Next
पूरग्रस्त ग्रंथालये पुन्हा समृद्ध होण्यासाठी तुम्हीही देऊ शकता पुस्तके!
BOI
Saturday, August 17, 2019 | 03:36 PM
15 0 0
Share this article:

सांगलीतील दीडशे वर्षे जुन्या असलेल्या नगरवाचनालयाची पुरामुळे झालेली दुरवस्था (फोटो सौजन्य : लोकसत्ता)

पुणे :
सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुरात अनेक प्रकारची मोठी हानी झाली. त्यात या भागांतील ग्रंथालयांमध्ये असलेल्या अनमोल अक्षरठेव्याचाही समावेश आहे. या पुरामुळे अनेक ग्रंथालयांतील हजारो पुस्तकांचा लगदा झाला. या ग्रंथालयांना गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी साहित्यिक, प्रकाशक, ग्रंथविक्रेते, ग्रंथवितरक आणि साहित्यप्रेमींनी पुस्तकरूपाने मदत करण्याचे आवाहन पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेने (मसाप) केले आहे. हे ग्रंथ त्या वाचनालयापर्यंत पोचविण्यासाठी ‘मसाप’ समन्वयकाची भूमिका बजावणार आहे. तसेच ‘मसाप’कडूनही ग्रंथ दिले जाणार आहेत, अशी माहिती ‘मसाप’चे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. 

अनेक वर्षांची परंपरा असलेली आणि वाचनसंस्कृती समृद्ध करणारी ग्रंथालये सांगली, सातारा आणि कोल्हापुरातील छोट्या छोट्या गावांत आणि शहरांत आहेत. महापुरामुळे ही ग्रंथालये जलमय झाल्याने हजारो पुस्तकांचा लगदा झाला. ही हानी भरून निघावी आणि ही ग्रंथालये पुन्हा पुस्तकांनी बहरून जावीत, यासाठी ‘मसाप’ने पुढाकार घेतला आहे. 

‘मसाप’चे कार्याध्यक्ष प्रा. जोशी म्हणाले, ‘पूरग्रस्त भागातली ही ग्रंथालये पुन्हा ग्रंथांनी भरून जावीत यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे ग्रंथ दिले जाणार आहेतच. तसेच पुस्तकरूपाने मदत करण्याचे आवाहन आम्ही साहित्यिक, प्रकाशक, ग्रंथविक्रेते, ग्रंथवितरक आणि साहित्यप्रेमींना करीत आहोत. हे ग्रंथ त्या वाचनालयापर्यंत पोचविण्यासाठी ‘मसाप’ समन्वयकाची भूमिका बजावणार आहे.’ 

अशी देता येईल पुस्तकसाथ :
- साहित्यिक, साहित्यप्रेमी, प्रकाशक आणि ग्रंथविक्रेत्यांनी आपल्या इच्छेनुसार पुस्तके पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या टिळक रस्त्यावरील कार्यालयात सेवकांकडे द्यावीत. आपण देत असलेल्या पुस्तकांची यादी स्वतः तयार करून आणावी आणि साहित्य परिषदेकडून पोच घ्यावी. 

- रविवार आणि सुट्टीचा दिवस सोडून सकाळी ९.३० ते दुपारी १२ आणि सायंकाळी साडेचार ते रात्री आठ या वेळेत पुस्तके स्वीकारली जातील. 

- २१ सप्टेंबर २०१९पर्यंत ही पुस्तके स्वीकारली जाणार आहेत. त्यानंतर हे ग्रंथ संबंधित ग्रंथालयांकडे ‘मसाप’तर्फे सुपुर्द केले जातील.

- टपालाद्वारे ग्रंथ पाठविणाऱ्यांनी ‘कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रस्ता, पुणे - ४११०३०’ या पत्त्यावर पाठवावीत. पाकिटावर ‘पूरग्रस्त ग्रंथालयांसाठी’ असा उल्लेख करावा. 

- जीर्ण, खराब झालेली पुस्तके किंवा पाठ्यपुस्तके पाठवू नयेत. 

- जुनी मासिके आणि दिवाळी अंकांचा स्वीकार केला जाणार नाही. 

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Amit Salunke About 29 Days ago
Nice work for you and your team
0
0

Select Language
Share Link
 
Search