Next
रत्नागिरी जिल्ह्यातील ९५ जणांना डिजिटल श्रवणयंत्रांचा लाभ
पुणे येथे डिजिटल श्रवणयंत्र वितरणाचा विश्‍वविक्रम
BOI
Wednesday, October 31, 2018 | 10:55 AM
15 0 0
Share this article:

रत्नागिरीतील केशव प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थी.

रत्नागिरी : पुणे येथील म्हाळुंगे-बालेवाडी येथे सहा तासांत साडेचार हजारांहून अधिक कर्णबधिर विद्यार्थी व ज्येष्ठांना डिजिटल श्रवणयंत्र वितरणाचा विश्‍वविक्रम अलीकडेच नोंदवला गेला. रत्नागिरीतील केशव प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालयातील ३७ विद्यार्थ्यांसह जिल्ह्यातील सुमारे ९५ जणांना याचा लाभ मिळाला.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान (मुंबई), अमेरिकेतील स्टार्की हिअरिंग फाउंडेशन व टाटा ट्रस्ट (मुंबई), पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, आर. व्ही. एस. एज्युकेशनल अँड चॅरिटेबल फाउंडेशन, ठाकरसी ग्रुप, स्टार्की इंडिया यांच्या वतीने आणि महात्मा गांधी सेवा अपंग पुनर्वसन केंद्र, पुणे व अपंग कल्याण आयुक्तालय यांच्या सहकार्याने श्रवणयंत्र जोडणी शिबिर म्हाळुंगे-बालेवाडी येथे झाले. अभ्यंकर विद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत शिक्षक गजानन रजपूत व काही पालक सहभागी झाले होते. हे यंत्र प्रत्येकी २५ हजार रुपये किमतीचे असून, त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे.

पहिल्या टप्प्यात राज्यातील १८ जिल्ह्यांतील सहा हजार विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करून कानाचे माप घेण्यात आले होते. त्यापैकी चार हजार ८०० जणांना यंत्र देण्याचा विक्रम झाला. त्यामुळे गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे पत्र संयोजकांना देण्यात आले. या कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, स्टार्कीचे अध्यक्ष विल्यम ऑस्टिन, टॅनी ऑस्टिन, खासदार सुप्रिया सुळे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

यंत्रे बसविल्यानंतर कर्णबधिर मुले आणि ज्येष्ठ नागरिकांची भाषा, वाचा आदींच्या अनुषंगाने लाभार्थ्यांमध्ये होत जाणार्‍या विकासाचा आढावासुद्धा आयोजकांकडून घेतला जाणार आहे. श्रवणयंत्रांच्या किमती आवाक्यात नसल्याने अनेकांना बहिरेपणा हा शाप बनून राहतो. अशा व्यक्तींना ध्वनिलहरींच्या माध्यमातून जीवनलहरी प्रदान करण्यासाठी गेली काही वर्षांपासून खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकाराने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि स्टार्की हिअरिंग फाउंडेशन यांच्यातर्फे ‘हिअरिंग एड’चे मोफत वाटप करण्यात येते. गेल्या पाच वर्षांपासून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने १५ हजार कर्णबधिर विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना श्रवणयंत्रांचे वाटप करण्यात आले आहे.

रुग्णनिश्‍चितीमध्ये कर्णबधिर व्यक्ती ‘हिअरिंग एड’ लावल्यानंतर ऐकू शकेल का, याची तपासणी केली जाते. यानंतरचा दुसर्‍या टप्प्यात त्या व्यक्तीला ‘हिअरिंग एड’ लावले जातात. या टप्प्यात त्या व्यक्तीला ‘हिअरिंग एड’ सोबत त्याची बॅटरी दिली जाते. याशिवाय त्याची काळजी कशी घ्यावी हे सांगितले जाते. तिसर्‍या टप्प्यात ‘हिअरिंग एड’ बसविल्यानंतर त्या व्यक्तीला नव्या परिस्थितीशी कसे जुळवून घेता येईल याबाबतचे प्रशिक्षण दिले जाते. शेवटच्या आणि चौथ्या टप्प्यात व्यक्ती ‘हिअरिंग एड’सोबत जुळवून घेऊन सर्वसामान्य आयुष्य जगण्यास सुरुवात करतो.

औरंगाबादमधून नोव्हेंबर २०१३ साली या मिशनची सुरुवात झाली. येथे आयोजित केलेल्या शिबिरात दीड हजार कर्णबधीर विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना ‘हिअरिंग एड’ देण्यात आली. त्यानंतर ऑगस्ट २०१४मध्ये पुण्यात एक हजार, फेब्रुवारी २०१५मध्ये ठाणे येथे अकराशे विद्यार्थी, इंदापूर येथे आयोजित शिबिरात बारामती आणि इंदापुरातील ५०० व्यक्ती, ऑगस्ट २०१६मध्ये बारामतीत ७५० विद्यार्थी आणि २५० व्यक्ती, तर २०१७ साली बारामती आणि परिसरात आयोजित दोन शिबिरांमधून अठराशे विद्यार्थ्यांना ‘हिअरिंग एड’ वितरीत करण्यात आली.

या कार्यक्रमांतर्गत पुणे, सातारा, सांगली, हिंगोली, परभणी, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, रायगड, ठाणे, उस्मानाबाद, नांदेड, जालना, औरंगाबाद, लातूर, बीड, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव, बुलढाणा, सिंधुदुर्ग अशा १८ जिल्ह्यांमधील सुमारे सहा हजार कर्णबधिर विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना ‘हिअरिंग एड’ वितरित केली जाणार आहेत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search