Next
व्हेअर ईगल्स डेअर
प्रसन्न पेठे (Prasanna.pethe@myvishwa.com)
Tuesday, September 05, 2017 | 12:45 PM
15 1 0
Share this story

‘व्हेअर ईगल्स डेअर’ ही वरकरणी वॉरफिल्म म्हटली, तरी प्रत्यक्षात युद्धकाळातल्या दोन राष्ट्रांच्या ‘डबल एजंट्स’ची (शत्रूचे गुप्तहेर) कथा मांडणारी फिल्म! फिल्मची मांडणी युद्धकाळातल्या अत्यंत साहसी सुटकेच्या थरारक मोहिमेसारखी! आजच्या ‘सिनेसफर’मध्ये त्या फिल्मबद्दल...
.....................
हॉलीवूडमध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर जे सिनेमे बनले त्यातल्या बहुतांशी सिनेमांत थेट युद्ध तरी असायचं किंवा मग नाझी फौजांच्या एखाद्या कडेकोट बंदोबस्तातल्या तळावर घुसून मित्र राष्ट्रांच्या शूर अधिकाऱ्यांनी फत्ते केलेली एखादी रोमहर्षक कामगिरी तरी! ‘व्हेअर ईगल्स डेअर’ हा त्या दुसऱ्या प्रकारातला आपल्याला खिळवून ठेवणारा सिनेमा होता!! ‘बेकेट’ आणि ‘हॅम्लेट’सारख्या भूमिका करून शेक्सपीरियन अॅक्टर म्हणून नावारूपाला आलेला देखणा ब्रिटिश अभिनेता रिचर्ड बर्टन आणि ‘फिस्टफुल ऑफ डॉलर्स’, ‘फॉर ए फ्यू डॉलर्स मोअर’ आणि ‘दी गुड, दी बॅड, दी अग्ली’सारख्या काउबॉय वेस्टर्न सिनेमांतून आपली जबरदस्त छाप पाडून गेलेला अमेरिकन अभिनेता क्लिंट ईस्टवूड हे या निमित्ताने प्रथमच एकत्र आले. या वेगवान सिनेमामध्ये आल्प्स पर्वतराजीतल्या एका उंच कड्यावरच्या अत्यंत दुर्गम गढीमध्ये, जर्मनांच्या कडेकोट बंदोबस्तात ठेवलेल्या, मित्र राष्ट्रांच्या अधिकाऱ्याच्या सुटकेची थरारक कथा पेश केली गेली आहे.

महायुद्ध ऐन भरात असण्याचा तो काळ. सर्वच देशांना हेरगिरीची लागण झालेली. काही जण आपल्या देशासाठी शत्रूच्या सैन्यात जाऊन हेरगिरी करणारे गुप्तहेर (एजंट्स), तर काही जण त्याहीपलीकडे जाऊन, एका देशातर्फे शत्रूच्या सैन्यात हेरगिरी करत असल्याचं भासवून प्रत्यक्षात ते त्या शत्रूनेच या देशात धाडलेले त्यांचे गुप्तहेर असणारी मंडळी (डबल एजंट्स). ‘व्हेअर ईगल्स डेअर’ हा वरकरणी युद्धपट म्हटला, तरी प्रत्यक्षात युद्धकाळातल्या दोन राष्ट्रांच्या ‘डबल एजंट्स’ची कथा मांडणारा सिनेमा आहे! त्याची मांडणी युद्धकाळातल्या अत्यंत साहसी सुटकेच्या थरारक मोहिमेसारखी!
 
खास रिचर्ड बर्टनच्या (खरं तर त्याच्या मुलाच्या) आग्रहावरून काढलेल्या या सिनेमाची कथा अनेक युद्धपट लिहिणाऱ्या अॅलिस्टर मॅक्लीनची! या सिनेमाचं त्याच्या डोक्यातलं नाव होतं ‘कासल ऑफ ईगल्स’; पण निर्माता कास्नरला ते पसंत पडलं नाही आणि त्यानं शेक्सपियरच्या ‘रिचर्ड-३’ नाटकातल्या एका वाक्यावरून या सिनेमाचं नाव बदललं आणि ठेवलं –‘व्हेअर ईगल्स डेअर!’ ते मूळ वाक्य होतं ‘The world is grown so bad, that wrens make prey where eagles dare not perch’ - या वाक्यातले तीन शब्द कास्नरनं उचलले आणि एका वेगळ्या अर्थानं ते या सिनेमाला फिट्ट बसले! कारण जिथे तो लष्करी अधिकारी कैदेत असतो ते जर्मन प्रदेशातलं ठिकाण एका उत्तुंग डोंगरकड्यावर असतं- जे जर्मन भाषेत ‘श्लॉस्स अॅडलर (कासल ऑफ ईगल्स)’ याच नावानं प्रसिद्ध असतं. तिथे जाण्यासाठी हेलिकॉप्टर किंवा केबल-कार (रोप-वे) अशी वाहतुकीची केवळ दोनच साधनं असतात.

आपल्या पकडल्या गेलेल्या ब्रिगेडिअरची सुटका करण्यासाठी मित्र राष्ट्रांच्या सात कमांडोजकडे केवळ एक दिवस असतो. अंगावर नाझी अधिकाऱ्यांचे गणवेष घालून ते सात जण विमानातून पॅराशूट्सच्या साह्याने अंधारात त्या बर्फाळ डोंगरात उतरतात. त्यांच्या पाठोपाठ आणखी एक जण! एक स्त्री!!...(हा प्रेक्षकांसाठी एक धक्का आणि गुंता!).....जमिनीवर उतरल्यावर त्यांच्या लक्षात येतं, की त्यांच्यातल्या एकाला ठार मारण्यात आलंय आणि मग आपल्यातच कोणीतरी फितुर आहे याची जाणीव मोहिमेचा प्रमुख मेजर स्मिथला होते. ते सात जण आपल्या सामानासह एका शेतावरच्या कोठारामध्ये मुक्काम करतात. (इथे मोहिमेचा सूत्रधार मेजर स्मिथ त्या विमानातल्या स्त्रीला – मेरी एलिसनला- भेटून येतो).

पुढच्या त्या एका दिवसात अत्यंत वेगवान घटना घडतात. ती मोहीम फत्ते करण्यासाठी त्यांना आणखी दोन एजंट्सची मदत होते. मेरी एलिसन ही ‘MI6’ची एजंट असते. तिला या संपूर्ण मोहिमेची कल्पना असते. मुळात तो अमेरिकन ब्रिगेडियर कोण, त्याचं विमान कसं पडलं आणि तो कसा पकडला गेला हेसुद्धा तिला ठाऊक असतं. (आणि तो प्रेक्षकांसाठी पुन्हा एक गुंताच!) दुसरी स्त्री हायडी ही त्याच गावात अनेक वर्षांपासून राहणारी ब्रिटिश एजंट असते आणि ती एका बारमध्ये काम करत असते. त्या दोघी गढीत प्रवेश मिळवतात. हायडी ही मेरीची ओळख तिथं आलेल्या नाझी अधिकाऱ्याला आपली चुलत बहीण म्हणून करून देते. इकडे त्यांच्या तुकडीतला आणखी एक जण मारला जातो. त्याला कोणी मारलं असेल? (पुन्हा एक गुंता.)

सर्वांना कामगिरी फत्ते करून परतीची वेळ सांभाळणं गरजेचं असतं. पुढच्या प्रसंगात सर्व जण जर्मन सैनिकांच्या हातात सापडतात; पण मेजर स्मिथ आणि लेफ्टनंट मॉरीस सुटका करून घेऊन उंचावरच्या गढीत शिरण्याच्या एकमेव मार्गाकडे ‘केबल-कार’कडे जातात. केबल-कार गावाकडच्या बाजूनं डोंगराच्या दिशेनं निघताना दोघं गुपचूप केबल-कारच्या पेंटाग्राफवर चढतात. केबल-कार गढीमधल्या केबिनमध्ये पोचताना जवळच्या आईसअॅक्स वापरून त्यांचं तटबंदीपर्यंत जाण्याची दृश्यं फारच उत्कंठावर्धक घेतली आहेत.

तिकडे वर गढीमध्ये नाझी अधिकारी, अटकेत असणाऱ्या अमेरिकन लष्करी अधिकाऱ्याची उलटतपासणी सुरू करतात. आधी पकडले गेलेले दोस्तांचे तीन कमांडोही तिथेच असतात. ते तिघं आपण डबल एजंट्स असल्याचं सांगतात. (हा आणखी एक गुंता!) ....नाझी अधिकाऱ्यांच्या गणवेशातले मेजर स्मिथ आणि लेफ्टनंट मॉरिस तिथं पोहोचतात. मेजर स्मिथ सर्व सूत्रं आपल्या हातात घेतो. आपण स्वतः नाझींच्या स्पेशल सिक्युरिटी सर्व्हिसचे अधिकारी असल्याची बतावणी करून, तो पकडले गेलेले तीनही कमांडोज ब्रिटिश एजंट्स असल्याचं सांगून तिघांना इंग्लंडमधल्या सहकाऱ्यांच्या नावांची लिस्ट द्यायला सांगतो. (हा वेगळाच गुंता.)..ते डबल एजंट्स असल्याने तिथल्या डबल एजंट्सची, पर्यायानं जर्मन गुप्तहेरांची नावं मेजर स्मिथकडे उघड करतात. आता कुठल्याही क्षणी सर्व जण अटकेतल्या अमेरिकन अधिकाऱ्यासह सुखरूप बाहेर सटकणार, इतक्यात तिथे मुख्य नाझी अधिकारी येतो. प्रसंगातला तणाव पुन्हा वाढतो. आता त्या नाझी अधिकाऱ्याला मेजर स्मिथ काय सांगतो? पुढे काय घडतं? गढीतून निसटण्याच्या प्रयत्नात केबल-कारमध्ये काय घडतं? सर्व जण सुखरूप निसटू शकतात का? त्यांच्यामध्ये नक्की तोतये डबल एजंट्स कोण असतात? त्यांचं पुढे काय होतं, हे सगळं प्रत्यक्ष पाहण्यातच मजा.
 
१९६८ सालचा हा सिनेमा. म्हणजे सुमारे ४८ वर्षांपूर्वीची टेक्नॉलॉजी; पण काय बनवलाय पाहा! त्यातली धुमश्चक्रीची सर्वच दृश्यं... पाठलाग... गोळीबार... बॉम्बस्फोट... आणि सर्वांत थरारक आणि रोमांचकारी असे ते ‘केबलकार’वरचे मारामारीचे स्टंट्स!.....रिचर्ड बर्टनच्या दमदार आवाजातले डायलॉग्ज... क्लिंट ईस्टवूड नावाचं अत्यंत थंड आणि निर्विकार मुद्रेचं किलिंग मशीन... रॉन गुडविनचं युद्धपटाला आवश्यक असं रोमांच उभं करणारं पार्श्वसंगीत... आर्थर इबेट्सनची कॅमेऱ्याची कमाल... बव्हेरिया आणि ऑस्ट्रियातला सुंदर निसर्ग!... सार्वकालिक लाडक्या वॉरफिल्म्समधला जरा वेगळा, पण अत्यंत उत्कंठावर्धक आणि रंजक असाच हा सिनेमा! जरूर बघावा.

जाता जाता : या फिल्ममध्ये इतके जीवघेणे स्टंट्स होते, की ते करण्यासाठी रिचर्ड बर्टन आणि क्लिंट ईस्टवूडच्या ‘डबल्स’ना ते सारे स्टंट्स करण्यासाठी वारंवार शॉट्स द्यावे लागत. शेवटी क्लिंट ईस्टवूडनं गमतीत या सिनेमाचं नाव ‘व्हेअर डबल्स डेअर्ड’ असंच ठेवलं होतं!

ई-मेल : Prasanna.Pethe@myvishwa.com

(‘सिनेसफर’ हे सदर दर मंगळवारी प्रसिद्ध होते.)
 
15 1 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Bhushan Bhansali About
इतकं भारी भारी भारी लिहिलंय कि तोड नाही.. पण थोडा इमोशनल टच्च दिला असता तर लईच भारी झालं असतं.. पण तरीपण 100 पैकी 100 मार्क.. प्रसन्ना पुस्तक काढायला पाहीजे राव.. ते पण हार्डबाऊंड कलर फोटोंसह.. टायटल दे.. " मराठीतुन इंग्लिश सिनेमे "... हाहाहा..
0
0
राजीव About
दुष्ट माणूस (कोण बरं?) विमानातून उडी घेतो तेव्हा रिचर्ड बर्टनची नजर बघा ...
1
0

Select Language
Share Link