Next
निवडणुकीसाठी बिनमहत्त्वाच्या गोष्टी
प्रसन्न पेठे
Wednesday, October 25 | 03:03 PM
15 0 0
Share this story

देशासाठी अत्यंत महत्त्वाच्या, जिव्हाळ्याच्या आणि गंभीर प्रश्नांकडे अत्यंत वस्तुनिष्ठपणे पाहत, त्याविषयीचे आपले परखड विचार आणि मते ठोसपणे मांडणाऱ्या आणि वाचकांना अंतर्मुख करणाऱ्या ३० वैचारिक लेखांचे ‘निवडणुकीसाठी बिनमहत्त्वाच्या गोष्टी’ असे वेगळ्या धाटणीचे शीर्षक असलेले पुस्तक अजय महाजन यांनी आपल्यासमोर आणले आहे. त्या पुस्तकाचा परिचय...
...........
काही जाडजूड ग्रंथ वरकरणी विद्वज्जड आणि वैचारिक आभास निर्माण करून आपल्यासमोर येतात. परंतु त्यातून फारसे काही हाती लागत नाही. याउलट काही छोटेखानी पुस्तके मात्र आपल्या छोट्या रूपात बरेच काही वैचारिक खाद्य पुरवून जातात. अजय महाजन यांनी आपल्या ‘निवडणुकीसाठी बिनमहत्त्वाच्या गोष्टी’ या मार्मिक शीर्षकाच्या पुस्तकातल्या ३० लेखांद्वारे, गतैतिहासाच्या उजळणीबरोबरच आधुनिक काळाच्या गंभीर सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचे भान वाचकांसमोर ठेवले आहे.

मुळात भारतात गेली अनेक वर्षे निवडणुका या मुख्यतः वीज, पाणी, रस्ते यांसारख्या त्याच त्याच विषयांवर लढल्या जात आहेत. त्यामुळे लोकशाहीचा अर्थ आणि उपयोग काय, लोकशाही ही केवळ प्रतीकात्मकच उरली आहे का, आंतरराष्ट्रीय समुदायात भारतीयांना अभिमान वाटेल असं काही या लोकशाहीत घडू शकेल का, विकास प्रक्रियेत येणाऱ्या सामाजिक आणि मानसिक ताणाला भारतीय नागरिक तोंड देऊ शकेल का, भारतीय राज्यसंस्था काही कामे करणार, की सर्वच निर्णय घेण्याचे काम सुप्रीम कोर्टावर सोडून देणार, सामान्य माणसाला भरपूर कर भरूनही सरकारी सेवा उपलब्ध का होत नाहीत अशा अनेक समस्या या खरे तर निवडणुकीसाठी ज्वलंत विषय बनायला हव्यात; पण प्रत्यक्षात त्या निवडणुकीसाठी ‘बिनमहत्त्वाच्या’ बनल्या आहेत आणि त्या कशा याचा ऊहापोह या पुस्तकात केला आहे. २०११ ते २०१३ मधल्या दोन वर्षांत महाजन यांनी लिहिलेले लेख या पुस्तकात घेतले असल्याने त्यानंतरच्या चार वर्षांत बदललेल्या परिस्थितीवरचे भाष्य यात नाही. 

जागतिक पटलावर गेली कित्येक दशके लोकशाही, हुकुमशाही, साम्यवाद आणि समाजवाद या वेगवेगळ्या राजकीय पद्धती अस्तित्वात होत्या; पण एकविसाव्या शतकाचा उदय होता होता ‘अतिरेकी संघटना किंवा आतंकवाद’ या एका नव्याच भयानक क्रूर विचारपद्धतीला सामोरे जावे लागत आहे. ‘जगा आणि जगू द्या’ मानणारी हिंदू संस्कृती, अध्यात्माचे महत्त्व, व्यास आणि कौटिल्यासारख्या पूर्वसुरींनी दाखवून दिलेल्या सांस्कृतिक एकात्मता आणि लोकहित साधणाऱ्या कल्याणकारी राज्यसंस्था-पद्धती, नंतरच्या काळातले शिवाजी महाराज आणि पेशव्यांचे राज्य, पुढे ब्रिटिशांनी धूर्तपणे भारतावर केलेले राज्य आणि विनाशकारी फाळणी, स्वतंत्र भारतासाठी आंबेडकरांनी आखून दिलेली घटनेची चौकट अशा अनेक संदर्भांच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या भारतासमोर उभी असलेली समाज एकसंध राखण्याची कसोटी आणि त्याच वेळी देशाच्या सर्व दिशांच्या सर्व प्रकारच्या शत्रूंनी एकत्रितपणे चालवलेली भारतविरोधी आणि विशेषतः हिंदुविरोधी मोहीम यावर अजय महाजन यांनी नेमकेपणे बोट ठेवले आहे. 

भारताविषयी एक देश म्हणून, राष्ट्र म्हणून, मातृभूमी/जन्मभूमी/कर्मभूमी/पुण्यभूमी/देवभूमी/मोक्षभूमी म्हणून किती लोकांना आत्मीयता वाटते आणि ती वाटण्यासाठी काय करायला हवे, राष्ट्रीय चारित्र्याचे नेते निर्माण होण्यासाठी श्रीराम आणि श्रीकृष्ण यांचे आदर्श का आणि कसे ठेवायला हवेत याविषयी त्यांनी समर्पक विवेचन केले आहे. जातिभेद आणि धर्मभेद नष्ट करण्यासाठी पावले उचलत असताना सभ्यता आणी संस्कृती यांचा मेळ कसा राखता येईल, ‘जेएनयू’मधल्या विघटनवादी वृत्तींना आळा घालण्यासाठी काय करता येईल, आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आर्थिक, औद्योगिक, सामरिक, वैज्ञानिक प्रगती साधताना अध्यात्माची साथ धरूनच पुढे जाणे का महत्त्वाचे ठरेल हे महाजन यांनी या पुस्तकाच्या ३० प्रकरणांतून नेटकेपणे मांडले आहे.

आपल्या प्राचीन हिंदू संस्कृतीपासून भारतीय माणूस काही शिकला आहे का? सहाव्या शतकापर्यंत शक, कुशाण, हूण यांचे आक्रमण सहन करून, त्यानंतर १६व्या शतकापासून मुघल आणि पुढे एकोणिसाव्या शतकात ब्रिटिशांच्या जुलमी राजवटी झेलून भारतीयांनी काही बोध घेतला आहे का? देशाला स्वातंत्र्य मिळाले; पण भारतीयांना त्याचे यथोचित कौतुक आणि अभिमान आहे का? मुळात ‘लोकशाही’ म्हणजे काय हे आपल्याला समजले आहे का? एकता, समता, बंधुता याचा अर्थ सामान्य नागरिकाला समजला आहे का? धर्मभेद आणि जातिभेदामुळे भारताची शकले होत आहेत याचे भान भारतीयांना आहे का? – अशा, देशासाठी अत्यंत महत्त्वाच्या, जिव्हाळ्याच्या आणि गंभीर प्रश्नांकडे अत्यंत वस्तुनिष्ठपणे पाहत, त्या विषयीचे आपले परखड विचार आणि मते ठोसपणे मांडणाऱ्या आणि वाचकांना अंतर्मुख करणाऱ्या ३० वैचारिक लेखांचे ‘निवडणुकीसाठी बिनमहत्त्वाच्या गोष्टी’ असे वेगळ्या धाटणीचे शीर्षक असलेले हे पुस्तक अजय महाजन यांनी आपल्यासमोर आणले आहे. विचार करायला प्रवृत्त करणारे आणि त्यातून मंथन होऊन काही चांगले घडवू शकणारे हे पुस्तक नक्की वाचावे असेच आहे.
 
लेखक : अजय महाजन
प्रकाशक : बळवंत प्रिंटर्स प्रा. लि.
पृष्ठे : १२६ 
मूल्य : १५० रुपये  

(हे पुस्तक बुकगंगा डॉट कॉमवरून मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.) 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link