Next
वस्तुवापराचं वर्तुळ ‘पूर्ण’ करणारी संस्था
BOI
Friday, November 02, 2018 | 03:45 PM
15 1 0
Share this article:‘टाकाऊतून टिकाऊ’ हा विचार केवळ लिहिण्यापुरता मर्यादित न ठेवता तो तंतोतंत अंमलात आणण्यासाठी धडपडणारी पुण्यातली संस्था म्हणजे पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशन. प्लास्टिक, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे आदींचा योग्य आणि अभ्यासपूर्ण पुनर्वापर, जनसामान्यांमध्ये जागृती, सॅनिटरी नॅपकिन्सची शास्त्रीय विल्हेवाट असे पर्यावरणविषयक अनेकविध उपक्रम ही संस्था राबवते आहे. वस्तूंच्या वापराचं वर्तुळ पूर्ण झाल्यामुळे साहजिकच कचऱ्यामुळे होणारं प्रदूषण आटोक्यात राखण्यास हातभार लागतो. ‘लेणे समाजाचे’ या सदरात या वेळी पाहू या ‘पूर्णम’च्या कार्याबद्दल...
.............
सांस्कृतिक पुणं, पेशव्यांचं पुणं, पेन्शनरांचं पुणं अशी ओळख असणाऱ्या पुण्याची नवी ओळख प्लास्टिक पिशव्यांचं पुणं अशीही करून देता येईल. उत्तम हवामान, मुबलक पाणी, दर्जेदार शिक्षण, सुरक्षितता, आयटी हब, नोकरी-व्यवसायाच्या संधी या सगळ्या आयामांमुळे बाहेरून पुण्यात येणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली. या सगळ्याचे विस्ताररूपी सकारात्मक परिणाम जसे झाले, तसेच गर्दी, प्रदूषण असे दुष्परिणामही झाले. एकीकडे मोठ-मोठे मॉल, मल्टिप्लेक्स उभे राहिले, नवनवी हॉटेल्स सुरू झाली, तर दुसरीकडे वाहतुकीचा प्रश्न, गुन्हेगारीत वाढ, कचराकोंडी या समस्या आ वासून उभ्या राहिल्या. कचरा व्यवस्थापनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला. कचरा डेपो हटवण्यासाठी पुण्याजवळच्या खेडेगावांनी आंदोलनंही केली. याच कचरा व्यवस्थापनाच्या क्षेत्रात पुण्यातील पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशन ही कंपनी भरीव कामगिरी करत आहे. ई-कचरा संकलन-व्यवस्थापन, कपडे व वस्तूंचा पुनर्वापर, कचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती या बाबतींत ही संस्था काम करते.शहरीकरणाचे फायदे-तोटे अनुभवणारं पुणं आता ‘स्मार्ट सिटी’ होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे; पण स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाबाबत जागृती तशी कमीच दिसते. डॉ. राजेश आणि डॉ. अक्षया मणेरीकर यांनी पुणे विद्यापीठातून पर्यावरणशास्त्रात पीएचडी करतानाच पर्यावरण रक्षण आणि कचरा व्यवस्थापन या अभ्यासाच्या विषयात काही मूलभूत काम करायचं ठरवलं होतं. त्यांनी हा मनोदय त्यांचे मित्र डॉ. प्रशांत दुराफे व सचिन कुलकर्णी यांच्यासमोर मांडला. सर्वांच्या विचारविनिमयातून ‘पूर्णम’ची कल्पना समोर आली आणि २०१२मध्ये पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशनची स्थापना झाली. कचरा व्यवस्थापन, शाश्वत शेती, अपारंपरिक ऊर्जा, नैसर्गिक ऊर्जास्रोतांचं व्यवस्थापन आणि पर्यावरण व्यवस्थापन सल्ला या क्षेत्रांत ‘पूर्णम’चं काम सध्या सुरू आहे.वस्तू पुनर्वापरापासून श्रीगणेशा
घराघरांतून नको असलेले कपडे गोळा करणं आणि त्यातल्या पुन्हा वापरता येण्याजोग्या कपड्यांपासून पिशव्या, सॅक, पर्स, गोधडी, पायपुसणी, रजई, आसनपट्टी, सतरंजी, बसकर या वस्तू तयार करून त्यांची विक्री करणं हा पहिला उपक्रम होता. मॉडेल कॉलनीत असलेल्या ‘पूर्णम’च्या ऑफिसमध्ये पुनर्वापरातून तयार झालेल्या वस्तूंची विक्री होत होती. त्याचबरोबर सुपारीच्या झाडांच्या पानांपासून तयार केलेल्या पत्रावळी, द्रोण व इतर वस्तूही तिथे उपलब्ध होत्या. कापडी पिशव्या, कागदी पिशव्या, नैसर्गिक पदार्थांपासून तयार केलेल्या वस्तूंचा वापर वाढावा व पर्यावरणरक्षण व्हावे, ही मूळ भूमिका होती. या ऑफिसमधलं सर्व फर्निचरही टाकाऊ लाकडापासून तयार केलेलं होतं. आता कर्वेनगरच्या नव्या ऑफिसमध्ये कपड्यांपासून तयार होणाऱ्या वस्तूंचा स्वतंत्र विभाग असून, त्यामध्ये स्थानिक महिला शिवणकाम करतात. आधी तयार होणाऱ्या वस्तूंबरोबरच आता कापडापासून तयार केलेले वॉलपीस, आयपॅडची पिशवी, की-चेन, पासपोर्ट ठेवण्यासाठीची पिशवी, महिलांना उपयोगी पडणारे छोटे बटवे, फाइल फोल्डर, होल्डर, ऑर्गनायझर या सगळ्यांची भर पडली आहे. या वस्तूंची मागणीही वाढली आहे.ई-कचरा संकलन केंद्रं
दरम्यानच्या काळात झालेली तंत्रज्ञानाची प्रगती, बाजारातल्या वस्तुविनिमयात झालेली वाढ आणि सामान्य नागरिकांची वाढलेली क्रयशक्ती यांमुळे घरोघरी येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची संख्या मोठ्या प्रमाणात आणि वेगानं वाढली. जुन्या वस्तू टाकायच्या कुठे, याची माहिती नसल्यामुळे त्यांच्या विल्हेवाटीचा प्रश्न निर्माण झाला. याला ‘पूर्णम’ने उत्तर शोधलं आणि पुण्यात ई-कचरा संकलन केंद्रं सुरू केली. सामान्यपणे पुणे महानगरपालिकेच्या कचरा गाडीमध्ये किंवा भंगारवाल्याला दिल्या जाणाऱ्या वस्तूंचं संकलन ही केंद्रं करू लागली. या केंद्रांमध्ये जुने टीव्ही, फ्रीज, टेपरेकॉर्डर, एअर कंडिशनर, मिक्सर-ग्राइंडर, सीडी प्लेयर, संगणक, प्लास्टिकच्या वस्तू अशा स्वरूपात ई-कचरा जमा होतो. २०१४ ते २०१७ या काळात संस्थेनं पुणे महानगरपालिका क्षेत्र, पिंपरी-चिंचवड, सातारा, रायगड, रत्नागिरी, ठाणे, सोलापूर या ठिकाणांवरून ६५ टन ई-कचरा गोळा केला आहे. ‘पूर्णम’च्या संकलन कार्यक्रमांना पुणेकरांबरोबरच इतर शहरांतले नागरिक, संस्था, संघटना चांगला प्रतिसाद देत असल्याचंच हे द्योतक आहे. ई-कचऱ्याचं पुढे काय?
‘पूर्णम’कडे जमा झालेल्या वस्तूंचं वर्गीकरण पुनर्वापरासाठी योग्य व टाकाऊ अशा दोन गटांत केलं जातं. काही वस्तू दुरुस्त करून गरजू स्वयंसेवी संस्थांना देणगी स्वरूपात दिल्या जातात. उरलेल्या वस्तूंची अधिकृत संस्थेमार्फत विल्हेवाट लावली जाते. त्यामुळे या वस्तूंतल्या हानिकारक घटकांमुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास रोखला जातो. ‘पूर्णम’ने २०१५ ते जून २०१७ या काळात पुणे महानगरपालिका क्षेत्र, पिंपरी-चिंचवड, सातारा, रायगड, रत्नागिरी, ठाणे, सोलापूर या ठिकाणच्या गरजू संस्थांना १२५ संगणक देणगी स्वरूपात दिले आहेत.सामान्यांमधली जागृती
ई-कचरा संकलन केंद्रं, जुन्या वस्तूंचा पुनर्वापर हे उपक्रम राबवतानाच डॉ. राजेश मणेरीकर यांच्या लक्षात आलं, की एवढं काम कचरा व्यवस्थापनासाठी पुरेसं नाही. प्लास्टिकचा वापर कमी करणं, कचरा टाकतानाच त्याचं वर्गीकरण करणं, जुन्या वस्तूंचा पुनर्वापर करणं याबाबत सामान्य नागरिकांत जागृती होणंही तितकंच गरजेचं होतं. त्यामुळे जनजागृतीचा उपक्रमही ‘पूर्णम’ने सुरू केला. त्याअंतर्गत संस्थेचे वक्ते शाळा, महाविद्यालयं, सोसायट्यांमध्ये कचरा व्यवस्थापनासंबंधीची व्याख्यानं देतात. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यशाळाही आयोजित केल्या जातात. या उपक्रमांमध्ये पुणे महानगरपालिका, जनाधार, सेवावर्धिनी, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, महर्षी कर्वे स्त्री-शिक्षण संस्था, डेक्कन कॉलेज, सिम्बायोसिस महाविद्यालय या संस्थांनी ‘पूर्णम इकोव्हिजन’ला मदत केली आहे.‘सीएसआर’मधून कॉर्पोरेट्सचा सहभाग
कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) उपक्रमांतर्गत कचरा व्यवस्थापनासंबंधी प्रकल्प राबवण्यासाठी अनेक संस्थांनी पुढाकार घेतला आहे. कमिन्स इंडिया, सनगार्ड, सॅबेज, फोक्स वॅगन या कंपन्यांनी विविध उपक्रम सुरू केले आहेत. ‘पूर्णम’च्या तज्ज्ञांनी या प्रकल्पांसाठी मार्गदर्शनाबरोबरच आवश्यक ती सर्व मदत केली आहे.

सॅनिटरी नॅपकिन प्रक्रिया उपक्रम
महिलांच्या आरोग्याच्या व स्वच्छतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या सॅनिटरी नॅपकिन्सचा शहरांतला वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे; पण वापरलेल्या नॅपकिन्सवर प्रक्रिया करण्याची कोणतीही व्यवस्था मात्र या शहरांत नाही. नॅपकिन्स नेहमीच्या कचऱ्यात टाकल्यामुळे होणाऱ्या दुष्परिणांचा विचार करून ‘पूर्णम’ने पुणे महानगरपालिका आणि जनाधार स्वयंसेवी संस्थेच्या साह्यानं सॅनिटरी नॅपकिन प्रक्रिया प्रकल्प सुरू केला. या उपक्रमांतर्गत शाळा-महाविद्यालयांतल्या मुलींमध्ये नॅपकिन्सचा वापर व त्याची योग्य विल्हेवाट याबद्दल जागृती केली जाते. संस्थेच्या प्रशिक्षित सदस्या याबाबत मुलींशी प्रत्यक्ष संवाद साधतात. दुसरा टप्पा म्हणजे वापरलेल्या नॅपकिन्सच्या संकलनाचा. पुणे महानगरपालिकेच्या शनिवार-नारायण पेठ, पर्वती, कर्वे रस्ता-प्रभात रस्ता, कोरेगाव पार्क आणि वडगाव शेरी या प्रभागांमध्ये ‘पूर्णम’ची नॅपकिन संकलन केंद्रं आहेत. या केंद्रांवर मिळून रोज अडीच ते तीन हजार नॅपकिन्सचं संकलन केले जाते. संकलित नॅपकिन्सची इन्सिनरेटर या यंत्राद्वारे पर्यावरणपूरक विल्हेवाट लावली जाते. या उपक्रमाच्या माध्यमातून १८ कर्मचाऱ्यांना रोजगारही मिळाला आहे. ही यंत्रं विविध संस्थांमध्ये बसवण्यासंबंधीचं मार्गदर्शनही संस्थेचे अधिकारी करतात.

आपणही व्हा सहभागी
जनजागृती व समाजाच्या सहभागातून कचरा व्यवस्थापन या मूल्यांच्या आधारे काम करणाऱ्या पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशनमध्ये सध्या २२ जणांची टीम काम करते. त्याचबरोबर १०० स्वयंसेवकही या कामाला मोलाचा हातभार लावतात. हे सर्व उपक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी मनुष्यबळासोबतच आर्थिक मदतीचीही गरज असते. या दोन्ही पद्धतींनी आपण या उपक्रमांत सहभागी होऊ शकता. आपल्या सोसायटीत किंवा ऑफिसमध्ये कचरा व्यवस्थापनाबाबत एखादं व्याख्यान आयोजित करू शकता. वेगाने विकसित होणाऱ्या शहरांतले प्रश्न सोडवणं हे जसं स्थानिक स्वराज्य संस्थांचं काम आहे, तसंच त्यात नागरिकांचाही सहभाग आवश्यक आहे. आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले, तरच भावी पिढी विकसित पुणे, सुरक्षित पुणे याचबरोबर ‘स्वच्छ, पर्यावरणपूरक पुणे’ असंही अभिमानानं सांगू शकेल.

संपर्क :
डॉ. राजेश मणेरीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, 
पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशन
मोबाइल : ९४०५३ ९१९८०
फोन : (०२०) २५४७३७५७
पत्ता : सर्व्हे क्रमांक ५, मातोश्री बंगला, चिन्मय कॉलनी, जनसेवा मेडिकलची गल्ली, कर्वेनगर, पुणे – ४११०५२.
वेबसाइट : www.poornamecovision.org

- अमोल अशोक आगवेकर 
ई-मेल : amolsra@gmail.com

(पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश मणेरीकर यांच्या मनोगताचा व्हिडिओ सोबत देत आहोत. ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील ‘लेणे समाजाचे’ या सदरातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/CAiHJu या लिंकवर उपलब्ध आहेत.)

 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Dinesh Kohok About 343 Days ago
This is noble work.
1
0
Sacheen About 346 Days ago
अमोलजी, फारच छान, !!! नेमकेपणानी वृत्तांकन झाल्यामुळे संपूर्ण कामाची माहिती होते...
1
0

Select Language
Share Link
 
Search