Next
डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार पंजाबमधील तर्कशील सोसायटीला जाहीर
BOI
Monday, January 14, 2019 | 03:08 PM
15 0 0
Share this article:

तर्कशील सोसायटीचे  अध्यक्ष राजिंदर भदौठपुणे : अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार’ यंदा पंजाबमधील तर्कशील सोसायटीला जाहीर झाला आहे. गेल्या ३५ वर्षांपासून तर्कशील सोसायटी पंजाबमध्ये कार्यरत असून, अंधश्रद्धा निर्मूलन, कालसुसंगत धर्मचिकित्सा व वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार हे कार्य या सोसायटीमार्फत केले जाते.

‘तर्कशील सोसायटीचे अध्यक्ष राजिंदर भदौठ आणि त्यांचे दोन सहकारी रामस्वर्ण सिंग व भुरा सिंग हे पुरस्कार स्विकारण्यासाठी येणार आहेत. एक लाख रुपये व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. २७ जानेवारीला बालगंधर्व रंगमंदिरात महाराष्ट्र फाउंडेशनचे साहित्य व समाजकार्य पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत, त्याच कार्यक्रमात डॉ. दाभोलकर स्मृती पुरस्कारही दिला जाणार आहे. चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या हस्ते हे पुरस्कार दिले जाणार आहेत. या वेळी फाउंडेशनचे अध्यक्ष अंकुश कर्णिक व या पुरस्कारांचे प्रवर्तक सुनील देशमुख यांची प्रमुख उपस्थिती असेल,’ अशी माहिती  महाराष्ट्र फाउंडेशनचे समन्वयक विनोद शिरसाठ यांनी दिली. 

‘पंजाबमधील बर्नाला या जिल्ह्याच्या ठिकाणी तर्कशील सोसायटीचे मुख्यालय आहे. पंजाबमधील सर्व २२ जिल्ह्यात मिळून तर्कशीलच्या ८० शाखा असून, दोन हजाराहून अधिक कार्यकर्ते त्यांच्याशी जोडलेले आहेत. विवेकी समाजाच्या निर्मितीसाठी शिक्षण व धर्म यांना अलग ठेवले पाहिजे,’ अशी भूमिका तर्कशीलने सुरुवातीपासून घेतली आहे. हरियाणा, हिमाचल प्रदेश, राजस्थान व दिल्ली या राज्यांमध्येही तर्कशीलच्या काही शाखा कार्यरत आहेत. या सोसायटीच्या वतीने ‘तर्कशील’ हे नियतकालिक पंजाबी भाषेतून प्रकाशित होते, तर ‘तर्कशील पथ’ हे नियतकालिक हिंदी भाषेतून प्रकाशित होते. पन्नासहून अधिक पुस्तके प्रकाशित केली आहेत. लेख, मुलाखती, व्याख्याने , चर्चासत्रे, परिषदा, नाटक, जादूचे प्रयोग इत्यादी माध्यमातून विवेकी जीवनशैलीचा प्रचार-प्रसार करीत असतानाच ज्योतिषी व भोंदू बुवांचे ढोंग उघडे पाडण्याचे कामही तर्कशील सोसायटी करीत आली आहे. भानामतीचा शोध आणि मानसिक आरोग्य केंद्र चालवण्याचे कामही केले जाते,’ असेही त्यांनी सांगितले.

‘डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर महाराष्ट्र फाउंडेशनने डॉ. दाभोलकर स्मृती पुरस्कार देण्यास सुरुवात केली. भारतीय संविधानाशी सुसंगत भूमिका घेऊन वैज्ञानिक दृष्टिकोन, धर्मनिरपेक्षता, विवेकवाद यांची रुजवणूक आणि परिवर्तनाच्या चळवळीला साह्यभूत ठरलेल्या व्यक्ती वा संस्थांना हे पुरस्कार देण्याचा निर्णय फाउंडेशनने घेतला. मागील पाच वर्षात विवेक सावंत, निखिल वागळे, उत्तम कांबळे, अतुल पेठे आणि अरविंद गुप्ता या पाच मान्यवरांना त्यांनी आपापल्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय व अनुकरणीय योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. डॉ. दाभोलकर यांना अभिप्रेत असलेले विचार व कार्य पुढे घेऊन जाणाऱ्या अन्य राज्यांतील व्यक्ती व संस्थांना पुरस्कार देण्याबाबतच्या सूचना महाराष्ट्र फाउंडेशनकडे आल्या होत्या. त्यांचा विचार करून या वर्षीच्या पुरस्कारासाठी पंजाबमधील तर्कशील सोसायटीची निवड केली आहे,’ असे या पुरस्कारांचे प्रवर्तक सुनील देशमुख यांनी सांगितले. 

‘कर्नाटक, केरळ व तामिळनाडू या राज्यांतही अशा प्रकारचे काम करणाऱ्या व्यक्ती व संस्था आहेत. त्यांचा विचार पुढील वर्षीच्या पुरस्कारांसाठी केला जाईल. केशव गोरे स्मारक ट्रस्ट व साधना ट्रस्ट यांच्या वतीने या पुरस्कारांचे संयोजन केले जाते. महाराष्ट्र फाउंडेशनच्या साहित्य व समाजकार्य पुरस्कारांचे हे २५ वे वर्ष आहे,’ असेही देशमुख यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search