Next
मोहब्बत जिंदा रहती है...
BOI
Sunday, November 25, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

हंसराज बहल आणि मोहम्मद रफीअनेक श्रवणीय गीते दिलेले संगीतकार हंसराज बहल यांचा जन्मदिन (१९ नोव्हेंबर) नुकताच होऊन गेला. त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’ सदरात आज आस्वाद घेऊ या त्यांनी संगीत दिलेल्या ‘मोहब्बत जिंदा रहती है...’ या गीताचा...
.............
मधुर व आकर्षक संगीत असलेली गाणी देऊनही उपेक्षा वाट्याला आलेल्या संगीतकार हुस्नलाल भगतराम यांच्याबद्दल या सदरात गेल्या आठवड्यात लिहिले. ते लिहितानाच असे आणखी काही संगीतकार आठवले. त्यामध्ये एक नाव होते संगीतकार हंसराज बहल यांचे.

आता, ‘कोण हे हंसराज बहल’ असा प्रश्न उभा राहिल्यास १५ ऑगस्ट २६ जानेवारी या दिवशी ऐकवली जाणारी गाणी ऐका, असे सांगायला लागेल. त्या गीतांमध्ये ‘जहाँ डाल डाल पार सोने की चिडिया करती है बसेरा...’ हे ‘सिकंदर-ए-आझम’ या चित्रपटातील गीत अनेकांनी ऐकले आहे, ऐकत आहेत. सहज गुणगुणतही असतात; पण १९६५मधील चित्रपटामधून पुढे आलेले हे गीत हंसराज बहल या संगीतकाराने संगीतात गुंफले होते, हे मात्र विसरले जाते. 

‘सिकंदर ए-आझम’चे हे एकच गीत नव्हे, तर एकेकाळी लोकप्रिय असलेली ही काही गीते बघा. ‘आए भी अकेला जाए भी अकेला...’ (दोस्त - १९५४), ‘हाय चंदा गए परदेस...’ (चकोरी - १९४९), ‘सब कुछ लुटाया हमने...’ (चुनरिया - १९४८), ‘मोहब्बत जिंदा रहती है...’ (चंगेझखान - १९५७), ‘भीगा भीगा प्यार का समा...’ (सावन - १९५९), ‘हाए जिया रोए...’(मिलन - १९५८), ‘दिन हो या रात...’ (मिस बॉम्बे - १९५७) 

ही अशी मधुर गीते आपल्या मधुर संगीतातून रसिकांपर्यंत पोहोचवणारा हा संगीतकार ‘टॉप’च्या संगीतकारांत गणला जात नाही. त्यांचे प्रारब्ध हे त्याचे कारण होतेच; पण पूर्वी बी-ग्रेडचे, सी-ग्रेडचे चित्रपट म्हणून ज्यांची संभावना होत असे, त्यामधील कलावंत दुर्लक्षित राहत असत. हंसराज बहल यांच्या वाट्याला असे काही चित्रपट आल्यामुळे ते तसे दुर्लक्षित राहिले. परंतु अशा चित्रपटातील त्यांची गीते मात्र ‘ए’ ग्रेडचीच होती.

सावन या १९५९च्या चित्रपटातील ‘नैन द्वारसे मन में वो आए...’ हे लता मंगेशकर व मुकेश यांनी गायलेले गीत वेगळे होते. अत्यंत मंदगती व अत्यंत द्रुतगती असे दोन्ही प्रकार एकाच गीतात असण्याचा प्रयोग हंसराज बहल यांनी प्रथम केला होता व तो अप्रतिम होता. १९४८च्या चुनरिया चित्रपटातील ‘दिले नाशाद को जीने की हसरत हो गायी...’ या गीताची त्यांची चाल १९७०मध्ये ‘जीवन-मृत्यू’ चित्रपटात संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी वापरली होती. हंसराज यांचे संगीत हे असे अक्षर आहे. 

अशा या संगीतकाराचा जन्म १९ नोव्हेंबर १९१६ रोजी पंजाबातील शेखपुरा गावी (ते गाव सध्या पाकिस्तानात आहे) निहालचंद बहल या बड्या जमीनदाराच्या घरी झाला होता. नुकत्याच होऊन गेलेल्या त्यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या स्मृतीला उजाळा मिळावा, या उद्देशाने त्यांची ही माहिती व थोरवी येथे नमूद करीत आहे. 

हंसराज बहल यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या घरातील पूर्वजांपैकी कोणीही संगीतज्ञ नव्हते; पण हंसराज यांना बालपणापासून संगीताची आवड होती. ते आठ-दहा वर्षांचे असताना गावात होणाऱ्या ‘रामलीला’ कार्यक्रमात पार्श्वसंगीत तयार करून वाजवत असत. अंबाला येथील आचार्य चिरंजीवीलाल यांच्याकडून त्यांनी संगीताचे शिक्षण घेतले व लाहोरमधील अनारकली बझार या भागात त्यांनी संगीतशाळा सुरू केली. एचएमव्ही कंपनीकरिता त्यांनी काही गैर-फिल्मी गीतेही रेकॉर्ड केली होती. त्यांचे संगीताचे कार्यक्रम पंजाबात त्या काळात होत असत व बहल म्युझिक क्लास लोकप्रिय ठरला होता. 

त्यांचे चुलते चुनीलाल बहल यांची पृथ्वीराज कपूर यांच्याशी ओळख होती. त्यामुळे त्या ओळखीच्या आधारे त्यांचा मुंबईच्या चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. पं. गोविंदराम यांच्याकडे सहायक म्हणून काम मिळाल्यावर काही दिवसांनंतर त्यांनी स्वतंत्र संगीतकार म्हणून कामाला सुरुवात केली. 

६७ चित्रपटांना संगीत देणाऱ्या या संगीतकाराने आपला भाऊ गुलसंगच्या साह्याने ‘एन. सी. फिल्स्क’ या चित्रसंस्थेची स्थापना केली. ते १९५४ हे वर्ष होते. ‘लाल परी’, ‘दरबार’, ‘मस्तकलंदर’, ‘राजधानी’ अशा काही चित्रपटांची निर्मिती या संस्थेने केली. ते चित्रपट बऱ्यापैकी होते. त्यातील एक तरी गाणे लोकप्रिय झालेले दिसून येते. गीतकार नक्श लायलपुरी, गायक सुरेंद्र, कोहली, गीतकार वर्मा मलिक अशा नवोदितांना आपल्या चित्रपटांतून संधी देऊन फिल्म इंडस्ट्रीत आणणाऱ्या हंसराज बहल यांनी क्लासिकल, राग, बंदीश, तसेच पंजाबी संगीत यांच्या साह्याने विविध प्रयोग करून वैविध्यपूर्ण संगीताची गीते रसिकांना दिली.

१९७४मध्ये ‘दो आँखें’ नामक चित्रपटाला संगीत देऊन त्यांनी आपली संगीतसेवा थांबवली. पुढे दहा वर्षांनी २० मे १९८४ रोजी त्यांचे निधन झाले. त्या वेळी वृत्तपत्रात सात-आठ ओळींत बातमी छापून आली होती. तत्पूर्वी मुंबईतील एका कार्यक्रमात अनेक जुन्या संगीतकारांचा गौरव झाला होता. तेव्हाही संयोजक हंसराज बहलना विसरले होते. असेही एकेकाचे नशीब असते. मानमरातब, लौकिक साऱ्यांच्याच वाट्याला येत नाहीत; पण सादर केलेली कला जर सुरेख, सुरेल व अप्रतिम असेल, तर ती मरत नाही, नष्ट होत नाही, अमरच असते. कमर जलालाबादी चंगेझखान चित्रपटातील गीतात लिहितात – ‘मोहब्बत जिंदा रहती है, मोहब्बत मर नहीं सकती.’ असेच कलाकृतीचे असते, नाही का? हंसराज बहल यांचे संगीत असलेले हे गीत आजही श्रवणीय आहे आणि ते आवर्जून ऐकलेही जाते.

आत्ता ज्या गाण्याचा उल्लेख आला आहे, तेच आजचे ‘सुनहरे गीत’ आहे. ते पाहण्याआधी त्याबद्दलची थोडी हकीकत पाहू! ज्या वेळी चंगेझखान चित्रपटाकरिता कमर जलालबादींनी हे गीत लिहिले, ते ऐकल्यावर हंसराज बहल यांना त्याचा अंतरा आवडला नाही. फक्त मुखडा आवडला! त्यामुळे त्यांनी गीतकार नक्श लायलपुरी यांना बोलावून घेतले. सर्व हकीकत सांगितली व मुखडा कायम ठेवून अंतरा बदलायला सांगितला. वास्तविक पाहता नक्श यांच्यापेक्षा कमर जलालबादी हे वयाने व अनुभवाने ज्येष्ठ होते. त्यामुळे हे असे काही करणे त्यांना योग्य वाटेना!

खूप चर्चा झाली व अखेर नक्श लायलपुरी हंसराज बहल यांना समजावून सांगण्यात यशस्वी झाले. आता कशाबशा दोन ओळींच्या अंतऱ्याला श्रवणीय बनवण्यासाठी त्यांनी आपले संगीतातील कौशल्य वापरले. त्यांना हवे तसे शब्द आळवण्यासाठी व प्रियकराची आर्तता स्वरांनी तंतोतंत उभी करण्यासाठी भूलोकीचा गंधर्व मोहम्मद रफी हाताशी होताच! आणि मग ‘चंगेझखान’चे ते गाणे तयार झाले. रसिकांना ते भावले व आजही ऐकले जाते!

पडद्यावर हे गीत प्रेमनाथ गातो. बरेच जण यातील रफीचा उच्च स्वर व गानकौशल्य यामुळे हे खास रफीचे गाणे म्हणून ओळखतात! मोहम्मद रफी यांचे कौशल्य आहेच; पण संगीतकाराचेही तेवढेच कौशल्य आहे, हे विसरून चालणार नाही.

काय आहे त्या गीतामध्ये? प्रेयसीला बोलावणारा प्रियकर फार मोठ्या अलंकारिक शब्दांचा वापर न करता साध्या शब्दांत प्रेयसीला सांगतो आहे. गीताच्या आधीच्या काव्याच्या त्या ओळी मोहम्मद रफी गातात - 

जाग मेरे प्यारकी आवाजासे 
जिंदगी बेताब है तेरे लिए 
आ गले लग जा उसी अंदाज से

आपल्या स्वप्नांना दूर करून (हे प्रिये) तुझे नेत्र उघड/माझ्या (निस्सीम) प्रेमाची साद ऐकून जागी हो! तुझी प्राप्ती व्हावी म्हणून माझे जीवन/मन बैचेन झाले आहे आणि हेच जाणून (तू ये आणि) माझ्या मिठीमध्ये सामावून जा! 

असे प्रेयसीला सांगून तो पुढे म्हणतो - येथे संगीतासह गीत सुरू होते -

मोहब्बत जिंदा रहती है, मोहब्बत मर नहीं सकती 
अजी इन्सान क्या, ये तो खुदा से डर नहीं सकती

(तुझ्यावरचे माझे) प्रेम (कायम) जिवंत राहणार आहे, ते मरू शकत नाही. (असे निस्सीम प्रेम) कोणा माणसालाच काय, पण परमेश्वरालाही घाबरू शकत नाही. पहिल्या कडव्यात आता तो प्रियकर म्हणतो -

ये कह दो मौत से जाकर के इक दिवाना कहता है 
कोई दिवाना कहता है 
मेरी रूहे मोहब्बत मुझसे पहले मर नहीं सकती 

(अरे त्या) मृत्यूला कोणी तरी जाऊन सांगा, की (एक प्रेम) दिवाना म्हणतो आहे, कोणी (एक प्रेम) दिवाना म्हणत आहे, की प्रेम हाच माझा आत्मा आहे, तो माझ्या आधी मरू शकत नाही. 

आणि प्रीतीच्या मार्गात आडवे येणाऱ्यांना असे सांगितल्यावर तो प्रियकर आपल्या प्रेयसीला सांगतो -

चली आओ मेरी जाने तमन्ना दिल की महफिल में चली आऽऽऽ चलीऽऽऽ
तुम मुझसे दूर हो उल्फत गवारा कर नहीं सकती

माझ्या जीवनाची इच्छा असणाऱ्या (हे माझ्या प्रिये तू) माझ्या हृदयाच्या/मनाच्या मैफलीत ये! लगेच ये! ये! (अग) तू माझ्यापासून दूर असावीस, हा विचारही माझ्या प्रेमाला मान्य नाही म्हणून तू ये! तू ये! 

या अंतऱ्यानंतर गीत संपते; पण ते संपत असताना ‘चली आ’ हे शब्द पुन्हा पुन्हा गाऊन त्या गीताचा शेवट प्रभावी बनवला आहे.

असे हे सुनहरे गीत संगीतकार हंसराज बहल यांच्या स्मृतीसाठी!

- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या त्यांच्या ‘सुनहरे गीत’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/8ABN2G या लिंकवर एकत्रितपणे उपलब्ध आहेत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search