Next
दहाव्या महिला चित्रपट महोत्सवाला सुरुवात
BOI
Saturday, March 09, 2019 | 01:18 PM
15 0 0
Share this story

महिला चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी  दिग्दर्शिका अंजली मेनन, अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी यांच्यासह  मनस्विनी प्रभुणे, सतीश जकातदार, प्रकाश मगदूम, वीरेंद्र चित्राव आदी मान्यवर उपस्थित होते.

पुणे : आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय महिला दिग्दर्शकांचे चित्रपट पाहाण्याची संधी रविवारी, दहा मार्चपर्यंत पुणेकर रसिक प्रेक्षकांना मिळणार आहे. निमित्त आहे महिला पत्रकारांचा आयाम गट, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, आशय फिल्म क्लब आणि फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटी ऑफ इंडिया यांच्या वतीने आयोजित महिला चित्रपट महोत्सवाचे.

प्रसिद्ध मल्याळम चित्रपट दिग्दर्शिका अंजली मेनन आणि अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी यांच्या हस्ते शुक्रवारी, आठ मार्च २०१९ रोजी या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.१० मार्चपर्यंत लॉ कॉलेज रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात हा महोत्सव सुरू राहणार आहे.    

या वेळी साधना साप्ताहिकाच्या उपसंपादिका हिना कौसर खान- पिंजर आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपट समीक्षक मिनाक्षी शेड्डये यांना त्यांच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल आयाम पत्रकारिता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. आयाम गटाच्या मनस्विनी प्रभुणे, नम्रता फडणीस, प्राची बारी, मेघा शिंपी, स्वाती जरांडे, अपर्णा देगांवकर, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे प्रकाश मगदूम, आशय फिल्म क्लबचे सतीश जकातदार, वीरेंद्र चित्राव आदी या वेळी उपस्थित होते.  


‘तिच्या नजरेतून सिनेमा’ ही या वर्षीच्या महोत्सवाची संकल्पना असून, यात इजिप्त, बांग्लादेश, फ्रान्स, श्रीलंका, तजाकिस्तान या देशातील चित्रपटांचा समावेश आहे. तजाकिस्तानच्या शराफत अरबोव्हा, बांग्लादेशच्या शहानायज काकोली आणि तस्मिया अफ्रिन मोऊ, श्रीलंकेची अंजली एस.के, फ्रान्सची डोरिस लन्झमान, इजिप्तच्या हना मोहंमद व हला खलील आणि भारतातील अंजली मेनन, सुमित्रा भावे, दयाली मुखर्जी, पायल सेठ, मयुरी वाळके, बॉबी शर्मा बारुहा या दिग्दर्शिकांच्या चित्रपटांचा आणि लघुपटांचा महोत्सवात समावेश आहे.

 अंजली मेनन दिग्दर्शित ‘लकी रेड सीड्स’ हा चित्रपटाने महोत्सवाची सुरुवात करण्यात आली. या वेळी बोलताना अंजली मेनन यांनी आपल्या पुणे व राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाशी संबंधित आठवणींना उजाळा दिला. ‘एनएफएआय हे चित्रपटाच्या मंदिरासारखेच असून, याच ठिकाणी मी दिग्दर्शक होण्याचा निश्चय केला,’ अशी आठवण त्यांनी सांगितली. 

गीतांजली कुलकर्णी यांनी चित्रपट, नाटक आणि गोष्ट यांचे महत्त्व सांगत त्यांना ही माध्यमे कशी भावतात याविषयी भावना व्यक्त केल्या. ‘मनोरंजनाचे माध्यम असलेल्या चित्रपटाने आयुष्यात सकारात्मक बदल व्हावा,’ अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.  

मनस्विनी प्रभुणे यांनी प्रास्ताविक केले तर प्राची बारी यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link