Next
पुण्यात इनामदार स्पर्धा परीक्षा केंद्राचे उद्घाटन
BOI
Monday, July 22, 2019 | 03:39 PM
15 0 0
Share this article:

पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन (एमसीई) सोसायटीमध्ये स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी पी. ए. इनामदार आयएएस कॉम्पिटिटिव्ह एक्झाम सेंटर सुरू करण्यात आले असून, त्याचे उद्घाटन २० जुलैला सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांच्या हस्ते झाले. 

या प्रसंगी आयकर विभागाचे उपायुक्त डॉ. उज्वलकुमार चव्हाण, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील यशस्वी व्यक्तिमत्त्व मच्छिंद्र गळवे हे प्रमुख पाहुणे म्ह्णून उपस्थित होते. या सेंटरचे कार्यकारी संचालक प्रशांत चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. विधी महाविद्यालयाचे प्राचार्य रशीद शेख यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. हा कार्यक्रम आझम कॅम्पसच्या असेम्ब्ली हॉलमध्ये झाला. केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, बँक, आरआरबी, स्टेट सर्व्हिस बोर्ड, महा ऑनलाइन अशा परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांना येथे तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले आहे; तसेच विद्यार्थ्यांना वर्षभर मोफत वाचनालय व अभ्यासिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

पुण्याच्या मध्यभागी असलेल्या पुणे कॅम्प भागात २४ एकर जागेत ‘एमसीई’ सोसायटीमध्ये केजी टू पीजी शिक्षणाची सुविधा उपलब्ध असून, ३२ आस्थापनांमध्ये ३० हजार विद्यार्थी शिकतात. येथे डीएड, बीएड, विधी, दंत चिकित्सा, युनानी, फिजिओथेरपी, व्यवस्थापन, माहिती तंत्रज्ञान, संगणक दुरुस्ती, चित्रकला असे सर्व प्रकारचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. भव्य क्रिकेट मैदानासह स्पोर्ट्स अॅकॅडमी आहे. स्पर्धा परीक्षा केंद्र हे या शैक्षणिक सुविधांमध्ये महत्त्वाचे पाऊल आहे.

या वेळी मार्गदर्शन करताना गळवे म्हणाले, ‘स्पर्धा परीक्षा यशस्वी होण्यासाठी आपण इंग्रजी माध्यमातून, शहरात शिकलो पाहिजे असे नाही. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये जिल्हा परिषद शाळातील विद्यार्थ्यांचे प्रमाण ९० टक्के आहे. स्पर्धा परीक्षा वाटतात तितका अवघड नाहीत, अभ्यासासोबत इतर उपक्रमांत, स्पर्धेत सहभागी व्हा आणि व्यक्तिमत्त्व विकसित करा. आपल्याला समजलेला अभ्यास सहकाऱ्यांना समजावून सांगितल्याने अधिक फायदा होतो. स्पर्धा परीक्षा देताना आत्मविश्वास, कष्ट करण्याची सवय, प्रामाणिकपणा आणि संयम या गुणांची आवश्यकता आहे.’ 

स्पर्धा परीक्षा पद्धती ही देशाचा गाडा चालविण्यासाठी सक्षम युवक-युवती शोधणारी सर्वोत्तम पद्धत असून, यशा-पयशापेक्षा व्यक्तिमत्त्व विकसनाची सुवर्णसंधी असल्याचे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.

डॉ. इनामदार म्हणाले, ‘१०० विद्यार्थ्यांना दीड वर्षाच्या निवासी सुविधांसह ना नफा-ना तोटा तत्त्वावर प्रशिक्षण दिले जाईल. गरीब विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण दिले जाईल. गरीबी आणि मागासलेपण हा गुन्हा नाही, तर त्याविरुद्ध संघर्ष न करणे हा गुन्हा आहे. स्वतःच्या क्षमता न वापरणे, हा गुन्हा आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी वेळेचा सदुपयोग करावा.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search