Next
पुणे आकाशवाणीवरून ब्रेल लिपीतील बातम्यांचे सादरीकरण
लुई ब्रेल यांच्या जयंतीनिमित्त अंध व्यक्तींनी केले बातम्यांचे वाचन
BOI
Saturday, January 05, 2019 | 11:52 AM
15 0 0
Share this article:

ब्रेल लिपीतील बातम्यांचे वाचन करताना अंध वाचक

पुणे : नवनवीन उपक्रम राबवण्यात आघाडीवर असलेल्या पुणे आकाशवाणी केंद्राच्या वृत्त विभागाने ब्रेल लिपीचे जनक लुई ब्रेल यांच्या जयंतीनिमित्त चार जानेवारी २०१९ रोजी प्रादेशिक बातमीपत्रातील काही विशेष बातम्यांचे वाचन अंध व्यक्तींकडून करून घेतले. गेली तीन वर्षे या वृत्त विभागाकडून हा उपक्रम यशस्वीपणे राबवला जात आहे. 


सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी प्रसारित झालेल्या या बातमीपत्रात लुई ब्रेल आणि शिवाजी विद्यापीठातील संगीत आणि नाट्यशास्त्र विभागाच्या प्रमुख दृष्टी दिव्यांग डॉ. अंजली निगवेकर यांच्याविषयीच्या अशा दोन विशेष बातम्या तीन अंध वाचकांनी ब्रेल लिपीतून वाचल्या. पुणे अंधजन मंडळाच्या शंकर वाघमारे, लता पांचाळ आणि पूजा पाटील या तिघांनी हे वाचन केले. या विशेष बातम्यांचे आधी ध्वनिमुद्रण करण्यात आले होते. याशिवाय बातमीपत्रात वापरले जाणारे व्हॉइसकास्ट्स त्यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित करून घेण्यात आले असून, वृत्तविभागातर्फे प्रसारित होणाऱ्या ‘वार्ताचित्रा’तील काही भाग या अंध वाचकांनी वाचला आहे. 

ब्रेल लिपीतील बातम्यांच्या वाचनासाठी अंध विद्यार्थी वाचकांना मार्गदर्शन करताना मनोज क्षीरसागर आणि नीतिन केळकर.

आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणारे प्रादेशिक बातमीपत्र लाइव्ह असते. स्टुडिओमध्ये वृत्तनिवेदक थेट वाचन करत असतात. तेथील ध्वनियंत्रणा, वेळेचे नियोजन या सगळ्या बाबींचा विचार करता अंध वाचकांना संपूर्ण बातमीपत्र वाचणे सहज शक्य नाही, हे लक्षात आल्याने काही विशेष बातम्या आधी ध्वनिमुद्रित करून घेण्यात आल्या. त्यासाठी त्यांच्याकडून सराव करून घेण्याचे काम वृत्तनिवेदक मनोज क्षीरसागर यांनी केले. 

तीन वर्षापूर्वी ब्रेल लिपीतील बातमीपत्राचे वाचन करताना अंध वाचक धनराज पाटील

हा अनुभव अविस्मरणीय असल्याची भावना या वाचकांनी व्यक्त केली. या आधी तीन वर्षांपूर्वी पुणे ब्लाइंड मेन्स असोसिएशनचे धनराज पाटील यांनी बातमीपत्राचे लाइव्ह वाचन केले होते. 

आकाशवाणी पुणे केंद्रावरून दररोज सकाळी सात वाजून १० मिनिटांनी प्रसारित होणारे प्रादेशिक बातमीपत्र म्हणजे महत्त्वाच्या घडामोडींचा आरसा. हे बातमीपत्र राज्यभरातील श्रोत्यांच्या पसंतीचे आहे. या बातमीपत्राचे कामकाज वृत्तविभागातर्फे केले जाते. सध्या या विभागाचे प्रमुख म्हणून नीतिन केळकर कार्यरत आहेत. त्यांच्या पुढाकाराने आणि वृत्तनिवेदक मनोज क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली अंध व्यक्तींनी बातमीपत्राचे वाचन करण्याचा उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात आला आहे. या अनोख्या उपक्रमाचे श्रोत्यांकडून कौतुक होत आहे. 


यासाठी बातमी कशी वाचावी, याचे अंध व्यक्तींना काही दिवस सातत्याने प्रशिक्षण देण्यात येत होते. यासाठी अनेक व्यक्ती उत्सुक होत्या. त्यातून काहींची निवड करण्यात आली. शुक्रवारी, चार तारखेला सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी राज्यभरात प्रसारित झालेल्या बातमीपत्रातील काही महत्त्वाच्या बातम्यांचे वाचन हे अंध व्यक्तींनी अगदी उत्तमपणे केले. 

(लुई ब्रेल यांच्या जयंतीनिमित्त पुणे आकाशवाणी वृत्तविभागातर्फे प्रादेशिक बातमीपत्रातील ब्रेल लिपीतील काही विशेष बातम्यांचे वाचन अंध वाचकांनी केले होते. ते बातमीपत्र सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Santosh About 223 Days ago
Veri Good
0
0
Nitin Kelkar About 226 Days ago
Thanks
1
0

Select Language
Share Link
 
Search