रकाशकांनी आणि पुस्तकप्रेमींनी दिवसभरासाठी या पुस्तकांच्या गावात (भिलारला) यावे, असे आवाहन तावडे यांनी केले आहे. डॉ. सदानंद मोरे, बाबा भांड, दिलीप करंबेळकर, अरुणाताई ढेरे, पांडुरंग बलकवडे, राजन गवस, अशोक नायगावकर असे अनेक मान्यवर पुस्तकांच्या घरात थांबून येणाऱ्या पुस्तकप्रेमींशी, पुस्तकांबाबत गप्पा मारतील आणि मार्गदर्शन करतील. 
२७ फेब्रुवारी २०१५ रोजी, मराठी भाषा दिनी ब्रिटनमधील ‘हे ऑन वे’ या गावाचा संदर्भ देऊन, ‘महाराष्ट्रात पुस्तकांचं गाव उभारण्यात येईल,’ अशी घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार मुळातच ज्या भागात पर्यटकांची वर्दळ मोठ्या संख्येने आहे, अशा भागातील गाव निवडण्याचे ठरले आणि भिलारची निवड करण्यात आली. मूळ संदर्भ ‘हे ऑन वे’चा असला, तरी ‘पुस्तकांचं गाव’ या संकल्पनेचे एका अर्थाने महाराष्ट्रीकरण केलेले आहे, असे तावडे यांनी सांगितले.
‘शांत व निसर्गसंपन्न गाव, गावकऱ्यांचे आदरातिथ्य व आपुलकी आणि विविध प्रकारची दर्जेदार पुस्तके यांचा अनुभव घेण्यासाठी सर्वांनी आवर्जून या गावाला भेट द्यावी, वाचनसंस्कृती संवर्धनाच्या मूळ हेतूला बळ द्यावे,’ असे आग्रही आवाहन विनोद तावडे यांनी केले आहे.
 
15 4 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search