Next
सुंदर चिकमंगळूर
BOI
Wednesday, August 15, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

वीर नारायण मंदिर
‘करू या देशाटन’ या सदरात आज फेरफटका मारू या कर्नाटकमधील चिकमंगळूरमध्ये. ‘वीकेंड गेटवेज’ म्हणून या ठिकाणाला पर्यटकांच्या दुनियेत मोठे स्थान आहे. 
..........
वीर नारायण मंदिरकर्नाटकमध्ये चिकमंगळूर नावाचा जिल्हा आहे आणि त्याच नावाचे शहरही आहे. पूर्वी एका सरदाराने हे गाव आपल्या मुलीच्या लग्नात हुंडा म्हणून दिले होते. त्यावरून चिकमंगळूर हे नाव पडले असे सांगतात. कानडी भाषेत चिक्क+मागल+ऊरू याचा अर्थ छोट्या मुलीचे गाव असा होतो. चिकमंगळूरला ‘वीकेंड गेटवेज’ अर्थात सुट्टीचे द्वार म्हणून प्रवासी दुनियेत मोठे स्थान आहे. 

हळेबिडूहून चिकमंगळूरला येण्यापूर्वी वाटेत बेळवडी हे गाव लागते. स्थानिक लोकांच्या मते हे गाव म्हणजे महाभारतातील एकचक्रानगरी होते. भीमाने बकासुराचा वध येथे केला असे सांगितले जाते. अर्थात अशीच आख्यायिका उत्तर भारतात हिमाचलातही अनेक ठिकाणी सांगितली जाते. हसन व चिकमंगळूर जिल्ह्यांच्या सीमेवरच हे गाव आहे. या गावात वीर नारायण मंदिर असून, होयसळ वास्तुकलेचा हा एक ठेवा आहे. तेराव्या शतकात वीर बल्लाळ दुसरा याने हे मंदिर बांधले. येथील मंदिरांची उभारणी करताना मजबुतीसाठी वापरलेले स्थापत्य अभियांत्रिकी तंत्र त्या वेळच्या बांधकाम शैलीचा आदर्श नमुना आहे. घडीव दगडांवर दगड रचून खांब आणि आडव्या तुळया जोडताना इंटरलॉक आणि पिन व सॉकेट सिस्टीम यांचा सुरेख वापर येथे करण्यात आला आहे. शिल्प कोरलेल्या भिंती आणि छत असे बेमालूमपणे जोडण्यात आले आहे, की याचे सांधे कसे जोडले आहेत, याचा पत्ताही लागत नाही. त्यामुळे हजार वर्षे झाली, तरीही हे भक्कमपणे टिकून आहे. 

हे वैष्णव मंदिर आहे. हे देऊळ त्रिकूट मंदिर (तीन देवालये) प्रकारातील असून, धनकराय तलावाच्या काठावर ते दिमाखात उभे आहे. मुख्य जुने देवस्थान चतुर्भुज वीर नारायणाचे असून, कमळामधील आठ फूट उंचीची मूर्ती आहे. उत्तरेकडील गाभाऱ्यात सात फूट उंचीची योग नरसिंहाची शंख-चक्र घेतलेली मूर्ती असून. बाजूला दोन देवता आहेत. तसेच विष्णूचे दहा अवतार कोरलेले आहेत. 

दक्षिणेतील गाभाऱ्यात वेणुगोपाल कृष्णाची आठ फूट उंचीची प्रतिमा असून, संगीत व नृत्यमय वातावरणातील गोप-गोपिका दिसून येतात. गाय-वासरू, तसेच बाजूला रुक्मिणी आणि सत्यभामा उभ्या आहेत असे दिसते. योग नरसिंह आणि वेणुगोपाल या दोन मंदिरांमध्ये भव्य खुला मंडप आहे. एक मंदिर चौकोनी आहे, तर दुसरे ताराकृती आहे. मंदिरातील खांब अतिशय नाजूक ‘कोनिकल’ नक्षीने मढलेले आहेत. सभागृहाची बाहेरील भिंत पॅरापेटसारखी असून, खांबावर उतरते छप्पर आहे. पॅरापेटवरही शिल्पे आहेत. 

चिकमंगळूरआता चिकमंगळूरला जाऊ. चिकमंगळूर भागातच होयसळ शासकांची सुरुवात झाली. चिकमंगळूर हे कर्नाटकातील पश्चिम घाटाच्या पायथ्याशी दख्खनच्या पठारावर स्थित आहे. हे समुद्रसपाटीपासून ३५८० फूट उंचीवरील थंड हवेचे ठिकाण आहे. यागची नदीचा उगम या गावाजवळच आहे. चिकमंगळूरमध्ये सामान्यतः थंड वातावरणात असते. हिवाळ्यात शहराचे तापमान ११ ते २० अंश सेल्सिअसदरम्यान, तर उन्हाळ्यात ते २५-३२ अंश सेल्सिअसदरम्यान असते. कॉफीच्या मळ्यातील निवासी घरकुल योजना पर्यटकांना आकर्षित करते. आसपास बाबा बुदान गिरी, कुद्रेमुख, मुलानगिरी, कालसा, शृंगेरी (शंकराचार्य मठ), जयपुरा आणि मुदीगेरे यांसारखी गिरिस्थाने व धार्मिक ठिकाणे आहेत. जवळपास अनेक धबधबे आहेत. 

शृंगेरी : शंकराचार्यांचा भारतातील पहिला मठ शृंगेरीस असून, हा इ. स. ८००मध्ये स्थापन करण्यात आला. जवळ असलेल्या शृंगगिरी पर्वतावरूनच शृंगेरी हे नाव रूढ झाले . शृंगेरी पहाडावर शृंगी ऋषींचे वडील विभांडक यांचा आश्रम होता. हे शृंग ऋषींचे जन्मस्थान मानले जाते. आद्य शंकराचार्यांनी भारतामध्ये चार मुख्य मठांची स्थापना केली - दक्षिणेस शृंगेरी येथे शारदापीठम् हा मठ पहिल्यांदा स्थापन केला. उत्तरेस जोशीमठ, पूर्वेस जगन्नाथपुरी येथे गोवर्धनपीठम्, पश्चिमेकडे द्वारका येथे शारदापीठम्. अद्वैत वेदान्ताचे दर्शन घडवण्यासाठी आणि सनातन धर्माच्या संकल्पनेचा प्रसार करणे आणि अशा प्रकारे लोकांच्या जीवनाचा मार्ग म्हणून धर्म किंवा धार्मिकता स्थापित करणे हा त्यामागचा उद्देश होता. त्यांचे प्राथमिक चार शिष्य प्रत्येक भागाचे प्रभारी होते आणि अशा प्रकारे प्रत्येक भागात एका मजबूत गुरू-शिष्य परंपरेची स्थापना करण्यात आली. ती आजपर्यंत लोकांना मार्गदर्शन करत आहे. पहिले जगद्गुरू शंकराचार्य यांचा जन्म केरळमधील कालाडी येथील असून, त्यांनी हिमाचलमध्ये केदारमठ येथे समाधी घेतली. 

शारदा मंदिरशारदा मंदिर हे शृंगेरीचे मुख्य आकर्षण. हे मंदिर शरदाम्बा मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. तत्कालीन पीठासीन शंकराचार्य श्री शंकर भागवत्पदा यांनी हे मंदिर बांधले. येथे चंदनाची सोन्याने मढविलेली मूर्ती होती असे म्हणतात. हे मंदिर आगीत भस्मसात झाले होते. त्यानंतर दक्षिण भारतीय पद्धतीने याचे बांधकाम झाले. श्री विद्याशंकर मंदिर आचार्य यांनी तपश्चर्या करण्यासाठी गुहेत प्रवेश केला व शिष्यांनी गुहेचे दार बंद करण्याची आणि ते न उघडण्याची आज्ञा दिली. १२ वर्षांचा कालावधी लोटल्यावर जिज्ञासेपोटी शिष्यांनी दार उघडले, तर तेथे शिवलिंग सापडले. याच शिवलिंगावर हे मंदिर उभे आहे, अशी लोकांची श्रद्धा आहे. विशेष म्हणजे टिपू सुलतानाने या मंदिराला संरक्षण दिले होते, असे म्हणतात. 

हेब्बे फॉल्सहेब्बे फॉल्स : चिकमंगळूर जिल्ह्यातील सर्वांत नयनरम्य पर्यटनस्थळांपैकी हे एक ठिकाण आहे. हेब्बे फॉल्स हे केमानगुडी या हिलस्टेशनपासून आठ किलोमीटर अंतरावर आहेत. ५५० फूट उंचीवरून कोसळणारा हा धबधबा दाट जंगल, तसेच कॉफीचे मळे यांनी वेढलेला आहे. 


बाबा बुदान गिरी
बाबा बुदान गिरी : इ. स. १६७०मध्ये भारतातील पहिली कॉफी लागवड बाबा बुदान गिरी पर्वतावर झाली, असे कॉफीवरील नोंदीनुसार सांगता येते. कॉफी पिण्याच्या किंवा कॉफीच्या झाडाच्या ज्ञानाचे सर्वांत जुने पुरावे १५व्या शतकात येमेनमधील अहमद अल-गेफर यांच्या लेखात दिसतात. सूफी मंडळाकडून त्यांच्या धार्मिक कार्यात जागृत राहण्यासाठी कॉफीचा वापर करण्यात येत असे. प्रथम या बिया मुहम्मद इब्न याने आफ्रिकेतून एडन येथे आणल्या. सूफी संत बाबा बुदान यांनी अरब प्रदेशातील येमेनमधून कॉफी भारतात आणली. त्यांनी गुपचूप पोटावर गुंडाळून कॉफीच्या सात बिया आणल्या. त्यांच्यापासूनच बाबा बुदान गिरीच्या पर्वतरांगेत कॉफीचे पीक पहिल्यांदा घेतले गेले. 

अमृतपुराअमृतपुरा : हे ठिकाण प्रसिद्ध अमृतेश्वर मंदिरामुळे लोकप्रिय आहे, अमृतपुरा हे तारिकेरेचे मुख्य आकर्षण आहे आणि तारिकेरेपासून १० किलोमीटरवर आहे. होयसळ राजा वीरा बल्लाळ दुसरा याचा सेनापती अमृतशेश्वर दंडनायक यांनी ते बांधले होते. अमृतेश्वर मंदिर हे होयसळ वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे.
भद्रा वन्यजीव अभयारण्यभद्रा वन्यजीव अभयारण्य : हे व्याघ्र प्रकल्पाचे संरक्षित क्षेत्र असून, ते चिकमंगळूर शहरापासून ३८ किलोमीटरवर आहे. भद्रा अभयारण्यामध्ये अनेक वनस्पती आणि अनेक प्रकारचे वन्यजीव आहेत. ६१५२ फूट उंचीचे हेब्बे शिखरही याच भागात आहे. 

कुद्रेमुख अभयारण्य : या अभयारण्याचे क्षेत्रफळ ६०० चौरस किलोमीटर असून, अनेक प्रकारचे वन्यजीव येथे बघण्यास मिळतात. 

कोपाकोपा : येथील हवामानामुळे कोपाला ‘कर्नाटकचे काश्मीर’ म्हणून ओळखले जाते. कोपा ट्रेकिंगसाठीही प्रसिद्ध आहे. येथे उन्हाळ्यातदेखील तापमान खूप कमी असते. त्यामुळे कॉफी, चहा, भात, इत्यादी पिके वाढण्यास अनुकूल वातावरण निर्माण होते. कोप्यात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. येथे श्री वीरभद्र स्वामी आणि चितितक्ष्की मल्लिकार्जुन स्वामी मंदिर यांच्यासह अनेक नैसर्गिक आकर्षणे आहेत. कोपा शैक्षणिक संस्थांसाठीही प्रसिद्ध आहे. अॅलन आयुर्वेदिक महाविद्यालय, तसेच अन्य महाविद्यालये आणि शाळाही येथे आहेत. येथे वीस हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

केम्मनगुंडीकेम्मनगुंडी : हे चिकमंगळूर जिल्ह्याच्या तारिकेरे तालुक्यातील थंड हवेचे एक ठिकाण आहे. ते समुद्रसपाटीपासून १४३४ मीटर (४७०० फूट) उंचीवर आहे. कृष्णराजा वाडियार चतुर्थ यांचे हे उन्हाळ्यातील वस्तीचे ठिकाण होते. राजाच्या सन्मानार्थ हे श्री कृष्णराजेंद्र हिल स्टेशन म्हणून ओळखले जाते. हे ठिकाण बाबा बुदान गिरी पर्वतरांगांत आहे. केम्मनगुंडी येथे झी पॉइंटसारखे निसर्गरम्य पॉइंट्स आहेत. येथे कर्नाटक सरकारच्या फलोत्पादन विभागामार्फत रोझ गार्डन आणि रॉक गार्डन विकसित करण्यात आले आहे. 

कसे जायचे?
जवळचे रेल्वे स्टेशन कडूर. चिकमंगळूर ते कडूर रेल्वे स्टेशन हे अंतर ४० किलोमीटर. जवळचा विमानतळ मंगळूर. अंतर १५२ किलोमीटर. प्रवासासाठी उत्तम कालावधी - नोव्हेंबर ते मे. राहण्याची सोय चिकमंगळूर, कोपा, शृंगेरी येथे होऊ शकते. रस्तामार्गे जायचे असल्यास हुबळी शिमोगा मार्गावरून आणि म्हैसूर-हळेबिडू मार्गावरूनही जाता येते. आसपास शिमोगा जिल्ह्यात भद्र, गिरसप्पा (जोग फॉल) ही ठिकाणेही पाहण्यासारखी आहेत. 

- माधव विद्वांस
ई-मेल : vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)

अमृतपुरा
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Milind Lad About
nice information with details.
0
0
Vidyadhar pokharkar About
खूप छान माहिती! आमचे बसल्या जागी देशाटन...😊
0
0
Ramesh Atre About
सुंदर वर्णन, उत्तम उद्बोधक छायाचित्रे!
0
0
Vinay Kulkarni About
करूया देशातन हा एक सुंदर उपक्रम आहे.प्रवासाची आवड असणाऱ्या आमच्यासारख्या लोकांना उपयुक्त माहिती मिळते धन्यवाद
1
0

Select Language
Share Link
 
Search