Next
नागपूरच्या श्वेता उमरे राष्ट्रीय युवा संसद महोत्सवात देशात प्रथम
प्रेस रिलीज
Friday, March 01, 2019 | 02:27 PM
15 0 0
Share this article:नवी दिल्ली : राष्ट्रीय युवा संसद महोत्सवात नागपुरच्या श्वेता उमरे यांनी बाजी मारत देशात पहिला क्रमांक पटकविला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्वेता उमरे यांना ‘राष्ट्रीय युवा ससंद पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयातर्फे येथील विज्ञान भवनात २७ फेब्रुवारी २०१९ रोजी ‘राष्ट्रीय युवा संसद महोत्सव २०१९’च्या पहिल्या तीन विजेत्यांना पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री कर्नल राजवर्धनसिंह राठोड आणि मंत्रालयाच्या सचिव उपमा चौधरी या वेळी उपस्थित होत्या.

या महोत्सवात सहभागी झालेल्या देशातील ५६ युवकांमधून सर्वोत्तम तीन पुरस्कार विजेत्या मुलीच ठरल्या असून, नागपूरच्या श्वेता उमरे यांना पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. दोन लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. बेंगळूरू (कर्नाटक)ची एम.एस.अंजनाक्षी द्वितीय, तर पटना (बिहार) येथील ममता कुमार तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली.

‘केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयातर्फे आयोजित ‘राष्ट्रीय युवा संसद महोत्सवाअंतर्गत’ गेल्या दोन महिन्यांत विविध स्तरांवर यशस्वी ठरत, राष्ट्रीय स्तरावर अंतिम फेरीत प्रथम आल्याचा खूप आनंद असून, यासाठी मला उत्त्तम संस्कार व शिक्षण देणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम जनतेचे आभार मानते,’ अशा भावना श्वेता उमरे यांनी व्यक्त केल्या.

उमरे यांनी मिळविलेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर त्यांना महाराष्ट्र परिचय केंद्रात निमंत्रित करण्यात आले. या वेळी त्या बोलत होत्या. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. या वेळी झालेल्या अनौपचारीक चर्चेदरम्यान श्वेता उमरे यांनी या स्पर्धे विषयी माहिती दिली.

राष्ट्रीय युवा संसद कार्यक्रमात देशभरातील तरुण-तरुणी सहभागी झाल्या. स्पर्धेअंतर्गत शहर, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय अशा चार स्तरांवर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. नागपूर येथील मातृसेवा संघ महाविद्यालयात या वर्षी जानेवरी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शहरस्तरावरील स्पर्धा झाली. पुढे याच महाविद्यालयात ‘दहशतवादा विरुद्ध केंद्र शासनाने उचलले पाऊल’ या विषयांवर जिल्हास्तरीय स्पर्धेत श्वेता प्रथम आली. यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन केले. ‘देशातील शहरी व ग्रामीण भागाला जोडणारा दुवा म्हणून ‘डिजिटल इंडियाचे योगदान’ या विषयावरील स्पर्धेत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांतून पहिले तीन विजेते असे एकूण ११६ स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत पहिला क्रमांक मिळविणारी नागपूरची श्वेता उमरे आणि वर्धा येथील आयुषी चव्हाण यांनी दिल्ली येथे २६ व २७ फेब्रुवारी २०१९ आयोजित राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व केले.

अंतिम स्पर्धेत ‘आर्थिक-भौगोलिक आणि सांस्कृतिकदृष्टया भारत देशाचा बंध’ या विषयावर आयोजित वक्तृत्व स्पर्धेत देशभरातील २८ राज्यांतील ५६ प्रतिनिधींचा सहभाग होता. याच स्पर्धेत श्वेता देशात प्रथम ठरल्या व पंतप्रधानांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.          

नागपूर येथील नंदनवन भागात राहणाऱ्या श्वेता यांनी १०वी पासूनच वक्तृत्व स्पर्धेत भाग घेत आहेत. आतापर्यंत त्यांना जिल्हा, राज्य व राष्ट्रीयस्तरावंरील ५००हून अधिक स्पर्धांमध्ये भाग घेत २५० पुरस्कार पटकाविले आहे. सध्या नागपूर येथील शासकीय न्याय सहायक विज्ञान महाविद्यालयात (फॉरेन्सीक सायन्स) पदवीच्या अंतिम  वर्षात श्वेता शिकत आहे. वक्तृत्व स्पर्धेसाठी देश विदेशात घडणाऱ्या दररोजच्या घडामोडी, तसेच राजकीय व सामाजिक बदलांचा बारकाईने अभ्यास आणि विविध विषयांवर वाचन करीत असल्याचे श्वेता यांनी सांगितले. महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र व साहित्य आपण वाचले असून, वक्तृत्व स्पर्धेत याचा खूप फायदा झाल्याचेही त्या म्हणाल्या.

श्वेताची आई डॉ. सविता शर्मा या नागपूर स्थित केंद्रीय आयुष विभागाच्या प्रादेशिक कार्यालयात संशोधन अधिकारी आहेत, तर वडील शिरीष उमरे हे मुंबई येथे खासगी कंपनीत संचालक आहेत. श्वेता यांचा आवडीचा विषय इंग्रजी असून, चित्रपट दिग्दर्शन क्षेत्रात करिअर करण्याचे त्यांचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search