Next
शापित हिऱ्यांची रहस्यमय कादंबरी
प्रसन्न पेठे
Sunday, May 06, 2018 | 06:00 AM
15 0 0
Share this story

‘शापित हिरे’ ही कोल्हापूरच्या विवेक कुलकर्णी यांनी अमेरिकेच्या पार्श्वभूमीवर लिहिलेली रहस्य कादंबरी आहे. अनेक वर्षांपूर्वी प्रकाशित झालेली ही कादंबरी नुकतीच ई-बुक स्वरूपात प्रकाशित झाली आहे. या कादंबरीचा परिचय...
.........
शापित हिरे’ ही चोरलेल्या हिऱ्यांच्या शोधाची कथा सांगणारी कादंबरी. कोल्हापूरचे विवेक कुलकर्णी यांनी ही स्वतंत्र काल्पनिक कथा रचली ती मात्र अमेरिकेच्या पार्श्वभूमीवर. फ्लॉरिडा आणि मयामीमध्ये ही कथा घडते. त्यामुळे सर्व पात्रे अर्थातच तिथली.

कथानायक रॉनी, हा जॅक्सव्हिलेमध्ये गॅरेजमध्ये कामे करणारा एक साधा मेकॅनिक. त्याच्यावर चोरीचा खोटा आळ येऊन त्याला कामावरून हाकलण्यात येतं. कामाच्या शोधात तो कोळशाच्या मालगाडीत लपून टॅम्पा, फ्लॉरिडामध्ये आलाय. तीन दिवसांनंतरही काम न मिळाल्याने हताश होऊन पोटासाठी तो चोरी करायला उद्युक्त होतो आणि पकडला जाऊन, त्याला सहा महिन्यांसाठी तुरुंगाची हवा खावी लागते. तिथं त्याची भेट जॉनीशी होते. पन्नाशीला आलेला जॉनी गेली दहा वर्षं तुरुंगात आहे तो, ‘दहा लाखांच्या हिरेचोरी आणि त्यातून झालेल्या खुनाच्या’ संदर्भात. आता त्याची सुटका होण्याचा दिवस जवळ येत चाललाय. सहा महिने रॉनीबरोबर एकत्र राहिल्याने जॉनी त्याला विश्वासात घेऊन आपल्या पूर्वायुष्याची हकीकत सांगतो.

जॉनीने अॅलन आणि मायकेल या आपल्या दोन साथीदारांसह एका व्यापाऱ्याच्या बंगल्यात घुसून दहा लाखाचे हिरे चोरताना, अॅलननं त्या व्यापाऱ्याची हत्या सायलेन्सर लावलेल्या पिस्तुलानं केलेली असते; मात्र गडबड ऐकून धावत आलेल्या बंगल्याच्या राखवालदारावर मायकेलच्या पिस्तुलातून गोळी झाडली जाताना सायलेन्सर नसल्याने मोठा आवाज होऊन, आसपासचे लोक सावध होऊन पोलिसांना बोलावतात. अॅलन आणि मायकेल एकत्रच जोडीनं पळ काढतात; पण गडबडीत दहा लाखाचे हिरे जॉनीकडे राहून त्याच्या मागे पोलीस लागतात. वाटेत असलेल्या एक डेथ व्हॅलीनामक दरीमध्ये हिऱ्यांची पेटी टाकून जॉनी पळायचा प्रयत्न करतो; पण अपघात होऊन पोलिसांच्या हातात सापडतो. मात्र त्याच्यावर खुनाचा आरोप सिद्ध होऊ शकत नाही आणि तो शिताफीनं आपल्या साथीदारांनीच खून करून, हिरे घेऊन पळ काढल्याचं पोलिसांना पटवून देतो. त्याला दहा वर्षांची कैद होते. आणि रॉनीबरोबर शेवटचे सहा महिने घालवून तो जेलमधून सुटणार असतो. 

दरम्यान, अॅलन आणि मायकेल जॉनी शिक्षा भोगून, सुटून बाहेर येण्याची वाट बघत असतात हिरे शोधण्यासाठी; पण प्रत्यक्षात होतं काही वेगळंच. ही सगळी गोष्ट वाचताना उलगडत जाण्यातच मजा आहे. 


१३० पानांची ही शापित हिऱ्यांच्या शोधाची छोटेखानी कादंबरी. ही वाचताना त्यातल्या पात्रांच्या नावांमुळे जेम्स हॅडली चेस किंवा तत्सम कोण्या लेखकाच्या इंग्लिश कादंबरीचा अनुवाद आहे असे वाटून जाईल; पण ही कादंबरी विवेक कुलकर्णी यांच्या कल्पनेची स्वतंत्र निर्मिती आहे. त्यातली ‘रॉनीची कोळशाच्या मालगाडीतून पळण्याची आयडिया’ किंवा मायकेलनं हॉटेलमध्ये डबल ऑम्लेटची दिलेली ऑर्डर यात कुठेतरी किंचित भारतीय झाक आल्यासारखी वाटेल!

यातलं अॅलन हे पात्र इतर सर्व पात्रांपेक्षा जास्त बारकाव्यासह रंगवलेलं आहे. पोलीस त्यामानानं बॅकफूटवर आहेत आणि शापित हिऱ्यांच्या गुन्हेगारांचा शोध त्यांनी घेण्यापेक्षा, गुन्हेगारांनी घेतलेला हिऱ्यांचा शोध अशा अंगानेच कथावस्तू जाते. दहा लाखांचे हिरे कोणाला ‘शाप’ ठरतात आणि कोणाला ‘वरदान’ हे कळण्यासाठी ही कादंबरी नक्की वाचा!

संपर्क : विवेक कृष्णाजी कुलकर्णी, २७१८, बी वॉर्ड, मंगळवार पेठ, कोल्हापूर - ४१६०१२
मोबाइल : ९८२२३ ५७५३१   
पृष्ठसंख्या : १३०
मूल्य : १०० रुपये 
प्रकाशक : चंद्रकांत शेट्ये प्रकाशन मंदिर, कोल्हापूर
ई-बुक प्रकाशक : बुकगंगा पब्लिकेशन्स

(हे ई-बुक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून विकत घेण्यासाठी इथं क्लिक करा.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link