Next
शहापुरात वसुंधरा संजीवनी मंडळ बांधणार ‘चेक डॅम्स’
सत्संग परिवाराच्या पाणी अडवा मोहिमेला ‘एनजीओ’चे बळ
दत्तात्रय पाटील
Monday, January 21, 2019 | 12:37 PM
15 0 0
Share this story

सत्संग परिवाराने ‘पाणी अडवा’ मोहिमेत बांधलेले वनराई बंधारे

ठाणे : जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील ब्रम्हलीन योगी ऋद्धीनाथबाबा सत्संग परिवाराचे प्रणेते योगी फुलनाथबाबांच्या ‘पाणी अडवा’ मोहिमेची दखल घेत ठाण्यातील वसुंधरा संजीवनी मंडळ या सामाजिक संस्थेने सत्संग परिवाराने श्रमदानातून बांधलेल्या वनराई बंधाऱ्यांच्या जागी पक्के चेक डॅम्स बांधण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीक्षेत्र टाकेश्वर देवस्थान येथे नुकत्याच झालेल्या सभेत संस्थेचे संचालक आनंद भागवत यांनी ही माहिती दिली.  
 
भूजलपातळी वाढवणे, पशु-पक्ष्यांना पिण्यासाठी व गावकऱ्यांना स्वच्छतेसाठी पाणीसाठा निर्माण करणे ही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेऊन टाकेश्वर मठाधिपती योगी फुलनाथबाबा यांनी सत्संग परिवारातील केंद्रांना वनराई बंधारे बांधण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सावरोली (सो), बाबरे, मानेखिंड, आष्टे, खरीड, फोफोडी, खरांगण, ठुणे, नारायणगाव, दहिवली (पाटील) व नारिवली या गावांतील सत्संग केंद्रांनी सिमेंट गोणी व मातीचा वापर करत ११ वनराई बंधारे बांधले आहेत.या संबंधीचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील शहापूर व मुरबाड तालुक्यात जलसंवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वसुंधरा संजीवनी मंडळ या बिगरशासकीय संस्थेने योगी फुलनाथबाबा यांची भेट घेऊन परिवाराने बांधलेल्या वनराई बंधाऱ्यांची जागेवर जाऊन पाहणी केली. या पाहणीतून हे बंधारे अनेक शेतकऱ्यांना दुबार शेतीसाठी उपयुक्त ठरत असल्याचे दिसून आल्यामुळे या एनजीओने या बंधाऱ्यावर प्रत्येकी तीन ते पाच लाखांपर्यंत खर्च करून पक्के चेकडॅम्स निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे.टाकीपठार येथे योगी फुलनाथबाबा यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या सत्संग कार्यकर्त्यांच्या सभेत वसुंधरा संजीवनी संस्थेचे ज्येष्ठ संचालक आनंद भागवत यांनी विविध कंपन्यांच्या माध्यमातून निधी उभा करून सत्संग परिवाराच्या मोहिमेला आर्थिक पाठबळ देणार असल्याची माहिती दिली. त्यासाठी आवश्यक ती कागदोपत्री माहिती कार्यकर्त्यांकडून भरून घेण्यात आली. या वेळी गणेश पोतदार, संतोष दवणे यांनी सत्संग परिवाराच्या पाणी अडवा मोहिमेची पार्श्वभूमी विशद केली. योगी फुलनाथबाबा व आनंद भागवत यांनी कार्यकर्त्यांना जलसंवर्धनाबाबत मार्गदर्शन केले.
 
येत्या काळात वनराई बंधाऱ्यांच्या जागी पक्के चेक डॅम्स निर्माण झाल्यास शेकडो एकर क्षेत्रात दुबार पिके घेणे व शेतीपूरक व्यवसायांतून रोजगार निर्मिती करणे शक्य होणार असल्याने सत्संग परिवाराच्या मोहिमेचे व वसुंधरा संजीवनी मंडळाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link