Next
मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्राला नवी दिशा दिली : पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
महाजनादेश यात्रेचा नाशिकमध्ये समारोप
BOI
Thursday, September 19, 2019 | 05:52 PM
15 0 0
Share this article:



नाशिक :
‘गेल्या पाच वर्षांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण बहुमत नसतानाही स्थिर, प्रगतिशील आणि राज्याला समर्पित असे सरकार चालवून महाराष्ट्राला नवी दिशा दिली आहे. फडणवीस सरकारचे प्रगतिपुस्तक म्हणजे महाराष्ट्राच्या उत्थानाची कहाणी आहे,’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १९ सप्टेंबर रोजी नाशिकमध्ये जाहीर सभेत केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यव्यापी महाजनादेश यात्रेच्या समारोपप्रसंगी पंतप्रधान बोलत होते. 



या वेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष व केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, प्रदेश निवडणूक प्रभारी व भाजप राष्ट्रीय सरचिटणीस भूपेंद्र यादव, उदयनराजे भोसले, प्रदेश प्रभारी व राष्ट्रीय सरचिटणीस सरोज पांडे, भाजप राष्ट्रीय सहसंघटनमंत्री व्ही. सतीश जी, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे, गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, पणनमंत्री राम शिंदे, शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार, ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे, प्रदेश संघटनमंत्री विजयराव पुराणिक आणि यात्राप्रमुख प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर उपस्थित होते. गिरीश महाजन यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षांच्या कामगिरीचे प्रगतिपुस्तक जनतेसमोर मांडण्यासाठी महाजनादेश यात्रा काढली. गेल्या पाच वर्षांत त्यांच्या सरकारच्या काळात राज्याला स्थिरता, विकास, कायदा-सुव्यवस्था, सामाजिक सद्भाव, आधुनिक पायाभूत सुविधा, सांस्कृतिक वारश्याचा सन्मान, गुंतवणुकीसाठी चांगले वातावरण, शेतकऱ्यांना संपूर्ण मदत, महिलांना धुरापासून मुक्ती आणि आदिवासींना आवाज अशा गोष्टी मिळाल्या. फडणवीस सरकारचे प्रगतिपुस्तक म्हणजे महाराष्ट्राच्या उत्थानाची कहाणी आहे आणि त्यामध्ये आगामी काळातील भव्यतेचे संकेत आहेत.’



‘गेल्या पाच वर्षांत जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून १७ हजार गावे जलपरिपूर्ण झाली. त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या टीमचे मी अभिनंदन करतो. या कामाला आगामी काळात आणखी गती द्यायची आहे. एकदा महाराष्ट्र पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला, की प्रत्येक क्षेत्रात राज्याची प्रगती होण्याला कोणी रोखू शकत नाही. देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या पाच वर्षांत विकासाला समर्पित आणि भ्रष्टाचारमुक्त सुशासन दिले आहे. हे काम पुढे चालू राहण्यासाठी त्यांना ऊर्जा द्यायची आहे. राज्यात पुन्हा लोडशेडिंग येऊ नये यासाठी भारतीय जनता पक्षाचे सरकार पुन्हा निवडून येणे आवश्यक आहे. महाजनादेश यात्रा संपल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांचे काम सुरू झाले आहे,’ असे पंतप्रधान म्हणाले.



‘राम मंदिराबाबत न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवा’
‘गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून अयोध्येतील राम मंदिराविषयी काही उलटसुलट वक्तव्ये काही तोंडाळ लोक करत आहेत. या विषयावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू आहे. संबंधित सर्व पक्ष आपली बाजू मांडत आहेत आणि न्यायालय सर्वांचे म्हणणे ऐकून घेत आहे. अशा वेळी ही वाचाळ मंडळी कोठून आली, याबद्दल मी अस्वस्थ आहे. त्यांना संपूर्ण प्रक्रियेत अडथळा निर्माण करायचा आहे का, हा प्रश्न आहे. सर्वोच्च न्यायालयावर भरवसा असला पाहिजे. देशाच्या संविधानावर विश्वास असला पाहिजे. कृपा करून प्रभू रामचंद्रासाठी डोळे झाकून न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवा, अशी मी हात जोडून विनंती करतो,’ असे पंतप्रधान म्हणाले.

‘छत्रपतींनी दिलेल्या पगडीच्या प्रतिष्ठेसाठी आयुष्य खर्ची घालू’
‘छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी माझ्या डोक्यावर पगडी घातली, हा मी आयुष्यातील बहुमूल्य क्षण मानतो. हा सन्मान आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांप्रति दायित्वाची सूचनाही आहे. या पगडीची प्रतिष्ठा राखण्यासाठी आम्ही आयुष्य खर्ची घालू. त्यासाठी जनतेने आशीर्वाद द्यावा,’ असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
 
‘नया कश्मीर बनाना है, हर कश्मिरी को गले लगाना है’
जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याबद्दलही पंतप्रधानांनी भाष्य केले. ‘जम्मू आणि काश्मीरमध्ये देशाचे संविधान पूर्णपणे लागू करावे हा सर्व १३० कोटी भारतीयांचा निर्णय आहे. जम्मू-काश्मीरला हिंसा, दहशतवाद आणि भ्रष्टाचाराच्या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी हा निर्णय घेतला गेला. हा निर्णय देशाच्या अखंडतेसाठीच्या आमच्या वचनबद्धतेमुळे आहे, तसाच तो जनतेच्या आकांक्षांच्या पूर्ततेचे माध्यम आहे. कालपर्यंत म्हणत होतो, की ‘वह कश्मीर हमारा है.’ आता घोषणा द्यायची आहे, की ‘नया कश्मीर बनाना है, हर कश्मिरी को गले लगाना है.’ पुन्हा एकदा काश्मीरला स्वर्ग बनविण्याचा आपला संकल्प आहे. जुन्या केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे चाळीस वर्षे यातना सोसणाऱ्या जम्मू-काश्मीरला या संकटातून मुक्त करणे हे संपूर्ण देशाचे काम आहे,’ असे ते म्हणाले.

‘जम्मू काश्मीरमध्ये अस्थिरता, अविश्वास आणि हिंसाचाराचा प्रयत्न सीमेपलीकडून होत असला, तरी त्या राज्यातील युवकांना आता विकास आणि रोजगाराच्या संधी हव्या आहेत. जम्मू, काश्मीर आणि लडाखमध्ये नव्या संधी आणि शक्यता निर्माण होत असताना आणि ३७० कलम रद्द करण्याचा मोठा निर्णय लागू करण्यासाठी संपूर्ण देशाची एकजूट झाली असताना विरोधी पक्ष यामध्येही राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत असल्याने मी हैराण झालो आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या विधानांच्या आधारावर परदेशात भारतावर टीका केली जाते हे दुर्भाग्य आहे. काँग्रेसचा गोंधळ समजू शकतो; पण शरद पवारांसारखा अनुभवी नेता काही मतांसाठी चुकीचे विधान करतो, त्या वेळी दुःख होते. पवार यांना शेजारी राष्ट्र आणि तेथील शासक चांगले वाटत असतील तर ती त्यांची मर्जी आहे; पण दहशतवादाचा कारखाना कोठे आहे, तसेच अत्याचार आणि शोषण कोठे चालू आहे, हे सर्व जण जाणतात.’
 
‘सरकारच्या शंभर दिवसांत आश्वासनपूर्तीसाठी काम’
‘केंद्रामध्ये भाजपचे सरकार नव्याने सत्तेवर येऊन आता शंभर दिवस झाले आहेत. या काळात नव्या भारताचा नवा दृष्टिकोन स्पष्ट झाला आहे. विकासाचा जोश आहे आणि भारताच्या वैश्विक ताकदीचा संदेशही आहे. या काळात आर्थिक सुधारणा आणि रोजगारनिर्मितीचा प्रयास केला आहे. शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधीचा लाभ देण्याचे आश्वासन पूर्ण केले आहे. त्यासाठी देशभरात २० हजार कोटींचा निधी देण्यात आला. छोटे शेतकरी, तसेच छोटे व्यापारी-दुकानदार यांच्यासाठीची पेन्शन योजना सुरू झाली आहे. गावे आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी देशातील पन्नास कोटी पशुधनाच्या लसीकरणाला सुरुवात केली आहे. आदिवासी समाजातील मुलांसाठी एकलव्य आदर्श शाळा निर्माण करण्याचा निर्णय घेतला होता, त्यानुसार ४६५ शाळांचे काम सुरू झाले आहे. आतापर्यंत घरोघर वीज पोहोचवली आणि शौचालयांचे काम केले. त्याचप्रमाणे आता घरोघरी पिण्याचे पाणी पोहोचविण्याचा निर्धार केला असून, त्याचे काम सुरू झाले आहे,’ असे पंतप्रधान मोदींनी सांगितले.

प्लास्टिकमुक्तीचा निर्धार
‘महात्मा गांधी यांची दीडशेवी जयंती दोन ऑक्टोबर रोजी साजरी करताना देशाला प्लास्टिक कचऱ्यापासून मुक्त करण्याचा संकल्प करू या. एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकपासून देशाला २०२२पर्यंत मुक्त करावे, हा माझा निर्धार आहे,’ असेही मोदी यांनी स्पष्ट केले.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले जनतेचे आभार
‘पाच वर्षांपूर्वी मुख्यमंत्री म्हणून राज्याची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी जनतेचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानत आहे. मोदी यांच्या अपेक्षेनुसार मी पाच वर्षे प्रामाणिकपणे व पारदर्शीपणे सरकार चालविले असून, आमच्या सरकारला कोठेही भ्रष्टाचाराचा डाग नाही. महाजनादेश यात्रा ही चार हजार किलोमीटरची यात्रा म्हणजे विलक्षण प्रवास होता. राज्याच्या ज्या ज्या भागांत गेलो तेथे लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला,’ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

‘पाच वर्षांत उद्योग, गुंतवणूक, पायाभूत सुविधा अशा विविध क्षेत्रांत राज्य आघाडीवर आले आहे. गेल्या पाच वर्षांत केवळ लघू व मध्यम उद्योगांत ८९ लाख रोजगार निर्माण झाले आहेत. आम्ही स्वतःला सेवक मानतो, म्हणून जनतेला कामाचा हिशेब देतो. आम्ही कायम सेवकच राहू. जनतेने पुन्हा एकदा पाच वर्षे पारदर्शी व प्रामाणिकपणे सेवा करण्याची संधी द्यावी. जनता पुन्हा सेवकांनाच निवडून देईल असा विश्वास आहे,’ असेही फडणवीस म्हणाले.



‘फडणवीस हे दूरदृष्टी असणारे नेते’
‘महाजनादेश यात्रेचे राज्यात सर्वत्र विक्रमी स्वागत झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दूरदृष्टी असणारे, अखंड परिश्रम करणारे व सर्वांना बरोबर घेऊन जाणारे नेते आहेत. त्यांनी सर्व समाजाला दिलासा दिला आहे. अशक्य वाटणारी अनेक कामे त्यांनी केली आहेत. त्यामुळे यात्रेमध्ये जनतेने त्यांना आशीर्वाद दिला. राज्यातील प्रश्न पूर्णपणे सोडविण्यासाठी आगामी काळातही हेच मजबूत सरकार हवे आहे,’ असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search