Next
घरातील गटबाजी नक्कीच टाळता येऊ शकते
BOI
Saturday, September 08, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:


मुलांना वाढवताना कुटुंबातील सदस्यांमध्ये दोन गट पडणार नाहीत, याची काळजी घेणं खूप आवश्यक आहे. असं झाल्यास मुलांचा कोणा एकावरचा विश्वास कमी होऊ शकतो, पर्यायाने त्याच्यावरील प्रेमही कमी होऊ शकतं.... ‘मनी मानसी’ सदरात या वेळी पाहू या पालक-मुलांच्या नात्यातील आवश्यक असणाऱ्या एकवाक्यतेबद्दल...
........................................
३५ वर्षांची रागिणी स्वतःहून भेटायला आली. आल्यावर तिनं स्वतःची जुजबी ओळख करून दिली. सात-आठ वर्षांपूर्वी रागिणीचं लग्न झालं. बऱ्याच प्रयत्नानंतर तीन एक वर्षांनी तिला मुलगी झाली. सुरुवातीला मुलीला पाळणाघरात ठेवून रागिणीनं आपली नोकरी सुरूच ठेवली होती. परंतु गेल्या दोन-तीन वर्षांपासून तिच्या सासूबाई खूपच आजारी होत्या. आजारपणामुळे त्या अगदी अंथरुणालाच खिळल्या. शिवाय घरात त्यांच्याकडे लक्ष देणारं इतर कोणीच नसल्यामुळे सासरे आणि नवरा यांच्या सांगण्यावरून रागिणीनं नोकरी सोडली. आता ती पूर्ण वेळ सासूबाईंची काळजी घेते आणि मुलीला सांभाळते. हे सगळं करताना दिवस कसा जातो, तिला कळतच नाही.  

रागिणीचं हे सगळं मला सांगून झाल्यावर तिला भेटायला येण्यामागील कारण विचारलं. हा विषय निघताच तिला रडू आलं. तिने थोडा वेळ मागितला आणि शांत झाल्यावर तिची समस्या सांगितली. गेल्या पाच-सहा महिन्यांपासून तिची सहा वर्षांची मुलगी आयेशा तिच्याशी नीट बोलत नाही. ती सारखी आईचा राग-राग करते, जवळ गेलं, की ‘तू आवडत नाहीस मला’, असं म्हणून आजी-आजोबांकडे निघून जाते. संध्याकाळी बाबा कामावरून आले, की त्यांच्याकडे, ‘आई मला मारते, शिक्षा करते’, अशा तक्रारी करते आणि बाबांना आईला रागवायला सांगते. इथपर्यंत ठीक आहे, पण महिन्याभरापूर्वीची एक गोष्ट, तिने अभ्यास केला नाही म्हणून रागिणी तिला रागावली, तर आयेशा रागाने म्हणाली, ‘जा मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही. तू वेडी आहेस. मला फक्त बाबा, आजी  आणि आजोबाच आवडतात. ते मला कधीच रागवत नाहीत. तूच मला सारखी मारतेस आणि रागावतेसही. मला नाही बोलायचं तुझ्याशी. तू माझा अभ्यास पण नको घेऊस. माझ्याशी खेळू पण नकोस आणि माझ्या शेजारी झोपू पण नकोस. मी फक्त बाबांजवळच झोपणार.’ सुरुवातीला असं वाटलं, की ती चिडली म्हणून असं बोलली असेल, नंतर होईल शांत. पण आयेशा खरंच आईशी बोलेनाशी झाली. हळू हळू ती आईशेजारी झोपेनाशी झाली. आई जवळ आली, की ती आजी आजोबांच्या खोलीत निघून जायची. हे सारं रागिणीच्या मनाला खूप लागत होतं.

आपण कुठं चुकतोय? कुठं कमी पडतोय? मुलांना रागवायचंच नाही का? आयेशाला खरंच माझी किंमत राहिली नाही का? , तिच्या एवढ्या लहान वयातच आमचं नातं असं दुराव्याचं होणार का? असे एक ना अनेक प्रश्न रागिणीला पडले होते. तिचं कशातच लक्ष लागत नव्हतं. आपण आयेशाला वाढवण्यात कमी पडलो हा अपराधभाव तिला स्वस्थ बसू देत नव्हता. पण विचार केला, तर या साऱ्या माहितीतून एक वेगळीच समस्या लक्षात आली आणि त्यासाठी रागिणीबरोबरच इतर कुटुंबियांनीही प्रयत्न करणं आवश्यक होतं. ती समस्या अशी, की आयेशाला वाढवणारे घरातल्या घरातच दोन गट तयार झाले होते एक गट बाबा, आजी, आजोबा यांचा आणि दुसरा एकट्या आईचा. 

एका गटात तिच्या म्हणण्याचा मान राखला जायचा, तिचं फक्त कौतुक केलं जायचं आणि आई रागावली की नको इतकी माया, प्रेम, सहानुभूती मिळायची. दुसऱ्या गटात चूक झाल्यावर बोलणी, एखादा धपाटा, शिक्षा, कधीतरी शाबासकी. पण आयेशाच्या वयाचा विचार केला, तर तिला बाबा, आजी, आजोबांचा गटच अर्थात आवडणार, कारण तिथं शिस्त, शिक्षा नव्हतीच मुळी. त्यामुळेच तिला आई आवडत नव्हती. कारण दोन्ही गटांत तिला मिळणारी वागणूक दोन विरुद्ध टोकांची होती. 

ही समस्या लक्षात आल्यावर रागिणीला तिच्या नवऱ्याला घेऊन भेटायला बोलावलं. ठरल्याप्रमाणे दोघंजण भेटायला आले. या भेटीदरम्यान त्या दोघांनाही आयेशाची नेमकी समस्या आणि त्यामागील कारणं, तसंच त्याचे भविष्यकाळात होऊ शकणारे परिणाम आणि त्यासाठी आवश्यक किंवा उपयुक्त उपाययोजना याबाबत मार्गदर्शन केलं. काही बदल आईला तर काही आयेशाच्या बाबांना सुचवले. आजी-आजोबा वयानुसार या बदलांना विरोध करतील हा अंदाज लक्षात घेऊन त्यांनाही हळू हळू या साऱ्यांत कसं सामावून घेता येईल यावरही चर्चा केली.

अपेक्षेप्रमाणे सुरुवातीला आजी-आजोबांनी बदलांना विरोध केलाच, पण हळू हळू फरक लक्षात येऊ लागल्यावर त्यांचा विरोध मावळला. अखेर आयेशाला वाढवणाऱ्या दोन गटांची समेट घडून आली आणि आयेशाची समस्या आपोआपच सुटली. 

(केसमधील नावं बदलली आहेत)

- मानसी तांबे - चांदोरीकर
ई-मेल : tambe.manasi11@gmail.com

(लेखिका पुण्यात समुपदेशक म्हणून कार्यरत आहेत. ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘मनी मानसी’ लेखमालिकेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/a3SDSr या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search