Next
बॅडमिंटनमधील नवी फुलराणी
BOI
Friday, June 08, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

पूर्वा बर्वे

साईना नेहवाल, पी. व्ही. सिंधू यांसारख्या खेळाडूंकडून प्रेरणा घेऊन देशभरात असंख्य मुली ‘बॅडमिंटनमध्ये आपणही चांगली कामगिरी करायची,’ या ध्येयाने प्रेरित झाल्या. पुण्याची पूर्वा बर्वे अशीच एक प्रतिभावान खेळाडू. तिने आता जागतिक स्तरावर आपल्या कामगिरीचा झेंडा फडकवला आहे... ‘क्रीडारत्ने’ सदरात या वेळी पाहू या बॅडमिंटनपटू पूर्वा बर्वेबद्दल...
............
सायना नेहवालपूर्वा बर्वे ही पुण्याची बॅडमिंटनपटू. पुण्यातील निखिल कानेटकर या राष्ट्रीय विजेत्या खेळाडू-प्रशिक्षकाकडे पूर्वा बॅडमिंटनचा सराव करते. ती केवळ सराव करत नाही, तर शारीरिक तंदुरुस्ती, स्किल डेव्हलपमेंट आणि मोठ्या मोठ्या खेळाडूंचे सामने पाहून तशा पद्धतीचा बिनतोड खेळ आपल्याकडून कसा होईल, यासाठी त्या प्रकारचे प्रशिक्षण ती घेते. तिची हीच सतत काहीतरी नवीन शिकण्याची जिद्द इतर खेळाडूंपेक्षा तिला वेगळं ठरवते. आज पुण्यात या खेळाच्या कितीतरी अकादमी आहेत; पण एकोणीस वर्षांखालील गटात गेल्या दोन मोसमांत जे सातत्य पूर्वाने दाखवलं आहे, ते कोणालाही जमलेलं नाही.

इस्रायलमध्ये अलीकडेच पार पडलेल्या शीऑन लोझीऑन खुल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत एकोणीस वर्षांखालील मुलींच्या गटात पूर्वाने सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद मिळवलं. चौथं मानांकन असलेल्या पूर्वाने या स्पर्धेच्या विजेतेपदाच्या लढतीत रशियाच्या अनास्ताशिया पुस्तीनसमीयाचा २१-१९, १९-२१ व २१-१३ असा धुव्वा उडवला. सुमारे एक तास सहा मिनिटे चाललेल्या या सामन्यात पूर्वाने दुसरा गेम गमावूनही पिछाडीवरून सरस खेळ केला. जागतिक स्तरावर एकोणीस वर्षांखालील गटात विसावे मानांकन असलेल्या पूर्वासाठी यंदा स्पर्धेचा ड्रॉ खडतर होता; पण अनुभव आणि मोक्याच्या क्षणी समोरच्या खेळाडूवर दडपण आणण्याची तिची क्लृप्ती चमत्कार ठरली. गेल्या वर्षी जेव्हा पूर्वाने याच स्पर्धेतील विजेतेपद मिळवलं होतं, त्याच वेळी इटलीमध्ये झालेल्या कुमार गटाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही तिने विजेतेपद मिळवून डबल धमाका साधला होता. यंदाचं विजेतेपद धरून कारकिर्दीत तिने तीन आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या आहेत.

एकोणीस वर्षांखालील जागतिक विजेतेपद स्पर्धेसाठीही गेल्या वर्षी तिची निवड झाली होती. या स्पर्धेत तिला जागतिक स्तरावरील मानांकित खेळाडूंविरुद्ध खेळण्याचा अनुभवही मिळाला आणि त्यांचा सराव पाहून आपल्यात काय सुधारणा कराव्या लागतील, याची माहितीही मिळाली. ही माहिती तिला भविष्यातील वाटचालीसाठी खूपच महत्त्वाची ठरणार आहे. या स्पर्धेनंतर तिरुअनंतपुरम येथे झालेल्या अखिल भारतीय ज्युनिअर राष्ट्रीय मानांकन स्पर्धेत तिने सुवर्णपदक पटकावले. निखिल कानेटकर यांच्या अकादमीतर्फे पूर्वाला प्रशिक्षणासाठी थायलंडच्या प्रसिद्ध बांचोनगार्ड बॅडमिंटन अकादमीत जाण्याची संधी मिळाली. या अकादमीत रेंचोक इतनॉन या जागतिक मानांकनात आठव्या स्थानावर असलेल्या खेळाडूकडून प्रशिक्षण घेण्याची संधी तिला मिळाली.

पुण्याने अनेक राष्ट्रीय महिला बॅडमिंटनपटू देशाला दिले आहेत. अदिती मुटाटकर, तृप्ती मुरगुंडे, सायली गोखले या खेळाडूंमध्ये आता पूर्वाचेही नाव घेतले जाते, इतका वारसा तिने जपला आहे. पूर्वाला घरातूनच या खेळासाठी मोठे प्रोत्साहन मिळाले आहे. तिचे वडील सुदीप बर्वे हे या खेळाचे नावाजलेले पंच आहेत. त्यामुळे आपली मुलगी प्रत्येक स्पर्धेत सहभागी व्हावी आणि त्यात तिने सरस कामगिरी करावी, यासाठी ते सातत्याने पाठिंबा देतात.

पुण्यात तसे पाहायला गेले, तर पूर्वाच्या जवळपास कामगिरी करणाऱ्याही काही मुली आहेत; पण त्या काही स्पर्धांत सहभागीच होत नाहीत किंवा इतर ठिकाणी प्रवास करून त्यातील स्पर्धांत कामगिरी करावी यासाठी इच्छुक नाहीत. पूर्वा केवळ इतर खेळाडूंसारखी जिल्हा, राज्यस्तरीय, आंतरक्लब, आंतरशालेय इतक्याच स्तरांवरील स्पर्धांकडे लक्ष केंद्रित करत नाही, तर राष्ट्रीय आणि त्याही पुढे आंतरराष्ट्रीय स्पर्धांकडे ती डोळे लावून बसलेली असते. हेच भविष्यात ती मोठा खेळाडू बनण्याचे सर्वांत मोठे लक्षण आहे. तिच्यासमोरचे आता सर्वांत मोठे लक्ष्य आहे, ते म्हणजे राष्ट्रीय विजेती बनण्याचे. त्याचबरोबर जसजसे वय वाढेल तसे त्या-त्या स्पर्धांमध्ये सहभागी व्हायचे, त्यात लक्षवेधी कामगिरी करायची आणि एक दिवस भारताचे प्रतिनिधित्व करायचे.

आतापर्यंत पूर्वाने ४९ स्पर्धा खेळल्या असून, त्यात ३३ विजेतेपदं मिळवली आहेत. सोळा वेळा तिला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं आहे. यंदाच्या जानेवारी महिन्यापासून तिने एकंदर सहा मोठ्या स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन चार वेळा विजेतेपद पटकावलं आहे, तर दोन वेळा ती उपविजेती ठरली आहे.

पी. व्ही. सिंधूअभिनव शाळेत मराठी माध्यमात शिकणारी पूर्वा अभ्यासातही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होते. शिवाय तिची शाळा व शिक्षक हेदेखील तिच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. मागील दहाहून अधिक वर्षे या खेळाशी जोडली गेल्याने तिला अनुभवही चांगला मिळाला आहे. संपूर्ण कोर्ट कव्हर करणे, व्हॉली, क्रॉसकोर्ट आणि बिनतोड स्मॅश हिच तिची अस्त्रे आहेत. येत्या काळातही तिला अनेक स्पर्धांमध्ये सहभागी व्हायचे आहे आणि जिंकायचे आहे. यातूनच साईना आणि सिंधू यांच्याप्रमाणे देशाला आणखी एक फुलराणी निश्चितच गवसेल असा विश्वास वाटतो.

- अमित डोंगरे
ई-मेल : amitdongre10@gmail.com

(लेखक पुण्यातील मुक्त क्रीडा पत्रकार आहेत. 'क्रीडारत्ने' सदरातील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Fot1VH या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search