Next
फिनिक्स भरारीसाठी हवीय साथ...
BOI
Saturday, January 13 | 02:27 PM
15 0 0
Share this story


कोरेगाव भीमा इथं एक जानेवारीला झालेल्या हिंसाचारात राष्ट्रपती पारितोषिक विजेते शिल्पकार एल्डिन फर्नांडिस यांचा स्टुडिओ बेचिराख झाला. त्यांच्या कलाकृतींचं झालेलं नुकसान भरून येणं शक्यच नाही; पण या राखेतून फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेऊन पुन्हा उभं राहण्याची जिद्द त्यांनी व्यक्त करून दाखवली आहे. भूषण वैद्य या मुंबईतल्या शिल्पकारानं त्यांच्यासाठी निधी जमविण्याकरिता ऑनलाइन मोहीम सुरू केली आहे. त्याद्वारे तुमच्या-आमच्यासारखं कोणीही फर्नांडिस यांना मदत करू शकतं. त्याबद्दल...
......
दंगल आणि हिंसाचार यांना कुठलाही धर्म, कुठलीही जात नसते. असते ती फक्त जमावाची बेमुर्वतखोरी. मग त्यात कुणाचं काय नुकसान होतंय याची त्या जमावाला जाणीवच नसते. सरकारलाही फक्त सामान्यांसाठी नुकसानभरपाईची घोषणा केली, की आपण संवेदनशील आहोत असं सांगता येतं; पण अशा दंगलीत एखाद्या कलाकाराच्या कलाकृती उद्ध्वस्त झाल्या असतील, तर त्याची भरपाई कशी करणार? 

एक जानेवारीला कोरेगाव भीमा इथं झालेल्या हिंसाचारात एल्डिन फर्नांडिस या राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या शिल्पकाराच्या कलाकृती आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. फर्नांडिस त्यांनी स्वतःच्या हाताने घडवलेली सगळ्याच महापुरुषांची शिल्पं जळून खाक झाली. त्यामुळे नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच त्यांच्या स्वप्नांची अक्षरशः राखरांगोळी झाली. 

एल्डिन फर्नांडिस हे ख्यातनाम शिल्पकार व चित्रकार. ते मुंबईतील सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे विद्यार्थी. १९९७मध्ये त्यांना शिल्पकलेसाठी राष्ट्रपतिपदक मिळालं आहे. ललित कला अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कारदेखील त्यांना मिळाला आहे. चार वर्षांपूर्वी त्यांनी कोरेगाव भीमा गावात शिल्पकला व चित्रकलेचा स्टुडिओ उभा केला होता. एक जानेवारीला कोरेगाव भीमामध्ये झालेल्या दंगलीत अनाम, अनावर जमावानं त्यांच्या स्टुडिओतील शिल्पं, चित्रं, साचे, मशिनरी, साहित्य, असं सगळंच नष्ट केलं. या सगळ्या नुकसानाचा हिशेब मांडायचा झाल्यास तो आकडा सुमारे ७० लाख रुपये एवढा येतो; पण अमूल्य अशा कलाकृतींच्या नुकसानाची मोजदाद कशी करणार? ते भरून येणं शक्यच नाही.

असं असलं तरीही, आपण पुन्हा उभं राहणार असल्याचा दुर्दम्य आशावाद एल्डिन फर्नांडिस यांनी व्यक्त केला आहे. फिनिक्स पक्ष्याप्रमाणे अक्षरशः राखेतून भरारी घेण्याच्या त्यांच्या या उमेदीला समाजाचंही पाठबळ मिळावं, यासाठी भूषण वैद्य नावाचा कलाकार पुढे आला आहे. स्वतः शिल्पकार व चित्रकार असलेल्या भूषण यांनी केवळ हळहळ व्यक्त करत न बसता ‘केट्टो’ या फंडरेझर वेबसाइटवर एल्डिन यांच्यासाठी निधी गोळा करण्याची मोहीम सुरू केली आहे. सुमारे दोन महिन्यांत २५ लाख रुपयांचा निधी गोळा करण्याचे उद्दिष्ट त्यांनी ठेवलं असून, आतापर्यंत ३१ हजार ५०० रुपये जमा झाले आहेत. त्या वेबसाइटवर गेल्यास एल्डिन यांच्याबद्दलची संपूर्ण माहिती, तसेच उद्ध्वस्त झालेल्या त्यांच्या स्टुडिओचे मन विदीर्ण करणारे फोटोही दिले आहेत. तुमच्या-आमच्यासारख्या प्रत्येकाने या मोहिमेला फूल ना फुलाची पाकळी देऊन हातभार लावला, तर हा कलाकार पुन्हा उभा राहू शकेल. एका उमद्या, गुणी कलाकाराच्या राखेतून भरारी घेण्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तीला बळ देण्यासाठी दुसऱ्या एका संवेदनशील कलाकारानं सुरू केलेल्या या प्रयत्नांना नुसती दाद देणं पुरेसं नाही, तर त्याला समाजाची साथ मिळणं गरजेचं आहे. सरकारी मदत मिळेल की नाही, मिळाली तर ती केव्हा मिळेल, याबद्दल काही ठोस सांगणं अवघडच; पण समाजातल्याच काही घटकांमुळे उद्ध्वस्त झालेल्याला पुन्हा उभं करणं ही समाजाचीच नैतिक जबाबदारी आहे.
 
फर्नांडिस यांना मदत करण्यासाठी लिंक : https://goo.gl/n1oPss

एक जानेवारीला उद्ध्वस्त झालेला फर्नांडिस यांचा स्टुडिओ

(फोटो एल्डिन फर्नांडिस यांच्या ‘फेसबुक वॉल’वरून साभार)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Tashi Wangdi About 336 Days ago
it's really sad to know about loss of Mr.Fernandez, it will be good if you publish his address, so people who wish to send small help,could send it by, cash order. We pray Lord Buddha,that may he support to regain his glory, and wish him the best for his flight like PHOENIX
0
0

Select Language
Share Link