Next
‘डीकेटीई’च्या विद्यार्थ्यांनी बनविल्या स्लिपिंग बॅग्ज
प्रेस रिलीज
Tuesday, June 18, 2019 | 05:28 PM
15 0 0
Share this article:

विद्यार्थ्यांनी बनविलेल्या स्लिपिंग बॅगसोबत प्राध्यापक.इचलकरंजी : येथील डीकेटीईच्या एमटेक व बीटेकच्या अंतिम वर्षाला शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी अत्याधुनिक अशा स्लिपिंग बॅग्जची निर्मिती केली आहे. वजनाने हलकी, अतिथंड, वारा आणि पाऊस या सर्वांचा विचार करून विद्यार्थ्यांनी या बॅगची निर्मिती केली. 

स्लिपिंग बॅगचा उपयोग सैन्यदल, गिर्यारोहक, फॉरेस्ट ऑफिसर्स, ट्रेकिंगसाठी, तसेच थंड हवेच्या ठिकाणी होतो. वॉटरप्रुफ असल्यामुळे पावसाळयातदेखील त्या वापरता येतात. बॅग्ज वजनाने हलक्या असून, प्रवासात नेण्यासही सोईस्कर आहेत. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या स्लिपिंग बॅग या गूज डाउन या पक्षाच्या पंखांपासून तयार केलेल्या असल्याने त्या अतिशय महागड्या आहेत. यासाठी लागणारे पंख हे दहा हजार रुपये प्रती १०० ग्रॅम अशा दराने अमेरिकेतून उपलब्ध होतात. त्यामुळे अशा खर्चिक बॅगना पर्याय म्हणून ‘डीकेटीई’च्या विद्यार्थ्यांनी नॉयलॉन पॉलिस्टरपासून स्लिपिंग बॅग्जची निर्मिती केली आहे. तयार केलेल्या स्लिपिंग बॅग्जच्या गुणवत्तेची रितसर चाचणी केल्यानंतर अतिथंड ठिकाणी लागणाऱ्या थर्मल प्रॉपर्टीज या बॅगमध्ये आहेत असा निष्कर्ष प्राप्त झाला.

‘डीकेटीई’च्या एमटेकमध्ये शिकत असलेला दर्शन पाटील व अंतिम वर्ष टीटीमध्ये शिक्षण झालेले विद्यार्थी आकाश विटेकरी, व्यंकटेश उरणे, संकेत वन्नुगरे व विवेक पाटील यांनी वेगवेगळे प्रकल्प निवडले होते. त्यापैकी दर्शन याने ‘डेव्हलपमेंट ऑफ स्लिपिंग बॅग्ज फॉर कोल्ड कंडिशन’ या विषयावर, तर इतर विद्यार्थ्यांनी ‘मॅन्युफॅक्चरिंग ऑफ स्लिपिंग बॅग्ज फ्रॉम नॉन वोव्हन’ या विषयावर संशोधनात्मक प्रकल्प पूर्ण केला आहे. 

‘डीकेटीई’तील इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरॅक्शनमुळे या विद्यार्थ्यांना थर्मल बाँडेड नॉन वोव्हन पॉलिस्टर फॅब्रिक व नॉयलॉन ब्रिदेबल फॅब्रिक हे अनुक्रमे बिरला सेंचुरी व कुसूमगर गुजरात यांनी मोफत उपलब्ध करून दिले. ‘डीकेटीई’च्या ग्रंथालयामध्ये उपलब्ध असलेल्या संशोधनात्मक पेपरचा विस्तृतपणे अभ्यास करुन प्रा. पी. एस. जोशी व प्रा. आर. एन. नरखेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण झाला.
 
‘डीकेटीई’स मिळालेल्या सेंटर ऑफ एक्सलन्स येथील अत्याधुनिक मशिनरीवर विद्यार्थ्यांनी कापडाच्या व बॅग्जच्या गुणधर्मांची चाचणी केली आहे. या विद्यार्थ्यांना ‘डीकेटीई’चे संचालक प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले, उपसंचालक प्रा. डॉ. यू. जे. पाटील व प्रा. अनिकेत भूते यांचे मार्गदर्शन मिळाले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search