Next
व्हॉट्सअॅपवरून बल्क मेसेज पाठवल्यास कायदेशीर कारवाई शक्य
BOI
Friday, June 14, 2019 | 05:08 PM
15 0 0
Share this article:नवी दिल्ली :
व्हॉट्सअॅप हे वैयक्तिक उपयोगासाठीचे अॅप असून, त्याद्वारे मोठ्या प्रमाणावर (बल्क किंवा ऑटोमेटेड) मेसेजेस पाठवल्यास अकाउंट बंद होण्यासोबतच कायदेशीर कारवाईही होऊ शकते. खोट्या बातम्यांचा प्रसार व्हॉट्सअॅपद्वारे मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे लक्षात आल्यावर गेल्या काही महिन्यांपासून ही कंपनी वेगवेगळे उपाय राबवत आहे. त्यातीलच पुढचे पाऊल म्हणून या अॅपचा बेकायदा वापर करणाऱ्या अकाउंट्सवर सात डिसेंबर २०१९पासून कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे व्हॉट्सअॅपकडून जाहीर करण्यात आले आहे. 

कंपनीने आपल्या 'फ्रिक्वेंटली आक्स्ड क्वेश्चन्स'च्या विभागात दिलेल्या नव्या माहितीनुसार, या माध्यमाचा गैरवापर करणाऱ्यांविरोधात (म्हणजेच वापराच्या अटींचे उल्लंघन करणाऱ्यांवर) आता कडक कारवाई करण्यात येणार आहे. हे माध्यम केवळ वैयक्तिक वापराचे असून, व्यवसायांना व्हॉट्सअॅपचे व्यावसायिक अकाउंट (बिझनेस व्हॉट्सअॅप) उघडून त्याद्वारे आपल्या ग्राहकांशी संवाद साधता येतो; मात्र काही व्यक्ती/संस्था या अॅपद्वारे बल्क/ऑटोमेटेड मेसेज पाठवतात किंवा तशा प्रकारे मेसेज पाठवण्यासाठी मदत करतात, असे आढळून आले आहे. काही कंपन्यांकडून स्पॅम मेसेजेसही पाठविले जातात. अशी अकाउंट्स बंद केली जाणार असून, त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचा पर्यायही सात डिसेंबर २०१९नंतर कंपनीकडून अवलंबला जाणार आहे. अशा प्रकारची व्हॉट्सअॅप अकाउंट्स शोधण्यासाठी कंपनीचे प्रयत्न सध्या सुरू असून, त्याद्वारे दर महिन्याला वीस लाख अकाउंट्सवर बंदी घातली जाऊ शकते, असे कंपनीचे म्हणणे आहे.  

व्हॉट्सअॅप ही फेसबुकच्या मालकीची कंपनी आहे. भारतात वीस कोटीहून अधिक जण हे अॅप वापरतात. अलीकडेच रॉयटर्स या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात असे आढळले होते, की ५२ टक्के नागरिकांना बातम्या व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून मिळाल्या होत्या. व्हॉट्सअॅपच्याच माध्यमातून फेक न्यूज अर्थात खोट्या बातम्या पसरण्याचे प्रमाण अधिक आहे. भारतीय निवडणुकीत व्हॉट्सअॅप हे खोट्या बातम्यांचे कृष्णविवर ठरले, असे बीबीसीने एप्रिल २०१९मधील एका लेखात म्हटले होते. भावना भडकवणारे काही मेसेजेस व्हायरल झाल्यामुळे हिंसाचाराच्या काही घटनाही घडल्या होत्या. त्यामुळे यावर उपाय शोधण्याचे आदेश भारत सरकारने व्हॉट्सअॅपला दिले होते. त्यानंतर व्हॉट्सअॅपकडून मेसेज फॉरवर्ड करण्यावर बंधने घालण्यात आली. मेसेज एका वेळी पाच जणांनाच फॉरवर्ड करता येऊ लागला आणि त्यावर 'फॉरवर्डेड' असा टॅगही दिसू लागला. मेसेजची शहानिशा न करता तो फॉरवर्ड करू नये, याकरिता जनजागृतीसाठी व्हॉट्सअॅपकडून प्रसारमाध्यमांत जाहिरातीही देण्यात आल्या होत्या. आता कंपनीने त्यापुढील पाऊल उचलले आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅप जपून वापरणे, मेसेजमधील मजकुराची खात्री पटल्याशिवाय तो फॉरवर्ड न करणे आणि बल्क मेसेजेस न पाठविणे हे युजर्सच्या हातात आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search