Next
९३व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो
BOI
Sunday, September 22, 2019 | 04:31 PM
15 0 0
Share this article:

औरंगाबाद : उस्मानाबाद येथे होणार असलेल्या ९३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (२२ सप्टेंबर) झालेल्या बैठकीत दिब्रिटो यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. 

महाराष्ट्र साहित्य परिषद, मराठवाडा साहित्य परिषद, मुंबई साहित्य संघ आणि विदर्भ साहित्य संघ या चार घटक संस्थांसह संलग्न संस्थांचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. या संस्थांनी बैठकीत सुचविलेल्या नावांवर चर्चा झाली आणि दिब्रिटो यांचे नाव निश्चित झाले. हे साहित्य संमेलन जानेवारी २०२०मध्ये उस्मानाबाद येथे होणार आहे. मराठवाडा साहित्य परिषद ही यंदाच्या साहित्य संमेलनाची निमंत्रक संस्था आहे. 

चार डिसेंबर १९४३ रोजी वसई तालुक्यातील विरार-आगाशी परिसरातील नंदाखाल येथे ख्रिस्ती मराठी भाषक कुटुंबात त्यांचा जन्म झाला. ते पेशाने कॅथॉलिक धर्मगुरू असले, तरी मराठीत उत्तम लेखन करणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध आहेत. कृतिशील समाजचिंतक अशी त्यांची ओळख आहे. पर्यावरण संरक्षण, जतन आणि संवर्धनासाठी त्यांनी मोठं योगदान दिलेलं आहे. पुण्यामध्ये १९९२मध्ये झालेल्या १५व्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
 
मराठी भाषक ख्रिस्ती समाजाचे मुखपत्र असलेल्या ‘सुवार्ता’ या मासिकाचे संपादक म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम पाहिले असून, प्रबोधनपर विपुल लेखन केले आहे. सृजनाचा मळा, ओअॅसिसच्या शोधात, सृजनाचा मोहोर, परिवर्तनासाठी धर्म, तेजाची पाऊले, इस्रायल आणि परिसराचा संघर्षमय इतिहास, ख्रिस्ताची गोष्ट, ख्रिस्ती सण आणि उत्सव, संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची, पोप दुसरे जॉन पॉल जीवनगाथा, तरंग, आनंदाचे अंतरंग – मदर तेरेसा आदी त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. ‘बायबल- दी न्यू टेस्टामेंट’ या पुस्तकाचा त्यांनी मराठीत केलेला अनुवाद ‘सुबोध बायबल- नवा करार’ या नावाने प्रसिद्ध असून, त्या पुस्तकाला साहित्य अकादमीचा राष्ट्रीय अनुवाद पुरस्कार जाहीर झाला आहे. 

फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निवडीबद्दल साहित्य वर्तुळातून आनंदाची भावना व्यक्त होत आहे. 

(फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search