Next
‘जिथे शब्द पोहोचू शकत नाहीत तिथे चित्रं पोहोचतात’
पुस्तकदिनाच्या निमित्ताने मसापमध्ये शि. द. फडणीस यांच्या हस्ते चित्रकारांचा सन्मान
BOI
Thursday, April 25, 2019 | 02:21 PM
15 0 0
Share this article:


पुणे : ‘एकेकाळी पुस्तकांमध्ये शिल्लक असलेल्या जागेत चित्रांचा समावेश केला जायचा, पण आता चित्र ही भाषा आहे, हे साहित्य विश्वाला पटले आहे. जिथे शब्द पोहचू शकत नाहीत तिथे चित्रे पोहोचतात’, असे मत ज्येष्ठ चित्रकार शि. द. फडणीस यांनी व्यक्त केले. 

जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र साहित्य परिषदेत या वर्षी मराठी साहित्य विश्वात मोलाचे योगदान देणारे प्रसिद्ध चित्रकार नाना जोशी, ल. म. कडू, चंद्रमोहन कुलकर्णी, अनिल उपळेकर, रविमुकुल, गिरीश सहस्रबुद्धे, चारुहास पंडित या चित्रकारांचा शि. द. फडणीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्यवाह वि. दा. पिंगळे उपस्थित होते.

फडणीस म्हणाले, ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनालादेखील  ८६ वर्षांनंतर चित्रकारांची आठवण झाली आणि चिपळूणच्या संमेलनात ‘आमच्या रेषा बोलतात भाषा’ या विषयावर परिसंवाद झाला. चित्रकारांना साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर त्या वेळी प्रथमच स्थान मिळाले. चित्रकारांचे महत्त्व साहित्य विश्वाला समजते आहे, ही महत्त्वाची गोष्ट आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेने पुस्तक दिनाच्या पूर्वसंध्येला या चित्रकारांचा प्रातिनिधिक सन्मान केला, ही निश्चितच अभिनंदनीय घटना आहे.’

रविमुकुल म्हणाले, ‘पुस्तकातील आशयाला न्याय देणारे मुखपृष्ठ काढले जात आहे, ही महत्त्वाची गोष्ट आहे. प्रकाशक बदलल्यानंतर पुस्तकाचे पूर्वीचे मुखपृष्ठ बदलणे, ही गोष्ट चित्रकारांवर अन्याय करणारी आहे.’

नाना जोशी म्हणाले, ऐन उमेदीच्या काळात माझी दृष्टी गेली, तरीही चित्रकलेने माझी साथ सोडली नाही. चित्रकलेने माझ्या आयुष्यात दृष्टी नसतानाही प्रकाश दिला.’
चंद्रमोहन कुलकर्णी म्हणाले, ‘केवळ पुस्तकामुळे चित्रकला, शिल्पकला, कॅलिग्राफी, कलादिग्दर्शन या सर्व कलाप्रकारांशी मी जोडला गेलो. त्यामुळे पुस्तकांच्या सहवासात खूप काही करता आले. मी पुस्तकांच्या सदैव ऋणात राहीन.’

‘आयुष्यात जी गोष्ट मला आव्हान वाटत होती तीच मला करावी लागली. यातून माझ्यातला चित्रकार घडत गेला’, अशा भावना ल. म. कडू यांनी व्यक्त केल्या. 
प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, ‘लेखकाइतकेच साहित्यविश्वातील चित्रकारांचे स्थान महत्त्वाचे आहे. मुखपृष्ठ हे ग्रंथाचे प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारामुळे वाचकांना साहित्यविश्वात प्रवेश करावासा वाटतो. त्यामुळे साहित्य विश्वाने चित्रकारांबाबत कृतज्ञ असेल पाहिजे.’ वि. दा. पिंगळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search