Next
दिल की तमन्ना थी...
BOI
Sunday, December 30, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

आज तीस डिसेंबर. अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटगीतांना सुंदर संगीताने सजवलेले गीतकार एन. दत्ता यांचा स्मृतिदिन. त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’ सदरात आज आस्वाद घेऊ या त्यांनी संगीत दिलेल्या ‘दिल की तमन्ना थी...’ या गीताचा...
...........
...आणि म्हणता म्हणता २०१८मधील शेवटचा रविवार आला आहे. या वर्षात ‘सुनहरे गीत’ सदरातून हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध आणि फारशी प्रसिद्धी न मिळालेल्या कलावंतांचा जीवनपट पहाण्याचा प्रयत्न केला. काही नावे अजूनही राहिली आहेत. त्यांच्याकडे वळायचे असे ठरवत असतानाच लक्षात आले, की रविवारी ३० डिसेंबर आहे! हे लक्षात येताच अन्य कलावंतांचा विचार करण्याऐवजी याच संगीतकाराचा विचार करायला हवा! 

कोण ‘तो’ संगीतकार? पटकन नाव घेतले जाणार नाही; पण ‘चंद्रकांता’ चित्रपटातील ‘मैंने चाँद और सितारों की तमन्ना की थी...’ हे गाणे आवडते ना तुम्हाला, एवढे विचारले की ‘त्याचे’ नाव ओठावरच येईल! एक मराठी माणूस - दत्ताराम बाबूराव नाईक हे त्यांचे मूळ नाव; पण चित्रपटप्रेमी त्यांना ‘एन. दत्ता’ या नावाने ओळखतात! आणि ३० डिसेंबर हा त्यांचा स्मृतिदिन! १९८७मध्ये याच दिवशी ते अनेक मधुर गीते सिनेरसिकांसाठी ठेवून या दुनियेतून निघून गेले. आज त्यांचा स्मरण दिवस!

गोव्यातील पेडणे गावाजवळील ‘आरोबा’ या गावी त्यांचा जन्म झाला होता. पोर्तुगीज लोकसंगीत बालपणापासून त्यांच्या कानावर पडत असे. वयाच्या मानाने त्यांची संगीताची जाणही प्रगल्भ होती; पण त्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत होते. त्यामुळे घरामधून त्यांच्या कलेला उत्तेजन मिळणे अवघड होते. शालान्त परीक्षेनंतर त्यांनी मुंबई गाठली. देवधर संगीत विद्यालयात ते गाणे शिकू लागले. काही काळानंतर प्रसिद्ध संगीतकार गुलाम हैदर यांच्याकडे सहायक म्हणून ते काम करू लागले. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात देशभक्तिपर गीतांच्या मेळ्यातही त्यांचा सहभाग असे. अशाच एका कार्यक्रमात त्यांची कला बघून सचिन देव बर्मन यांनी आपला सहायक बनण्याविषयी त्यांच्याकडे विचारणा केली. आणि एन. दत्तांनी त्यांना होकार दिला.

अफसर, नौजवान, सजा, बहार, जाल, देवदास, बाजी या सचिनदांच्या चित्रपटांमधील गीतांच्या वाद्यमेळात एन. दत्तांच्या कलाकुसरीचा हात आहे. सचिनदांचे सहायक बनलेले एन. दत्ता स्वतंत्र संगीतकार म्हणून १९५५च्या ‘मिलाप’ चित्रपटापासून हिंदी चित्रपटसृष्टीला संगीतकार म्हणून परिचित झाले. ‘ये बहारों का समा, चाँद-तारों का समा...’ हे हेमंतकुमार व लता मंगेशकर यांच्या स्वरातील गीत आणि ‘जाते हो तो जाओ, पर जाओगे कहाँ...’ हे गीता दत्तने गायलेले गीत ही एन. दत्तांची पहिली लोकप्रिय गीते ‘मिलाप’ चित्रपटातील होती.

त्यानंतर त्यांनी ‘सिप्पी फिल्म्स’करिता संगीतकार म्हणून काम केले. त्यामध्ये मोहम्मद रफींनी गायलेले ‘मिस्टर एक्स’मधील ... ‘लाल लाल गाल जान के है लागू...’ हे ‘रॉक अँड रोल’ पठडीतील उडत्या चालीचे गाणे, तर ‘लाइट हाउस’ चित्रपटातील ‘तंग आ चुके है कश्म कशे जिंदगी से हम...’ आणि ‘किस जगह जाय किसको दिखलाये...’ ही आशा भोसले यांनी गायलेली दर्दभरी गीते, ‘मैं तुम्ही से पूँछती हूँ...’सारखे (ब्लॅक कॅट) सुखद प्रेमगीत आणि ‘चंद्रकांता’मधील सुप्रसिद्ध ‘मैंने चाँद और सितारों की...’सारखे व्यथित करणारे गीत! अशी गीतांतील विविधता त्यांच्या संगीतातून दिसून आली.

एन. दत्तांनी संगीतबद्ध केलेला ‘दीदी’ चित्रपटही गाण्यांमुळे गाजला आणि शायर साहीर लुधियानवी यांच्याबरोबर त्यांचे सूर जुळले! त्यामुळेच बी. आर. चोप्रांच्या कंपनीत त्यांचा प्रवेश झाला. साधना, धूल का फूल, धर्मपुत्र या चित्रपटांतील गीतांनी लोकप्रियतेचे उच्चांक गाठले. पुढचा चित्रपट ‘गुमराह.’ त्याकरिता साहिरच्या ‘चलो एक बार फिरसे...’ या गीताला त्यांनी एका सुंदर चालीत गुंफण्याचे ठरवले; पण तोच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले.

पुढे जवळजवळ वर्षभर त्यांना सक्तीची विश्रांती घ्यावी लागली. तिकडे गुमराह चित्रपट संगीतकार रवी यांच्याकडे गेला व बी. आर. चोप्रांचे पुढचे चित्रपटही रवींनाच मिळाले. तब्येत बरी झाल्यावर एन. दत्ता पुन्हा चित्रपटसृष्टीत आले; पण आता काळ बदलला होता. ‘गुमराह’ चित्रपट रवींकडे गेला होता. स्पर्धा वाढली होती. काही अॅक्शनपट एन. दत्तांना मिळाले; पण त्यातील गाणी लोकांचे मन जिंकू शकली नाहीत. अपवाद ‘काला समुंदर’सारख्या एखाद्या चित्रपटाचा. त्यामधील ‘मेरी तसवीर लेकर क्या करोगे...’ ही कव्वाली मात्र एन. दत्तांचे वेगळेपण दाखवते व आजही श्रवणीय आहे.

१९६० ते १९७० च्या दशकात त्यांनी ज्या चित्रपटांना संगीत दिले, त्यामध्ये ग्यारा हजार लडकियाँ, मेरे अरमान मेरे सपने, चाँदी की दीवार, हम पंछी एक डाल के, भाई-बहन, नया रास्ता अशा काही चित्रपटांचा समावेश होतो.

हिंदी चित्रपटांव्यतिरीक्त त्यांनी ‘बालो’ या एका पंजाबी चित्रपटालाही संगीत दिले होते. मराठी सृष्टीत तर अनेक गीते त्यांच्या संगीताने संपन्न झाली आहेत. ‘मधुचंद्र’ चित्रपटातील ‘मधु इथे अन् चंद्र तिथे...’, तसेच ‘हे चिंचेचे झाड दिसे मज...’ ही गीते, तसेच ‘अपराध’ चित्रपटातील ‘सूर तेच छेडिता...’ व ‘सांग कधी कळणार तुला...’ ही गीते एन. दत्तांच्या कलाकुसरीची साक्ष देतात. ‘बाळा गाऊ कशी अंगाई’ हा चित्रपट असाच मधुर गीतांचा! एन. दत्तांनी दिलेली अंगाई २०१८मध्येही कित्येक माता आपल्या छकुल्यासाठी गातात आणि ‘अरे अरे मोहना...’सारखे विषाद गीत पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते. ‘निळे गगन निळी धरा....’(मामाभाचे) या आणि वर उल्लेख केलेल्या गीतांमुळे मराठी चित्रपट संगीताला पुन्हा एकदा चैतन्य लाभले. 

१९८०मध्ये प्रदर्शित झालेला ‘चेहरे पे चेहरा’ हा त्यांनी संगीतबद्ध केलेला अखेरचा चित्रपट! त्यानंतर ते चित्रपटसृष्टीकडे वळले नाहीत. त्यांच्या मुलाने त्यानंतर एका चित्रपटाची निर्मिती करायचे ठरवले होते. संगीत अर्थातच एन. दत्ता देणार होते; पण... ते काम पूर्ण झालेच नाही आणि ३० डिसेंबर १९८७ रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले. 

महाराष्ट्र शासनाकडून त्यांना नागरी सन्मानाने गौरवण्यात आले होते. त्यांच्या निधनानंतर चार वर्षांनी अंधेरी (मुंबई) विभागात त्यांच्या निवासस्थानालगतच्या एका रस्त्याला मुंबई महानगरपालिकेने त्यांचे नाव देऊन एक कायमस्वरूपी स्मारकच निर्माण केले आहे. 

परंतु मला वाटते कलावंताने त्याच्या खास शैलीने तयार केलेली कलाकृती हेच त्याचे खरे स्मारक असते. त्या दृष्टिकोनातून विचार करता आता माझ्यापुढे ‘सुनहरे गीत’करिता चंद्रकांता, मिलाप, लाइट हाउस, ब्लॅक कॅट, नया रास्ता, धूल का फूल, साधना अशा चित्रपटांतील मधुर गीते खुणावत आहेत. परंतु वारंवार ऐकायला न मिळणारे ‘ग्यारा हजार लडकियाँ’ चित्रपटातील एका गीताकडे मी वळत आहे. दिग्दर्शक ख्वाजा अहमद अब्बास यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट १९६२मध्ये प्रदर्शित झाला होता. माला सिन्हा, भारत भूषण हे त्याचे नायक-नायिका होते. मजरूह सुलतानपुरींच्या अर्थपूर्ण गीतांना एन. दत्तांनी संगीतबद्ध केले होते. एकूण सात गाणी त्या चित्रपटात होती. त्यापैकी ‘दिल की तमन्ना थी....’ हे गीत चित्रपटात एकदा मोहम्मद रफी व आशा भोसले यांच्या स्वरांत होते, तर दुसऱ्या प्रसंगात ते फक्त मोहम्मद रफींनी गायले होते. ‘दो पहेलू, दो रंग दो रूप’ या स्वरूपातील ही गीते मधुर संगीत, साजेसा स्वर आणि आशयसंपन्न शब्द यामुळे ‘सुनहरी’ बनून गेली आहेत. एक सुखद व दुसरे दुःखद असे ते दोन प्रकार आहेत; पण येथे आपण एकच प्रकार पाहू या! दोघे प्रेमी मिळून आनंदाने गीत गातात. ‘तो’ सुरुवात करताना म्हणतो - 

अपना भी कोई साथी होता हम भी बहकते चलते चलते

(आमच्या) हृदयाची/मनाची अशी इच्छा होती, की आम्ही आमच्या ध्येयापासून (एखाद्या प्रिय जोडीदाराबरोबर) दूर निघून जाऊ! (त्याच्या प्रेमात पडून या ठराविक जगापासून दूर जाऊ) आम्हाला कोणी असा जोडीदार मिळावा, की ज्याच्याबरोबर चालता चालता आमचा रस्ता चुकून जाईल. 

आपल्या प्रियकराच्या सुरात सूर मिसळून ‘ती’ही याच दोन ओळी गाऊ लागते आणि मग पुढे म्हणते - 

होते कहीं हम और तुम ख्वाबों की रंगीन वादी में गुम

मी आणि तू रंगीत स्वप्नांच्या घाटात/दरीत हरवून जावे (असे मला वाटते) 

त्यावर ‘तो’ म्हणतो -

फिर उन ख्वाबों की वादीसे उठते आँखे मलते मलते

(आणि असे हरवून गेल्यावर) त्या स्वप्नांच्या दरीतून डोळे चोळत चोळत बाहेर पडावे. 

आपल्या जोडीदाराबरोबर असे प्रणय प्रसंग रंगवत ‘तो’ पुढे म्हणतो - 

हसती जमीं गाते कदम चलते नजारे चलते जो हम

सौख्याने हसणारी धरणी, गाणारी पावले (गाण्याच्या तालावर पडणारी पावले) अशी दृश्ये, असे नजारे आम्ही चालत असताना आमच्या बरोबर चालत असावेत. 

प्रियकराच्या या स्वप्नांना जोड देत ‘ती’ पुढे म्हणते - 

रुकते हम तो रुक रुक जाता ढलता सूरज ढलते ढलते

(अशी आपण वाटचाल करत असताना जर) आपण थांबलो, तर तो मावळतीस लागलेला सूर्यही थोडा थोडा थांबत थांबत मावळत जावा. (म्हणजे प्रीतीचे क्षण लवकर न संपावेत.)

दोघांच्या या एकमेकांवरच्या प्रेमाने आनंदित झालेल्या मनामध्ये केवळ अशी सुखस्वप्ने नाहीत, तर अडचणीच्या प्रसंगी कसे वागणार याचेही ती दोघे वर्णन करतात. ‘तो’ म्हणतो – 

और श्यामें गम बन के अगर दुखके अंधेरे करते सफर

आणि सायंकाळची व्याकूळ बनवणारी कातरवेळ दुःखांचा अंधारातील प्रवास घेऊन जर वाट्याला आली तर -
तेव्हा ‘ती’ लगेच म्हणते -

राहों के दीपक बन जाते प्यार भरे दिल जलते जलते 

(आपली दोघांची) प्रेमाने भरलेली अंतःकरणे पथदर्शक दिवे बनून जळत राहतील (व मार्ग दाखवतील! थोडक्यात काय, तर दु:खाच्या प्रसंगी आपण दोघे एकमेकांचे आधार बनू!) 

मजरूह प्रेमाची ही भाषा उपमांनी भरून मांडतात! पडद्यावरचा नायक भारतभूषण आणि नायिका गोड चेहऱ्याची माला सिन्हा! एन. दत्तांचे लाजवाब संगीत व चाल! मोहम्मद रफी व आशा भोसले यांचे मधुर स्वर - सारे ‘सुनहरे’!

अशाच ‘सुनहऱ्या’ क्षणांच्या स्मृती हृदयात ठेवून २०१८चा निरोप घेऊ या आणि २०१९मध्ये आणखी काही ‘सुनहरी गीते’ पाहू या, अनुभवू या! सर्वांना शुभेच्छा!

- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या त्यांच्या ‘सुनहरे गीत’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/8ABN2G या लिंकवर एकत्रितपणे उपलब्ध आहेत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
विदुला करंजेकर About 237 Days ago
सुंदर माहिती. चित्रपटसृष्टीला आपल्या कलेने समृद्ध करणा-या अनेक ज्ञात-अज्ञात कलाकारांची ओळख या सदरामुळे नविन पिढीला झाली. त्याबद्दल धन्यवाद पाठकजी काका. यापुढेही असेच दर्जेदार लिखाण तुमच्याकडून होवो हि सदिच्छा. 🌹🌹
0
0

Select Language
Share Link
 
Search