Next
जे का रंजले गांजले, त्यासि म्हणे जो आपुले...
BOI
Thursday, May 09, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

संतोष गर्जे

अत्यंत गरीब परिस्थितीत आणि दुष्काळी बीड जिल्ह्यात जन्माला आलेल्या संतोषला जीवनात अनेक कठीण प्रसंगांना तोंड द्यावं लागलं; पण त्यातून तो कोलमडून पडला नाही, तर अनेक अनाथ मुलांचं पालकत्व त्यानं घेतलं. त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तो झटतो आहे. त्याने स्थापन केलेल्या ‘बालग्राम’मधून बाहेर पडलेली अनेक मुलं स्वतःच्या पायावर उभी आहेत. ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ सदरात आज संतोष गर्जेची प्रेरक गोष्ट...
............
जे का रंजले गांजले, त्यासि म्हणे जो आपुले... संत तुकाराम यांच्या या ओळी एका सहृदय माणसाची, एका संताची, एका साधूची आणि देवत्व लाभलेल्या व्यक्तीची लक्षणं सांगतात. दिवसभरात आपल्या आसपास अनेक अनाथ, गरीब, बालकामगार अशी मुलं दिसतात. चौकातल्या सिग्नलजवळ, फूटपाथवर, बागेच्या प्रवेशद्वाराजवळ, मंदिराच्या बाहेर, मंडईजवळ.... कितीतरी ठिकाणी दिसणाऱ्या अशा मुला-मुलींकडे बघून आपण एक तर दुर्लक्ष करून पुढे जातो किंवा त्यांच्या हातावर एखादा रुपया टेकवतो. 

बालग्रामसुदाम हा अनाथ मुलगा आठ वर्षांचा असताना त्याच्यापेक्षा थोड्या मोठ्या असलेल्या एका तरुणानं त्याला मायेचा हात दिला, त्याला छत दिलं, त्याचं पालकत्व घेतलं. सुदामचं शिक्षण सुरू झालं. इतरांच्या हातात त्यानं पाटी बघितली होती, पेन्सिल बघितली होती, चांगले कपडेही इतरांच्या अंगावर बघितले होते. या साध्या साध्या गोष्टी तोपर्यंत सुदामसाठी स्वप्नवत होत्या. या तरुणामुळे सुदामच्या अंगावर कपडे आले, हातात पाटी-पेन्सिल आली आणि शाळेत जाण्याचं स्वप्न साकार झालं. आपले खरे पालक कोण हे ठाऊक नसलेल्या सुदामला या तरुणाच्या रूपात त्याचे पालक भेटले. हा तरुण म्हणजेच आपली आई, हा तरुण म्हणजेच आपले वडील आणि हा तरुण म्हणजेच आपला भाऊ ही गोष्ट सुदामच्या लक्षात आली. आपणही मोठं झाल्यावर या तरुणासारखंच व्हायचं आणि समाजसुधारक बनायचं असा निश्चय छोट्याशा सुदामनं केला.

सुदामच्याच नव्हे, तर सुदामसारख्या ९० अनाथ मुलांचं पालकत्व घेतलेला हा तरुण कोण आहे? या तरुणाचं नाव संतोष गर्जे! ‘आई फाउंडेशन’चा संस्थापक. बीड जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावात संतोषचा जन्म झाला. महाराष्रा‘यतला बीड जिल्हा हा दुष्काळी भाग म्हणून सगळ्यांना ठाऊक आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमुळेही हा जिल्हा प्रकाशझोतात आला आहे. घरची गरिबी! आई-वडील ऊसतोड कामगार म्हणून सहा महिने कामावर जाण्यासाठी स्थलांतर करायचे. राहिलेल्या सहा महिन्यांत शेतीची कामं करायचे. आई-वडील जेव्हा ऊसतोडीच्या कामासाठी बाहेरगावी जायचे, तेव्हा संतोष आणि त्याची त्याच्यापेक्षा दोनेक वर्षांनी मोठी असलेली बहीण अशी दोघंच घरात असायची. आठ-१० वर्षांचं वय असलेली ही मुलं एकटी राहायची. संतोषच नव्हे, तर संतोषसारखी अनेक मुलं-मुली या सहा महिन्यांच्या काळात आपल्या आई-वडिलांपासून दूर राहतात. मग स्वयंपाक आणि घरची सगळी कामं तर मुलांना करावी लागतातच; पण शेतीतलीही छोटी-मोठी कामंदेखील करावी लागतात. अकाली प्रौढत्व येणं म्हणजे काय असतं, ते संतोष आणि त्याच्या बहिणीकडे बघून कळू शकत होतं. एवढं सगळं करून संतोष शाळेत जात होता. असं करत करत दिवस जात होते. लहान गावात मुलींची लग्नं लवकर होत असल्यानं संतोषच्या बहिणीचं लग्न लवकरच झालं. संतोषच्या आई-वडिलांनी कर्ज काढून तिचं लग्न करून दिलं. दोन-तीन वर्षं सगळं काही सुरळीत चाललं होतं. संतोष विज्ञान शाखेतून बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाला. आता पुढे काय करायचं, तर डीएड करून शिक्षक व्हायचं किंवा ‘आयटीआय’चा कोर्स करून कुठे तरी छोटी-मोठी नोकरी करायची, अशी स्वप्नं संतोष बघत होता. याच प्रकारची स्वप्नं त्या भागातली बहुतांश मुलं बघत. अचानक एके दिवशी बहिणीच्या सासरहून एक निरोप आला. संतोषची बहीण खूप आजारी असल्याचा तो निरोप होता. आपल्या मुलीला काय झालं ते बघायला संतोषचे आई-वडील तातडीनं तिच्या सासरी निघाले. निघताना संतोषच्या वडिलांच्या मनात वेगवेगळे विचार येत होते. त्यांच्या मुलीला सातवा महिना सुरू होता. तिला बाळंतपणासाठी तसंही जाऊन आणायचं होतंच; पण काही कारणांनी ते लांबलं होतं. आता येताना आपण तिला बरोबरच घेऊन येऊ असा विचार ते करत होते; मात्र मुलीच्या सासरी पोहोचताच, त्यांना दारात आपल्या मुलीचं कलेवर ठेवलेलं बघायला मिळालं. नवरा-बायकोमध्ये काहीतरी वाद झाला होता. त्या वादात मुलीच्या नवऱ्यानं तिच्या पोटावर लाथ मारली आणि पोटातच तिचं मूल गेलं होतं. त्यानंतर तिला त्रास होत असल्यानं हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं; पण उपचार सुरू असतानाच तिचाही मृत्यू झाला होता. या प्रसंगाचा संतोषच्या वडिलांच्या मनावर खूप परिणाम झाला. आपल्या दिरंगाईमुळेच, आपण आपल्या मुलीला माहेरी न्यायला वेळ लावल्यामुळे, आपण आपल्या मुलीला आणि तिच्या बाळाला गमावलं, आपणच खरे गुन्हेगार आहोत असं वाटल्यानं त्यांनी घर सोडलं. ते कुठे गेले याचा त्यानंतर काहीच पत्ता लागला नाही. 

बारावी झालेल्या संतोषवर घराची, आईची जबाबदारी येऊन पडली होती. संतोषची बहीण आपल्या मागे एक चिमुकली मुलगी सोडून गेली होती. आईच्या मागे या मुलीकडे कोण लक्ष देणार हा प्रश्न होता. संतोषनं आपल्या भाचीला कडेवर घेतलं आणि आता आपणच तिचे आई-वडील व्हायचं, असं ठरवलं. संतोषची बहीण ही संतोषच्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती होती. तिच्या मृत्यूनं त्याच्या संवेदनशील मनावर खूप मोठा आघात झाला. जन्माला येण्यापूर्वीच जो जीव गेला, त्याच्याविषयीच्या विचारानं त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. आपल्या बहिणीसारख्या कितीतरी मुली त्याला आसपास दिसू लागल्या आणि त्यांची अनाथ झालेली मुलंही! वडील आणि बहीण दुरावल्यानं संतोषला अनाथपण काय असतं ते तीव्रतेनं जाणवू लागलं. आपण आणि अनाथ मुलं यांच्यात काहीच अंतर नाही असं त्याला वाटायला लागलं. आपण अशा मुलांसाठी काहीतरी करायला हवं, यासाठी त्याचं मन आक्रोश करू लागलं; पण संतोष काय करू शकणार होता? त्याच्याजवळ पैसा नव्हता, ना राहायला छप्पर! ना छोटीमोठी नोकरी!

डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदा आमटे

मुख्यमंत्री

तरीही संतोषचा निर्धार पक्का झाला होता. संतोष त्या काळात गावोगावी फिरला. सुरुवातीच्या काळात त्याला अनाथ झालेली, आई-वडिलांचं छत्र हरवलेली सात मुलं मिळाली. या सात मुलांना घेऊन संतोष आता छत शोधण्याच्या कामी लागला. आजचा दिवस काढायचा हेच त्याचं त्या वेळचं जगण्याचं सूत्र होतं. एका ठिकाणी काम केलेले पाच हजार रुपये जवळ होते. त्या तुटपुंज्या पैशांवर एकाला विनवण्या करून थोडी मोकळी जागा संतोषनं भाड्यानं घेतली. त्या मोकळ्या जागेवर उधारीवर पत्रे आणून त्यानं पत्र्याची शेड उभी केली. या शेडमध्ये आता ही सात मुलं आणि संतोष राहू लागले. दिवसभर या मुलांच्या खाण्या-पिण्यासाठी पैसे जमा करत संतोष फिरायचा. २००४मध्ये हा ‘सहारा अनाथालय परिवार’ सुरू झाला.

ज्येष्ठ नेते शरद पवार

सुरुवातीच्या काळात संतोषला अनेक वाईट अनुभव आले. स्वतःचाच काही ठिकाणा नसलेल्या संतोषवर विश्वास ठेवायला कोणी तयारच नसायचं. त्यातच त्याचं वय अवघं १९ वर्षं होतं. अनेक जण अपमान करून हुसकावून लावायचे. त्या अपमानाचं, दुःखाचं पाणी डोळ्यांतच जिरवून पुन्हा नव्या आशेनं संतोष दुसऱ्या दिवशी कामाला लागायचा. हळूहळू संतोषचा प्रामाणिकपणा काहींच्या लक्षात येऊ लागला. त्याला मदत मिळू लागली. संतोषनं या मुलांना शाळेत दाखल केलं. त्यांच्या शिक्षणासाठी, शिक्षण साहित्यासाठीदेखील तो दारोदार फिरू लागला. 

गोपीनाथ मुंडेंसह

पंकजा मुंडे

हळूहळू संतोषचं काम वाढत गेलं. येणाऱ्या प्रत्येक मुलाची कहाणी वेगळी असायची. समीर नावाच्या मुलाची गोष्ट तर आणखीच विदारक होती. त्याच्या आई-वडिलांना एड्सने ग्रासलं होतं आणि त्यातच त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. लहानग्या समीरला या विकाराची बाधा झाली नव्हती. त्यामुळे संतोषनं समीरला सांभाळावं, अशी विनंती त्याच्या आईनं केली. संतोषकडे समीर रुळत असतानाच एके दिवशी समीरच्या आईचा संतोषला फोन आला. आपला मृत्यू जवळ आला असून, समीरची परीक्षा असल्यानं आपल्याविषयी त्याला इतक्यात काही सांगू नका, असं ती म्हणत होती. तिच्या त्या काळजीच्या फोननंतर दुसऱ्याच दिवशी तिचा मृत्यू झाला. समीर आता पूर्णपणे पोरका झाला होता. आईच्या मृत्यूची बातमी त्याच्यापर्यंत पोहोचू न देण्याची दक्षता संतोषसह सगळ्यांनी घेतली होती. समीरची परीक्षा पार पडली आणि एके दिवशी त्याला जवळ घेऊन संतोषनं भरलेल्या डोळ्यांनी समीरला ही दुखद बातमी सांगितली. समीरनं संतोषच्या मिठीत आपल्या अश्रूंना वाट करून दिली.

डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘वेध’ या उपक्रमासाठी त्याला बोलावण्यात आलं. ठाण्यात झालेल्या ‘वेध’च्या व्यासपीठावर संतोषच्या कामाची उपस्थितांना ओळख झाली. याच व्यासपीठावर संतोषच्या कामासाठी ठाणेकरांनी आणि इतरांनी संतोषला भरभरून आर्थिक मदत केली. या आणि अशा अनेक दानशूर मंडळींच्या सहकार्यातून संतोषला जागा मिळाली, मुलांसाठी इमारत उभी राहिली. संतोषकडच्या मुलांची संख्या आज ९०वर गेली आहे. बीडच्या गेवराई तालुक्यात गोविंदवाडीमध्ये ‘बालग्राम’ उभं आहे.

आज ही सगळी मुलं-मुली मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून शिकतात. याशिवाय संतोष सुट्टीच्या काळात त्यांच्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवतो. या मुला-मुलींचा सर्वांगीण विकास कसा होईल, याची तो काळजी घेतो. संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक दिग्गज, तज्ज्ञ लोकांना तो बोलावतो आणि आपल्या मुलांबरोबर त्यांचा संवाद घडवून आणतो. त्याला साथ देण्यासाठी प्रीती ही कायद्याची पदवीधर असलेली जोडीदार त्याला लाभली आहे. दोघांनी मिळून आता हे बालग्राम, सहारा परिवाराचं काम लोकसहभागातून जोमानं करायला सुरुवात केली आहे. 

माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटीलव्याख्यानमाला, चित्रपट, शिबिरं (भान तरुणाईचे), कार्यशाळा, वाचन, शेती (भाजीपाला आणि फळं पिकवणं), ऑर्केस्ट्रा  अशा अनेक उपक्रमांमधून संतोष या मुलांना शहाणं करतो आहे. आज ‘बालग्राम’मधून बाहेर पडलेली अनेक मुलं स्वतःच्या पायावर उभी आहेत. त्यातल्या काहींनी तर संतोषच्या कामातच मदत करायला सुरुवात केली आहे. कामाबद्दल अनेक मानाचे पुरस्कार संतोषला लाभले असले, तरी आजही तो तितकाच साधा आणि विनम्र आहे. त्याच्यातली करुणा तशीच आहे. शून्यापासून सुरुवात केलेल्या संतोषची वाटचाल अनेक चढ-उतार पार करत सुरू आहे. म्हणूनच संतोषकडे बघितलं की तुकारामांच्या या ओळी आपसूकच ओठांवर येतात आणि संतोषनं त्या किती सार्थ केल्या, त्या ओळींनाच आपलं जीवन कसं बनवलं हे लक्षात येतं...

जे का रंजले गांजले, त्यासि म्हणे जो आपुले
तोचि साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा

संपर्क :
संतोष गर्जे : ९७६३० ३१०२०, ९९२१२ ५८४२५
वेबसाइट : http://aai-foundation.org/

- दीपा देशमुख
मोबाइल : ९५४५५ ५५५४०
ई-मेल : deepadeshmukh7@gmail.com

(दीपा देशमुख या प्रसिद्ध लेखिका असून, त्या वैविध्यपूर्ण विषयांवर लेखन करतात. दर १५ दिवसांनी, गुरुवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या त्यांच्या लेखमालेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/M3NCtW या लिंकवर उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप


 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
जोगपेटे About 137 Days ago
ग्रेट
0
0
Ankush garje About 157 Days ago
Santosh sir tumhala Salam
0
0
Shirin Kulkarni About 161 Days ago
डोळ्यात पाणी आलं वाचून. किती संवेदनशील मन आहे संतोषचं. त्याच्या नावाप्रमाणेच सगळ्यांना आनंद वाटतो आहे तो. त्याची ओळख करून दिल्याबद्दल दीपा ताईंचे आभार मानावे तितके कमीच. धन्यवाद दीपा ताई!
1
0
Rajeswar Dhondba Bidwai About 161 Days ago
GOD is great
2
0

Select Language
Share Link
 
Search