Next
... आणि मार्लेश्वर-गिरिजादेवीचा विवाह झाला!
मकर संक्रांतीच्या मुहूर्तावरील वार्षिकोत्सवाला हजारो भाविकांची उपस्थिती
संदेश सप्रे
Tuesday, January 15, 2019 | 05:00 PM
15 0 0
Share this article:

श्री देव मार्लेश्वर आणि गिरिजादेवी यांच्या विवाहातील कल्याणविधी सोहळ्याचे दृश्य.

देवरुख :
सह्याद्रीच्या पर्वतराजीत वसलेल्या मारळनगरीत (ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) वार्षिकोत्सवासाठी जमलेल्या हजारो भाविकांनी आज (१५ जानेवारी २०१९) मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर साक्षात परमेश्वराचा विवाहसोहळा याचि देही याचि डोळा अनुभवला. श्री देव मार्लेश्वर आणि कोंडगावची वधू गिरिजादेवी यांचा विवाह दुपारच्या मुहूर्तावर झाला. सनई-चौघड्याच्या सुरात, मंगलाष्टके आणि मंत्रोच्चाराच्या मंगलमय वातावरणात हा सोहळा थाटामाटात पार पडला. 

आंगवली येथील मूळ मठात विवाहापूर्वीचे सर्व विधी झाल्यावर १४ जानेवारी रोजी रात्री विडा भरण्यासह महाप्रसाद, नवस बोलणे, नवस फेडणे असे विधी पार पडले. त्यानंतर प्रथेप्रमाणे श्री देव मार्लेश्वराची मूर्ती, चांदीचा टोप सजविलेल्या पालखीत ठेवण्यात आला. गंगामाता आणि मल्लिकार्जुनाची मूर्तीही पालखीत स्थानापन्न करण्यात आली. 

त्याआधी आंबवची दिंडी, वांझोळेची कावड आणि लांज्याच्या दिंडीचे आगमन झाले होते. विवाहसोहळ्याचे यजमान वाडेश्वर देवाची पालखी आदींचे मानकरी आणि भाविकांसह आंगवली मठात सायंकाळी आगमन झाले. १४ जानेवारीला मध्यरात्री १२ वाजता ‘हर हर मार्लेश्वर’ असा जयघोष करीत हा लवाजमा मार्लेश्वर शिखराकडे निघाला. ढोल, ताशे, गुलालाची उधळण करून आणि फटाक्यांच्या आतषबाजीत श्री देव मार्लेश्वरची पालखी मार्गस्थ झाली. 

पालखी वाहण्याचा मान प्रथेप्रमाणे भोई समाजाचा होता. सोबत मशालजी म्हणून चर्मकार बंधू, मारळचे सुतार, अब्दागिर, कासारकोळवणचे ताशेवाले, चौरी, न्हावी बंधू याचप्रमाणे मानकरी आंगवलीचे अणेराव बंधू आदींसह हजारो भाविक यामध्ये सहभागी झाले होते. शिखराच्या पायथ्याजवळ असलेल्या पवईच्या पायरीवर हा सारा लवाजमा आणि साखरप्याहून आलेल्या वधू गिरिजादेवीची पालखी उत्तररात्रीनंतर एकत्र आली. त्यानंतर ‘हर हर महादेव’ अशा जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. शिखरावर पोहोचल्यावर तिन्ही पालख्यांचे प्रथेप्रमाणे स्वागत करण्यात आले. त्यानंतर तिन्ही पालख्या नियोजित ठिकाणी वस्तीला गेल्या. 

आज (१५ जानेवारी) पहाटे मुलीचे घर पाहणे, मागणी घालणे, मुलाचे घर पाहणे, पसंती, ठरावनामा, कल्याणविधीची वेळ ठरवणे असे विधी झाले. दुपारी १२ नंतर विवाहासाठी ३६० मानकऱ्यांना रीतसर निमंत्रण देण्यात आले. दुपारी १२ वाजल्यानंतरच्या मुहूर्तावर श्री देव मार्लेश्वर आणि गिरिजादेवीचे लग्न लावण्यात आले. 

यासाठी हिंदू धर्मातील लिंगायतधर्मीय शास्त्रानुसार पंचकलशाची मांडणी करण्यात आली होती. करवलीचा मान प्रथेप्रमाणे गोठणे गावाकडे होता. रायपाटण, लांजा, मार्लेश्वरचे मानकरी व विश्वस्त यांच्या पौरोहित्याखाली हा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला. 

विवाहानंतर उपस्थित भाविकांनी देवाला जानवी अर्पण केली. त्याचप्रमाणे नवीन प्रथेप्रमाणे नवरा-नवरीला आहेर देण्यात आला. या वेळी सौभाग्यवतींनी करंबेळीच्या डोहात फुले, पानाचा विडा, सुपारी, बांगड्या, हळद, पिंजर असे साहित्य असलेली परडी अर्पण केली. सर्व विधी झाल्यावर नवविवाहितांच्या मूर्ती मार्लेश्वराच्या गुहेत ठेवण्यात आल्या. यानंतर महाप्रसाद झाला. 

यात्रोत्सवाच्या ठिकाणी अनेक स्वयंसेवी संस्थांनी खिचडी प्रसाद, मोफत सरबत, पिण्याचे पाणी आदींचे वाटप, आरोग्य सुविधा असे उपक्रम राबविले. आजच्या यात्रोत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. आज तिन्ही पालख्यांचे वास्तव्य मार्लेश्वर शिखरावर राहणार असून, उद्या (१६ जानेवारी) सर्व पालख्या व मानकरी पायथ्याकडे येण्यास निघणार आहेत. 

(मार्लेश्वरबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search