Next
खूप काही शिकवून गेलेला बिहार दौरा...
BOI
Sunday, December 02, 2018 | 12:45 PM
15 0 0
Share this article:

१९६७मध्ये पडलेल्या दुष्काळाच्या वेळी ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक जण मदतकार्यासाठी तिकडे गेले होते. त्या वेळचे काही अनुभव गुर्जर यांनी ‘किमया’ सदरात गेल्या भागात सांगितले. त्यांचे आणखी काही अनुभव आजच्या उत्तरार्धात... 
..........
अन्नकेंद्रात चार-पाच जण कामाला होते. तांदूळ, डाळ, गहू आणि गूळ यांचा साठा एका खोलीत करून ठेवलेला होता. खिचडी किंवा दलिया असा एकच पदार्थ केला जाई. त्यासाठी लाकडाच्या चुली आणि मोठमोठी पातेली होती. दुपारी बाराच्या सुमारास बायका-मुलं गोळा होत. ताट आपलं स्वत:चं आणावं लागे. पाच-सहाशे व्यक्तींची पंगत असे. लांबलचक व्हरांडे असल्यामुळे जागेची अडचण नव्हती. आम्ही लोकांना वाढत असू. आलेल्या काही बायकांनासुद्धा मदतीसाठी घेण्यात येई. तासभर हा कार्यक्रम चाले. मुलांचा कल्ला खूपच होत असे. उकाडा प्रचंड असल्यामुळे आम्ही चड्डीवर किंवा क्वचित लुंगी घालून वावरत असू. मुलांना गप्प करण्यासाठी अनिल अवचट हातात काठी घेऊन धावाधाव करी. ते दृश्यं मोठं मजेशीर दिसे.

आम्हा चार जणांसाठी थोड्या पोळ्या आणि भाजी वेगळी केली जाई. संध्याकाळसाठीही व्यवस्था असे. ऊन कमी झालं, की आम्ही बाहेर फिरायला जायचो. तिथल्या एका छोट्या हॉटेलमधे चहा, भजी वगैरेचा समाचार घेतला जाई. मुक्कामाच्या ठिकाणी दूध येत असे. मास्टरजींच्या गॅस-शेगडीवर आम्ही चहा बनवत असू. बऱ्याच वेळा ते काम माझ्याकडे असे. रात्री वरच्या गच्चीवर सतरंजी टाकून आम्ही झोपायचो. पहाटे साडेचार वाजताच उजाडत असे. सातच्या आत विहिरीवर आंघोळी होऊन जात. खूप मजा वाटायची.

प्राचीन नालंदा

एकदा संध्याकाळी फिरायला गेलो असताना बाजूनं काही लोक मराठी बोलत जाताना दिसले. ते महाराष्ट्रातून आलेले लष्करी जवान होते. त्यांचं काम असं होतं, की नदीमधून पाण्याचे टँकर भरून, जिथे पाण्याचा दुष्काळ असेल अशा दूरदूरच्या गावात जायचं आणि तिथल्या लोकांना पाणी वाटायचं. मग राहिलेलं पाणी जवळपासच्या विहिरीत सोडून द्यायचं; ते जवान आम्हाला म्हणाले, ‘चला एकदा आमच्याबरोबर.’ दोन-तीन दिवसांनी आम्ही त्यांच्या ट्रकमध्ये बसून ६०-७० मैल दूरच्या एका गावात गेलो. वाटेत अभ्रकाच्या खाणी लागल्या. बिहारमध्ये अभ्रकाचं उत्पादन खूप होतं. हा प्रवास म्हणजे एक वेगळा अनुभव होता. तीव्र उन्हामुळे आम्ही डोक्याला फडकं गुंडाळत असू. बिहारच्या मुक्कामात आम्ही खूप फिरलो; पण सुदैवानं कोणालाच उन्हाचा त्रास झाला नाही.

पाटण्यात त्या वेळचे बिहारचे मुख्यमंत्री कर्पूरजी ठाकूर यांची भेट झाली होती. आम्ही मदतीसाठी तिथे गेल्यामुळे त्यांनी आमचं कौतुक केलं. परतण्यापूर्वी सुमारे तीन आठवड्यांनंतर ते पुन्हा एकदा विधानभवनात भेटले. त्यांनी लगेच आम्हाला ओळखलं, हे विशेष. संघ, समाजवादी आणि विविध पक्षांचे कार्यकर्ते काम करण्यासाठी आलेले होते. अनेक जणांशी ओळखी झाल्या. महात्मा गांधींचे खासगी सचिव महादेवभाई देसाई यांचे चिरंजीव नारायणभाई यांची तिथेच भेट झाली. पुढे पुण्यातही दोनदा ते आले असताना मी मुद्दाम त्यांना भेटलो होतो. नंतर ते गुजरातच्या एका विद्यापीठाचे कुलपती झाले.

सांगण्याची विशेष गोष्ट म्हणजे, नारायणभाई इंग्रजीत एक पाक्षिक काढत असत. त्याचे दोन अंक त्यांनी मला दिले. युरोपमधल्या एका ज्यू बाईचा लेख एका अंकात होता. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात नाझींच्या कुप्रसिद्ध ‘ऑसविच’ कॅम्पमध्ये तिला डांबून ठेवलेलं होतं. गॅस चेंबरकडे जाण्याचा दिवस जवळच आला होता, तेवढ्यात दोस्तांच्या फौजेनं सगळ्या कैद्यांची सुटका केली आणि ती वाचली. हा सगळा थरारक अनुभव तिनं लेखात लिहिला होता. त्याचाच मराठी अनुवाद मी केला आणि तो ‘नरकातून मृत्युलोकात’ या शीर्षकाखाली ‘माणूस’ साप्ताहिकात छापून आला. त्यानंतर काही वर्षांतच माझी ‘पॅपिलॉन’ पुस्तकाद्वारे अनुवादाची कारकीर्द सुरू झाली. म्हणून तो लेख म्हणजे अनुवाद-क्षेत्राची प्रवेश परीक्षा होती, असं मी मानतो. 

बिहारमध्ये भारतभरातून आलेले खूप लोक भेटले. त्यातूनच आपलं अनुभवविश्वव व्यापक होतं. किरकोळ घरगुती प्रश्नां्चा बाऊ आपण कधीच करत नाही. बाबा आमटे म्हणत, की ‘उघड्यावर स्नान केल्यामुळे आपल्या शरीरावरचे खरूज-नायटे दिसतात आणि लाज वाटून आपण त्यांच्यावर उपचार करून घेतो. तसंच, समाजात आणि अनेक प्रकारच्या लोकांमध्ये वावरल्यावर आपल्या मनाचे नायटे उघड होतात आणि ते बरेही होतात.’ अगदी खरं आहे ते.

पावापुरी - भगवान महावीरांचे जन्मस्थानतिथले मोठमोठे जमीनदार हत्ती पाळत असत. जड सामानाची ने-आण करण्यासाठी त्यांचा उपयोग होई. शेतमजुरांनी क्वचित ‘बंड’ केलं, तर त्यांच्यावर हत्तींना सोडण्यात येई, असं आम्ही ऐकलं होतं. एकदा गौरीबाबू सिंग यांच्या हत्तीवरून आम्ही चौघं त्यांच्या पाच किलोमीटर अंतरावरील शेताकडे गेलो. राज कपूरच्या ‘श्री ४२०’मधलं ‘मेरा जूता है जपानी’ हे गाणं आठवा किंवा ‘गाइड’मधलं ‘काँटों से खींच के ये आँचल.’ त्यात हत्तीवरचा प्रवास आहे. तो हत्ती एवढा अवाढव्य होता, की रस्त्याच्या मधून तो जात होता आणि मोठमोठे ट्रक बाजूला होऊन त्याला वाट द्यायचे. त्याची उंचीसुद्धा खूप होती. शेतावर पोहोचलो तेव्हा हत्तीला खाली बसवण्यात आलं. तीन मित्र उरतले आणि मी खाली येणार एवढ्यात तो उठला. मला उडी मारावी लागली आणि त्यात धडपडलो. एक वेगळा ‘राजेशाही’ अनुभव! परत येताना मात्र आम्ही जीपनं प्रवास केला.

नंतर आमची पाच जणांची दुसरी तुकडी दाखल झाली. त्यात कुमार सप्तर्षी, दत्ता कुलकर्णी इत्यादींचा समावेश होता. दुपारचं अन्नकेंद्र सुरळीतपणे सुरू होतं. जेवणाचे दोनच पदार्थ असत. माझ्या डोक्यात एक अशी कल्पना आली, की एकदा सगळ्यांना काही तरी गोड पदार्थ खायला घालावा. आम्ही चर्चा केली आणि जिलेबी करायचं ठरलं. रोज जी मुलं जेवायला येत त्यांची दोन-चार दिवससुद्धा आंघोळ झालेली नसे. मग, आधी त्यांनी विहिरीवर स्नान करायचं आणि नंतरच जिलेबी मिळेल, असा ‘फतवा’ आम्ही काढला. त्यासाठी साबण, पंचे विकत आणले. ते ‘स्नानपर्व’ म्हणजे मोठी धमाल उडाली. आम्ही नऊ जण सगळ्यांना स्वच्छ करत होतो. मुलांनाही मजा वाटत होती. ते उरकल्यावर जिलेबी आणि खिचडीची पंगत झाली. अजूनही तो प्रसंग स्पष्टपणे आठवतो.

राजगीरबिहारमधल्या वास्तव्यातली आणखी एक खास उल्लेखनीय गोष्ट म्हणजे आचार्य विनोबाजींची भेट. त्या वेळी ते सर्वोदयाच्या लक्ष्मीनारायण वैनी आश्रमात राहत होते. आम्हाला प्रथम पाटण्याहून बोटीनं गंगा नदीतून काही अंतर जावं लागलं. सुमारे पाऊण तासाचा प्रवास. तिथे गंगेच्या दोन्ही काठांमधलं अंतर किमान एक किलोमीटर असेल. नंतर सोनपूर या आशियातल्या सर्वांत लांब प्लॅटफॉर्म असलेल्या स्टेशनवर रेल्वे पकडून आम्ही दोन तासांनी विनोबाजींना भेटलो. खूप छान गप्पा झाल्या. ‘पुणं हे सायकलीचं शहर आहे,’ असा उल्लेख त्यांनी केला. ते खरंच होतं. स्वयंचलित दुचाक्या त्या काळी फारशा वापरात नव्हत्या. त्यानंतर उलटा प्रवास करून आम्ही पुन्हा रजौली गाठलं.

पहिल्या तुकडीचा मुक्काम आता संपत आला. मी आणि अनिल दांडेकरनं परतण्यापूर्वी तिथल्या प्रसिद्ध ठिकाणांना भेटी द्यायचं ठरवलं. खर्च फार येणार नव्हता. बुद्धगया, पावापुरी, नालंदा, राजगीर इत्यादी गावं बघितली. सगळीकडे जैन धर्मशाळा असायच्या. भाडं काहीच नाही. खोल्या स्वच्छ, मोठ्या आणि अगदी ‘थ्री स्टार हॉटेल’सारख्या! राजगीर ही बिहारची प्राचीन राजधानी राजगृह. तिथे पांडवकालीन काही अवशेष आहेत. गरम पाण्याचं एक कुंडसुद्धा आहे. एक रात्र तर आम्ही दोघं उघड्या मैदानात झोपलो. सोबत फक्त एक शबनम बॅग होती. कसला पाश नाही, बंधन नाही! अगदी मुक्त असल्यासारखं वाटलं. नालंदा हे जुनं जगप्रसिद्ध विद्यापीठ. ते सगळं फिरून बघितलं. (पुढे २० वर्षांनी मी पुरातत्त्वज्ञ झालो.) पावापुरी हे महावीरांचं जन्मस्थान आणि बुद्धगयेत गौतम बुद्धांना ‘साक्षात्कार’ झाला होता. हा आनंददायक प्रवास पूर्ण करून आम्ही मुंबईमार्गे पुण्याला सुखरूप परतलो.

बिहारचा दौरा आम्हाला खूप काही शिकवून गेला.

(या लेखाचा पूर्वार्ध वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

रवींद्र गुर्जर
संपर्क : ९८२३३ २३३७०
ई-मेल : rvgurjar@gmail.com

(‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/TiSWnh या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Jayant Thombare About 295 Days ago
Well written Ravindra 👍
0
0

Select Language
Share Link
 
Search