Next
‘जगाच्या सुखाची, भल्याची बडबड मला करायची आहे...’
मानसी मगरे
Sunday, November 19, 2017 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

जात, धर्म, पंथ न मानता माणसातल्या माणूसपणावर श्रद्धा ठेवणारे ज्येष्ठ साहित्यिक राजन खान आज, १९ नोव्हेंबर रोजी ५६व्या वर्षात पदार्पण करत आहेत. बडोदा येथे भरणार असलेल्या आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी ते उमेदवार म्हणून उभे आहेत. या दोन्हींचं औचित्य साधून ‘बाइट्स ऑफ इंडिया’ने त्यांच्याशी विशेष संवाद साधला. ती दीर्घ मुलाखत येथे प्रसिद्ध करत आहोत. 
..........
राजन खानआपल्याला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! वेगळे विचार मांडणारे लेखक म्हणून आपण प्रसिद्ध आहात. लेखक होण्यामागची आपली नेमकी प्रेरणा काय होती? लेखक झाला नसतात, तर कोण झाला असतात, असं वाटतं? 
- मुळात लेखक व्हायचं म्हणून मी लेखक झालेलो नाही. वयाच्या बाराव्या-तेराव्या वर्षी मी लिहायला लागलो. त्या वेळच्या माझ्या मानसिक अनाथपणात त्याची कारणं होती, हे आज कळतं. आठव्या वर्षी चुकून वाचनाचा नाद लागला, चुकून पुस्तकं वाचत राहिलो. यातून आपल्यालाही गोष्टी सांगता येतील असं वाटत गेलं. गोष्ट सांगणं हा माणसाचा नैसर्गिक स्वभाव आहे. माझ्याकडे एक गोष्ट आहे आणि तुला मी ती ऐकवतो, असं प्रत्येकाच्या मनात 
सुरू असतं. माझ्याकडे त्या वेळी माझ्या गोष्टी ऐकणारं कोणी नव्हतं. मग कागद सापडला. मनात येणारं सगळं त्याला सांगायची सवय लागली. त्यात दुःखाचं, सुखाचं असं सगळं होतं. माझ्या त्या वेळच्या एकटेपणाला कागदाने आधार दिला. नंतर काही काळाने कळलं, की हे लिहिलेलं छापता येतं. ते छापत गेलो आणि मी लेखक बनलो. लोक मला लेखक म्हणत असले, तरी मी स्वतःला कधी लेखक नाही मानलं. लेखक म्हणजे आणखी काही वेगळं असू शकेल. मोठं असू शकेल. लिहिणं हा माझ्या जगण्याचा एक भाग आहे. लिहिण्यातून कोणाशीतरी बोलल्याचं समाधान मिळतं. लिहिलेलं सगळं छापलंच गेलं पाहिजे असाही माझा आग्रह नव्हता, नाही. माझी गोष्ट मी कोणालातरी सांगून झालीये इतकंच पुरेसं असतं. मला वाटतं लिखाण दोन गोष्टींचं होऊ शकतं. एक तुम्हाला खटकलेल्या गोष्टीचं आणि दुसरं तुम्हाला आवडलेल्या गोष्टीचं. मलाही तो नियम लागू आहे आणि ते मी लिहितो. आजकाल माणसं पूर्णवेळ उपलब्ध नसतात. कागद २४ तास उपलब्ध असतो. दुसरी गोष्ट, बोलताना तुमच्या तोंडून वावगा एखादा शब्द जाऊ शकतो, ज्याने समोरचा माणूस खवळू शकतो. कागद कधीही तुमच्यावर खवळत नाही. असा हा कागद तुमचा इतका सुंदर, मुका जोडीदार आहे, जो तुम्हाला सहन करतो. मग मोकळेपणाने बोलण्याची, व्यक्त होण्याची योग्य जागा कागदच आहे. मला लिहिण्याचा नाद आहे; पण लेखक ही ओळख जगाने दिली.    

मुळात लेखक झालो नसतो तर काय झालो असतो, हा चमत्कारिक विचार मी कधी केलेलाच नाही. नाही माहीत मला, मी काय झालो असतो. आजवर आयुष्यात मी शेती, मास्तरकी, पत्रकारिता, रंगारी, मजुरी अशी अनेक कामे केली आहेत. मला वाटतं जे जे जमेल ते माणूस करत राहतो. एका तत्त्वज्ञानावर माझा पूर्ण विश्वास आहे. आपण चारही बाजूंनी कोंडलो गेलोय असं वाटत असतानाही तुम्हाला निसटण्यासाठी कुठेतरी एक फट असते. मला वाटतं, माणसाचा मेंदू विचारपूर्वक चालत असेल, तर तो कधीही कोंडला जाऊ शकत नाही. माणूस ही जातच अशी आहे, की जी थांबून राहत नाही. यानुसार विचार केला, तर लेखन करणं हीदेखील एक प्रकारची मजुरी आहे. मी लेखक झालो नसतो, तर मास्तर, रंगारी, शेतकरी, मजूर यांपैकी काहीतरी झालो असतो. लेखन करणं हे एक प्रकारचं रंगारी काम आहे, शेती आहे, मास्तरकी आहे. सगळंच आहे, असं मला वाटतं.  

राजन खान९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीला आपण उमेदवार आहात. हे पद मिळाल्यास काय नेमकी भूमिका असेल?
- आजवर आमच्या ‘अक्षर मानव’ संस्थेच्या माध्यमातून जे करत आलोय, तीच भूमिका ठरवून तेच कार्य व्यापक पद्धतीने करण्याचा मानस आहे. माझ्या जगण्याची आणि ‘अक्षर मानव’च्या जगण्याची वेगळी अशी भूमिका नव्हतीच कधी. ती एकच होती. ती अशी, की साहित्य आणि समाजातली विविध क्षेत्रं माणसाला सुखी करण्यासाठी जन्माला येतात. ‘अक्षर मानव’मधूनही आम्ही तेच करत आलो. लेखक म्हणूनही मी तेच लिहित आलो. माझ्या साहित्यातही समाज येत राहिला आहे आणि समाजाच्या कामातही माझं साहित्य येत राहिलं. महाराष्ट्राच्या जनमानसात साहित्य संमेलनाध्यक्षपदाला एक मोठं वलय आहे. मी करत असलेली कामं त्या वलयाचा उपयोग करून सर्वदूर पोहोचवता येतील, संघटन वाढवता येईल. जास्तीत जास्त माणसं जोडता येतील. अध्यक्षपद ही साहित्यसृष्टीकडून मिळणारी एक व्यापक जागा आहे. आणखी खोलवर जाऊन काम करायला ही जागा खूप उपयोगी आहे, असं लक्षात आल्यावर या कामासाठी हे पद वापरलं गेलं पाहिजे असं वाटतं. मी बडबडीसाठी जन्माला आलेला माणूस आहे. अध्यक्षपदही मला यासाठीच हवं आहे. ‘जगाच्या सुखाची, भल्याची बडबड मला करायची आहे..’  

कला, नाटक, चित्रपट, भाषा, इतिहास या अनुषंगाने काम करणारी केंद्रं राज्यभर आणि राज्याबाहेर सुरू करायची आहेत, असं आपण एका मुलाखतीत सांगितलं होतं. त्या केंद्रांबाबतची तुमची नेमकी संकल्पना आणि त्यामागचा विचार काय आहे?
- यासाठी पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला ‘अक्षर मानव’ या आमच्या संघटनेबद्दल सांगितलं पाहिजे. ‘अक्षर मानव’ म्हणजे माणसांना जोडणारी संघटना. आज जगभर पसरलेली जवळजवळ साडेसातशे कोटी लोकं आहेत आणि ती नेहमीच जात, धर्म, लिंग अशा कोणत्या ना कोणत्या कारणांनी एकमेकांशी भांडत आली आहेत. दुसऱ्यावर सत्ता गाजवणं आणि त्याला अंकित करणं हा माणसाचा स्वभाव राहिला आहे. आपल्याकडे समाजरचना तयार झाल्यानंतर त्याचे काही नियम केले गेले. यामागे मूळ भूमिका आहे, ती म्हणजे माणूस शांतपणे जगला पाहिजे. यासाठी स्वतः आनंदी जगताना त्यानं इतरांचंही जगणं आनंदी केलं पाहिजे. त्यासाठी हातभार लावला पाहिजे. परंतु इथपर्यंत माणूस आजवर पोहोचलेलाच नाही. माणसाला त्याच्या माणूसपणाची आठवण करून देणं, त्यानं जे भेद तयार केले आहेत, त्यातून त्याला बाहेर काढणं आणि एकानं दुसऱ्याला शांततेनं जगू देणं यासाठी केला जाणारा प्रयत्न म्हणजे अक्षर मानव.  

यात माणसाच्या जगण्यातली सर्वच क्षेत्रं येतात. केवळ साहित्य असंच नाही, तर या इतर सर्व क्षेत्रांत प्रत्यक्ष काम करणं, त्यातली जी आदर्श आहेत तिथपर्यंत या क्षेत्रांना घेऊन जाणं आणि जगभरातल्या सगळ्या भेदांना विरोध करणं हे या माध्यमातून करण्याची इच्छा आहे. त्या दृष्टीनं राज्यभर काम सुरू केलं आहे. स्थायी केंद्रं उभी केली आहेत. प्रत्येक जिल्ह्याच्या, तालुक्याच्या ठिकाणी ते सुरू व्हावं हे स्वप्न आहे. त्या त्या ठिकाणच्या स्थानिक लोकांना सहभागी करून घेऊन यासंबंधीचे उपक्रम राबवणारी केंद्रं असली पाहिजेत. या पद्धतीनं आखण्या केलेल्या आहेत आणि तसे आम्ही राबतो आहोत. महाराष्ट्रात नऊ आणि देशभर असंख्य केंद्रं उभी करण्याचा मानस आहे. याची सुरुवात बारामतीतल्या मुर्टी या गावापासून झाली आहे. साहित्याच्या क्षेत्रात काम करत असताना, ‘अक्षर मानव’ चित्रपट निर्मितीतही उतरतं आहे. सामाजिक कार्यातही हातभार लावण्याचं काम केलं जात आहे. ही केंद्रं म्हणजे माणसांशी संवादी होण्याचं काम करण्याची माध्यमं असतील. 

‘मला करुणेचा प्रवाह आवडतो..’ असं तुम्ही अनेकदा म्हणता.. ते नेमकं काय आहे?
- हो.. मला करुणेचा प्रवाह आवडतो. माणसाचं जग, त्याच्या सगळ्या क्षेत्रांचा विकास करुणेच्या आधारावर झालेला आहे, होतो, असं मला वाटतं. माणसांना एकमेकांबद्दल आस्था वाटली पाहिजे. एकंदरीतच जे विज्ञान जन्माला आलं, जे शोध लावले गेले, ते माणसाबद्दलच्या करुणेतून आलेलं आहे. माणूस जगला पाहिजे, सुखी जगला पाहिजे या भावनेतून हे सगळं जन्माला आलेलं आहे.  ही करुणा जिवंत राहिली पाहिजे. ती बळकट करणं हा आमच्या कार्याचा मुख्य उद्देश आहे.

कोणतीही बोलीभाषा किंवा ग्रामीण भाषेबद्दल अर्थातच आक्षेप नाही; मात्र अलीकडच्या काळात व्याकरण आणि शुद्धलेखनाबाबत सर्वच स्तरांत अनास्था दिसून येते. सोशल मीडियातही फॉरवर्ड होणारे बहुतांश संदेश वाईट प्रकारच्या मराठीत असतात. ही परिस्थिती कशी सुधारू शकेल...? आणि याबाबत तुमचं काय मत आहे?
- मधल्या काळात मराठीच्या बाबतीत आपलं बऱ्यापैकी दुर्लक्ष झालं. शिक्षणव्यवस्था बदलल्या, विशेष म्हणजे काही गैरसमज पसरवले गेले. उदाहरणार्थ, व्याकरण हा शब्द. व्याकरण ही बाब काही विशिष्ट जातींपुरतीच आहे, असा एक भ्रम पसरवला गेला. मुळात जगातली कोणतीही भाषा कोणत्याही धर्माच्या मालकीची नसते, नाही. भाषा तयार होण्यासाठी लाखो लोक शेकडो वर्षं राबत असतात आणि यामध्ये सर्व समाजघटकांचा सह्भाग असतो. त्याशिवाय ती तयारच होऊ शकत नाही. हे होत असताना दुसरीकडे भाषेचा एक नियमितपणा असला पाहिजे, सगळीकडे या भाषेची एकवाक्यता असली पाहिजे, याचा विचार होऊन व्याकरण तयार केलं गेलं. इथंही परत हे व्याकरण कोणी एका विशिष्ट जातीनं-धर्मानं तयार केलेलं नाही. ते तज्ज्ञ लोकांनी तयार केलं आहे. व्याकरण म्हणजे काही विशिष्ट जातींची निर्मिती हा जो भ्रम पसरवला गेला, त्यातून ही मराठीबद्दलची अनास्था वाढत गेली. हा भ्रम दूरू करून त्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत. खरं तर बोलीभाषा म्हणजेच खरी भाषा. परंतु तिलाही एक व्याकरण असलं पाहिजे असं मला वाटतं. कारण वेलांटी, उकार, मात्रा, अनुस्वार यांमुळे शब्दांचे अर्थ बदलतात. त्यामुळे त्यासाठी व्याकरण असणं आवश्यक आहे. 

अर्थात ही लिहिता-वाचता न येणाऱ्या, केवळ बोलणाऱ्या लोकांची जबाबदारी नाही. ती लिहिता-वाचता येणाऱ्यांची जबाबदारी आहे. ज्या तळमळीनं आपण परदेशी भाषा शिकतो, त्या तळमळीनं मराठी शिकलं पाहिजे. आपल्या नावाचं स्पेलिंग आपण कधी चुकू देत नाही; मात्र तेच नाव मराठीत लिहिताना त्याच्या इकार-उकारात गडबड असते. ते चालतंही. ही स्वतःच्याच भाषेबद्दलची असलेली अनास्था दूर केली पाहिजे. आपल्याच भाषेबद्दल अनास्था असणं, हे गैर वाटतं मला. मराठीच्या सगळ्या बोली आपल्या आहेत, सगळे लोक आपले आहेत, मराठीच्या या सगळ्या बोलींवर आपण सगळ्यांनीच तुडुंब प्रेम केलं पाहिजे. 

इतर भाषांमधले शब्द आपल्या भाषेत येणं याचंही प्रमाण अलीकडे वाढताना दिसतं. भाषांचा हा संकर कितपत योग्य आहे असं वाटतं? यामुळे भाषा शुद्ध राहू शकेल का?
-  मुळात शुद्ध मराठी, शुद्ध इंग्रजी असं काही नसतं या जगात. एका ठराविक मर्यादेपर्यंत भाषेचा हा संकर चालतो, तो चालवून घेतला पाहिजे. गेल्या ४० लाख वर्षांत जगभर स्थलांतरं होत आली आहेत. गेल्या ८० हजार वर्षांचा तर माणसाच्या जगण्याचा थेट इतिहास सापडतो. या इतिहासानुसार आपण सगळेच स्थलांतरित आहोत. आपल्यापैकी कोणाचीही कोणती एक भूमी नाही. ही स्थलांतरं आजही सुरू आहेत. अख्ख्या पृथ्वीसमोर राष्ट्र ही संकल्पना छोटी आहे. आपण सगळे पृथ्वीचे नागरिक आहोत. मानवाच्या या फिरस्तीत भाषा तयार होत राहिल्या. म्हणजेच मराठी ही एक भाषा तयार होण्यासाठी केवळ मराठी माणसेच झटली, त्यांनीच ते केलं, असं नसतं. त्यासाठी इतर असंख्य गोष्टी कारणीभूत आहेत. अवघ्या पृथ्वीवर मिळून हा कारभार चालतो. या इतक्या व्यापक दृष्टिकोनातून भाषेकडे पाहायला शिकलं पाहिजे. केवळ महाराष्ट्राची मक्तेदारी म्हणजे मराठी असं होत नाही. जगभरातल्या अनेक भाषांचे शब्द मराठीत सापडू शकतात आणि मराठीतले शब्द इतर भाषांमध्येही मिळतात. मुळात भाषा या एकमेकांच्या भगिनी आहेत. त्यामुळे भाषांमध्ये संकर होत राहणार, त्याला नाईलाज आहे. मी तो संकर करून घेतो का? तर नाही, परंतु माझ्या लिखाणात अनेक भाषांचे शब्द सापडतील. माझ्यापुरतं सांगायचं झालं, तर मी इंग्रजी शब्द टाळतो आणि शक्यतो देशी शब्द वापरण्याचा माझा प्रयत्न असतो. याबाबत अनेकांच्या वेगवेळ्या लकबी होऊन जातात. ते स्वीकारलं पाहिजे. या प्रकाराकडे फार चिकित्सकपणाने पाहू नये असं मला वाटतं; पण हे करताना त्याचं प्रमाण मर्यादित आहे ना आणि त्यानं आपली भाषा मरत नाही ना याचंही भान ठेवलं पाहिजे. 

साहित्य लेखनासंदर्भात कार्यशाळा घेताना इतर अनेक नवीन विषयांवरच्या कार्यशाळा घेण्याचा उपक्रम आपण सुरू केलात.. याबाबत काय अनुभव आला?
- लेखनाबरोबरच चित्रपट, लैंगिकता, इतिहास, कृषी अशा काही वेगळ्या विषयांवरील कार्यशाळा घेताना मुख्य हेतू माणसांना एकत्रित आणणं हाच होता. आपण सगळी पृथ्वीवर प्रवास करणारी माणसं आहोत आणि पुढच्या पिढ्या जन्माला घालणारी लोकं आहोत. या कार्यशाळांमध्ये होणाऱ्या संवादामधून याबाबतचं ज्ञान वाढीस लागेल असं वाटतं. तसं पाहिलं तर माणूस जेव्हापासून कपडे घालायला लागला, तेव्हापासून तो जास्त खासगी झाला. खूप दडवादडवी करू लागला आणि व्यक्त होण्यापासून दूर जाऊ लागला. यामुळे एक विशिष्ट घुसमट होते आणि माणूस एकांगी होतो. इथे गरज असते खुल्या संवादाची. ती गरज अशा कार्यशाळांमधून पूर्ण होऊ शकते असं वाटतं. नकळत निरीक्षणांमधून तुमच्या समस्यांची उत्तरं तुम्हाला मिळू शकतात. म्हणून मला गर्दी जमवण्याची सवय आहे. 

वाचनसंस्कृतीबद्दल तुमचं काय निरीक्षण आहे?
- निरीक्षण असं आहे, की वाचनसंस्कृती या नावाचा शब्दच मुळात अस्तित्वात नाही. तो कधीच नव्हता. आपण तो का जन्माला घालून ठेवला आहे, मला कळत नाही. लोक वाचतातच. वाचनसंस्कृती कमी होत चालली आहे वगैरे असं हल्ली काही तरी बोललं जातं. याला माझाच एक उलट प्रश्न असा आहे, की वाचनसंस्कृती होती कधी?? त्याच्या काळाचा काही पुरावा आहे का कोणाकडे..? सगळ्या भाषांमधली सगळी अक्षरं माणूस तयार करायला लागल्यापासून वाचनसंस्कृती आहेच की. अक्षरं वाचत आहेतच की लोकं. उदाहरणच द्यायचं झालं, तर जगातलं एक तरी दुकान बिनपाटीचं दिसतं का? हे वाचनसंस्कृती असल्याचं उदाहरण नाही का? जेव्हा साधनं नव्हती, तेव्हा लोकांनी दगडांवर लिहिलं, गुहांमध्ये लिहिलं, कागदाचा शोध लावला, शाईचा शोध लावला. ज्यांना जमेल त्यांनी लिहिलं, ज्यांना जमलं त्यांनी वाचलं. जगभरातली सगळी लोकसंख्या एकाच वेळी पुस्तकं वाचत बसली आहे, हे दृश्य केवळ अशक्य आहे. वाचनसंस्कृती होती कधी..? आणि ती होती तर अजूनही आहेच ना.. इतकंच कशाला घरातील पोरं-बाळंही हातात काही मिळालं तर रेघोट्या मारतातच की. ते ही अभिव्यक्त होण्याची धडपड करतातच की.
 
दुसरी गोष्ट अक्षराचं, साहित्याचं ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवणारे काही मध्यस्थही आहेत. लोककला, वाद्यं, चित्रं, संगीत, चित्रपट, नाटकं, कीर्तन यांमधून वाचन पोहोचलंच आहे. मला वाटतं हीच खरी वाचनसंस्कृती आहे. केवळ अक्षरं वाचणं म्हणजे वाचनसंस्कृती नाही. यात कानाचा, डोळ्यांचा आणि तोंडाचाही उपयोग झाला पाहिजे. माणसाच्या अभिव्यक्त होण्याच्या माध्यमांतून तो अभिव्यक्त होत आला आहे आणि समोरचा माणूस ते समजून घेत आला आहे. या अर्थानंही वाचन पाहिलं पाहिजे. एकही अक्षर न वाचलेला माणूस पक्ष्यांच्या सवयीवर बोलतो, इथं त्यानं निसर्गाचं वाचन केलं असंच म्हणावं लागेल. थोडक्यात सांगायचं तर, ‘वाचनसंस्कृती नाही, असं म्हणणं मला फारच गैर वाटतं...’ केवळ पुस्तकांच्या खपांच्या आकड्यांवर ती ठरणार असेल, तर पुस्तकंही खूप खपतात पृथ्वीवर. 
काळ जसजसा विकसित होत गेला आहे, तसतशी माणसानं त्याच्या अभिव्यक्तीची निरनिराळी साधनं शोधली आहेत. अप्रतिम प्रकारची वाचनसंस्कृती जगभर आहे. म्हणूनच जगाचा विकास झाला आणि होत आहे. वाचनसंस्कृतीची शेकडो माध्यमं आहेत. केवळ एका पुस्तकावर अडून बसणं योग्य नाही. वाचनसंस्कृतीचा मूळ उद्देश आहे ज्ञान आणि ज्ञानाची अनेक माध्यमं माणसानं सतत विकसित केली आहेत. 

(राजन खान यांची सर्व पुस्तके ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी येथे क्लिक करा.)

(राजन खान यांचे विचार सोबतच्या व्हिडिओतून जाणून घेता येतील. त्यांनी साधलेल्या संवादाचा ऑडिओ ऐकण्यासाठी येथे क्लिक करा. खान यांच्याबद्दलचा स्फुट लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search