Next
पंतप्रधान मोदींना ‘यूएई’कडून ‘झायेद मेडल’
दोन्ही देशांमधील संबंध नव्या उंचीवर नेण्याच्या प्रयत्नांसाठी सर्वोच्च सन्मान
BOI
Thursday, April 04, 2019 | 03:24 PM
15 0 0
Share this article:

फाइल फोटोनवी दिल्ली : ‘भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संयुक्त अरब अमिरातीकडून ‘झायेद मेडल’ हा आमच्या देशाचा सर्वोच्च सन्मान देण्यात येणार आहे,’ असे अबूधाबीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन झायेद अल् नहयान यांनी चार एप्रिल रोजी जाहीर केले. दोन्ही देशांतील संबंध बळकट करून ते नव्या उंचीवर नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण कार्याचा गौरव म्हणून त्यांना हे पदक दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

‘भारताशी आमचे ऐतिहासिक आणि सर्वसमावेशक धोरणात्मक संबंध आहेत. माझे प्रिय मित्र आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विशेष प्रयत्नांमुळे या संबंधांना मोठी बळकटी मिळाली. त्यांच्या या प्रयत्नांचे कौतुक म्हणून संयुक्त अरब अमिरातीचे पंतप्रधान त्यांना झायेद मेडल देणार आहेत,’ असे ट्विट अबूधाबीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन झायेद अल नहयान यांनी चार एप्रिल रोजी केले. 

झायेद मेडल हा संयुक्त अरब अमिरातीकडून दिला जाणारा सर्वोच्च सन्मान असून, तो मित्र देशांचे राजे, राष्ट्रपती किंवा पंतप्रधानांना त्या देशाबरोबर संबंध बळकट करण्यासाठीच्या कार्यासाठी दिला जातो. यापूर्वी हा सन्मान रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ (द्वितीय), फ्रान्सचे निकोलस सार्कोझी, जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मेर्केल, अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांच्यासह अनेक देशांच्या प्रमुखांना देण्यात आला आहे. 

‘भारत आणि संयुक्त अरब अमिरातीचे (यूएई) संबंध पूर्वीपासूनच चांगले आहेत; मात्र नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी २०१५मध्ये या देशाला भेट दिली आणि त्यानंतर ते संबंध अधिक बळकट होण्यास सुरुवात झाली,’ असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. त्यानंतर २०१७मध्ये नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून क्राउन प्रिन्स यांना आमंत्रित करण्यात आले होते. पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत नरेंद्र मोदी यांनी दोनदा भेट दिलेल्या मोजक्या देशांमध्ये संयुक्त अरब अमिरातीचा समावेश आहे. 

२०१५मध्ये मोदी यांच्या दौऱ्यानंतर २०१६ आणि २०१७मध्ये क्राउन प्रिन्स भारतात आले. त्यानंतर १०-११ फेब्रुवारी २०१८ रोजी पंतप्रधान मोदी पुन्हा या देशाच्या दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यामुळे दोन्ही देशांतील संबंध वृद्धिंगत होण्यास मदत झाली, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. 

ऊर्जा, व्यापार या क्षेत्रांमध्ये या दोन्ही देशांचे संबंध आहेत. ‘यूएई’ची भारतात गुंतवणूक आहे. भारतीय उद्योजकांनीही ‘यूएई’त गुंतवणूक केली असून, तेथे उद्योगही उभारले आहेत. 

भारताच्या खनिजतेल आयातीपैकी आठ टक्के आयात ‘यूएई’मधून केली जाते. भारताला खनिज तेलाचा पुरवठा करणारा यूएई हा पाचव्या क्रमांकाचा मोठा पुरवठादार देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुढाकाराने सुरू झालेल्या इंटरनॅशनल सोलर अलायन्स या गटात ‘यूएई’ही सहभागी आहे. 

भारत-यूएई या देशांमधील व्यापार २०१७मध्ये सुमारे ५० अब्ज अमेरिकी डॉलर एवढा होता. त्यामुळे भारत हा ‘यूएई’चा व्यापारामधील दुसरा मोठा भागीदार देश आहे. तसेच यूएई हा भारताचा व्यापारामधील तिसऱ्या क्रमांकाचा भागीदार देश आहे. (चीन आणि अमेरिका हे पहिले दोन देश आहेत.) भारतातून सर्वाधिक निर्यात होणाऱ्या देशांमध्ये ‘यूएई’चा दुसरा क्रमांक लागतो. २०१६-१७मध्ये भारताने ‘यूएई’ला केलेल्या निर्यातीचे मूल्य ३१ अब्ज डॉलरहून अधिक होते.

‘‘यूएई’ने केवळ पंतप्रधानांनाच नव्हे, तर भारत देश आणि सर्व भारतीयांनाही सन्मानित केले आहे. इस्लामिक जगताशी आतापर्यंतचे सर्वांत चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी आणि यूएईसोबत असलेल्या धोरणात्मक भागीदारीचे नवे पर्व सुरू करण्यासाठी पंतप्रधानांनी केलेल्या कार्याची दखल याद्वारे घेतली गेली आहे,’ अशी प्रतिक्रिया परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरद्वारे व्यक्त केली आहे.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search