Next
लोकांची, लोकांसाठी, लोकांमुळे होणारी यात्रा..
BOI
Saturday, March 31, 2018 | 09:45 AM
15 0 0
Share this story


रस्त्यात एक साधू दिसला. त्याला चक्कर येत होती. अस्वस्थ दिसत होता. काही लोक त्याच्याजवळ जमले होते. त्याला आता चालणंही अशक्य होतं. जवळपास वैद्यकीय सुविधा नव्हती. ती शेषनागलाच मिळू शकणार होती. तेवढ्यात एक घोडेवाला जाताना दिसला. काही लोकांनी पैसे जमवून त्या घोडेवाल्याला त्या साधूला शेषनागपर्यंत पोहचवायला सांगितलं.... स्वच्छंद भ्रमंती करणाऱ्या एका तरुण लेखकाच्या अमरनाथ भटकंतीच्या ‘अमरनाथ ट्रेक’ या ट्रॅव्हलॉगचा हा बाविसावा भाग.. 
......................................
त्या काश्मिरी माणसाला नमस्कार करून मी पुढे निघालो. अतिशय त्रासदायक असा पिस्सू टॉपचा रस्ता पार केल्यावर पुढचा रस्ता सरळ सपाट होता. मी पुढे चालत राहिलो. उत्साह संचारला होता. लंगरमध्ये लोक गाण्यावर नाचत होते. तेथील भंडारावाले लोक जेवण्यासाठी सर्वांना प्रेमाने आवाहन करत होते. सगळं काही मोफत आणि प्रेमाने.! हे फक्त अमरनाथ यात्रेतच दिसतं! हे फक्त भारतातंच दिसू शकतं.

काही लोकांना घरात पाहुणे आलेले नको असतात. त्यांचा पाहुणचार करण्यास ते नाक मुरडतात. मला अशा लोकांची, त्यांच्या आयुष्याची आणि त्यांच्या विचारांची फार दया येते. असे लोक किती छोटं आयुष्य जगतात. आपल्याच अहंकाराच्या छोट्या डबक्यात ते जगत असतात आणि सगळ्यात विनोदी म्हणजे याचा त्यांना माजही असतो. 

जेव्हा असं काही बारा हजार फुटांवर लोक प्रेमाने जेवायला आवाहन करतात, गरम चविष्ट अन्न खाऊ घालतात. लोकांची पावसात, नैसर्गिक आपत्तीत काळजी घेतात. थंडीत जवळचे ब्लॅंकेटही दुसऱ्याला देऊ करतात, तेव्हा स्वतःच्या डबक्यातील अस्वच्छ विचार, अहंकाराच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडतात. अशा लोकांमुळे माणुसकीवर विश्वास पुन्हा बसू लागतो. असे लोक म्हणजे कलियुगातील कर्ण आहेत.

मी आपल्या सखीसोबत म्हणजेच लाठीसोबत चालू लागलो. निर्सगाचे अवाढव्य रूप समोर दिसत होते. एका बाजूने पर्वताचा कडा दुसऱ्या बाजूने उतरती बाजू दरीत जाताना. दरीत लीडर नदीचा बर्फ झालेला. ग्लेशियररुपी लीडर. रस्त्यात मध्येच बर्फ लागायचा. तो मातीने काळा झालेला बर्फ तुडवत जायचो. लोकांचे विस्कळित झालेले समूह पुन्हा एकमेकांना भेटू लागले. लोक रस्त्याच्या कडेने दगडांवर विश्रांती घेत बसलेले होते. कोणी मागे राहिलेल्या आपल्या सोबत्यांची वाट बघत होते. रस्ता आता सपाट होता. 

झाडे कमी झाली होती. गवताळ रस्ता होता. १२ हजार फूटांच्या वर झाडे जगत नाहीत. कुठे काही झुडपे दिसत होती. आकाश स्वच्छ होतं. जवळपास एक किमी चाललो. पिस्सू टॉप मागे राहिला. तेवढ्यात एक साधू दिसला. त्याचे सोबतीही बसलेले दिसले. त्या साधुचं वय साठी पार होतं. त्याला चक्कर येत होती. अस्वस्थ दिसत होता. काही लोक त्याच्याजवळ जमले होते. त्याला आता चालणंही अशक्य होतं, असं दिसत होतं. ब्लड प्रेशर वाढलं असणार; पण जवळपास वैद्यकीय सुविधा नव्हती. ती शेषनागलाच मिळू शकणार होती.

तेवढ्यात एक घोडेवाला जाताना दिसला. काही लोकांनी मिळून पैसे जमवले आणि त्या घोडेवाल्याला त्या साधूला शेषनागपर्यंत पोहचवायला सांगितले. त्या साधूला घोड्यावर चढताही येत नव्हतं. अवस्था वाईट होती. तिघांनी मिळून त्याला घोड्यावर बसवलं. शेषनागला भेटू म्हणून त्याला समोर पाठवलं. मी माणूसकीचं दर्शन घेत जात होतो. लोकांची लोकांसाठी लोकांमुळे होणारी ही यात्रा आहे... 

(क्रमशः) 
- अभिजित पानसे
मोबाइल : ८०८७९ २७२२१ 
ई-मेल : abhijeetpanse.1@gmail.com

(‘अमरनाथ ट्रेक’ हा ट्रॅव्हलॉग दर शनिवारी ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर क्रमशः प्रसिद्ध होईल. त्यातील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/V6rLmU  या लिंकवर उपलब्ध असतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link