Next
अंधे जहाँ के अंधे रास्ते....
BOI
Sunday, April 01, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

आगासिनेमा म्हणजे प्रमुख नायकाचाच असतो असे नव्हे. अनेक कला आणि अनेक कलावंत मिळून अडीच-तीन तासांत जे कथानक दाखवतात, त्यामध्ये प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे असते, मग ते एक मिनिटाचे असो, अगर एक तासाचे असो! त्यापैकीच एक महत्त्वाचा कलावंत म्हणजे आगा. त्याचा जन्मदिन नुकताच होऊन गेला आणि स्मृतिदिन एप्रिलमध्ये आहे. त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’मध्ये आज पाहू या त्याच्यावर चित्रित झालेले ‘अंधे जहाँ के अंधे रास्ते’ हे गीत... 
.............
वडील, काका, मित्र अशा भूमिका करणाऱ्या अभिनेत्याबद्दल परवा आमच्या मित्रांनी आपली मुक्ताफळे उधळली, की तो म्हणे चित्रपटात फुटकळ कामे करायचा! ते ऐकून आमच्या त्या मित्रांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटली. सिनेमा म्हणजे प्रमुख नायकाचाच असतो असे नव्हे. अनेक कला आणि अनेक कलावंत मिळून अडीच-तीन तासांत जे कथानक दाखवतात, त्यामध्ये प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे असते, मग ते एक मिनिटाचे असो, अगर एक तासाचे असो! 

आणि या दृष्टिकोनातून विचार करता अभिनेता आगा याचे योगदानही महत्त्वाचे आहे. त्याचा स्मृतिदिन एप्रिल महिन्यात असतो. १९९२मध्ये त्याचा मृत्यू झाला, ती तारीख काही ठिकाणी दोन एप्रिल अशी आढळते, तर काही ठिकाणी ३० एप्रिल अशी आढळते. आगा हा विनोदी अभिनेता होता आणि मूकपटापासून तो सिनेमाचा चाहता होता. नौटंकी हा प्रकारही तो पाहायचा! तो पाहूनच त्याला आपण नट व्हावे असे वाटले; पण त्यासाठी घरातून पाठिंबा मिळणे शक्य नव्हते. म्हणून घरातून पळून जाऊन त्याने मुंबई गाठली. 

त्या वेळी आगा मस्त दिसत होता. तरीही हिरो होणे एवढे सोपे नव्हते. खूप धडपड केल्यानंतर पृथ्वीराज कपूर यांची भेट झाली. त्यांच्या सिनेमात काम मिळाले; पण चित्रिकरणादरम्यान केवळ वेळेत न आल्याने त्याला काढून टाकण्यात आले. पुन्हा स्टुडिओत चकरा मारणे, मनधरणी करणे सुरू झाले. अखेर हरिश्चंद्र कदम यांच्या ‘दौलत’ चित्रपटात सहनायकाची भूमिका मिळाली. वाडियांच्या ‘कहाँ है मेरी मंझिल’ या चित्रपटासाठी त्याची नायक म्हणून निवड झाली. नंतर ‘शराबी आँखें’ हा चित्रपट मिळाला; पण हळूहळू आगा प्रमुख नायकाच्या भूमिकेपासून दूर दूर जाऊ लागला आणि कधी सहनायक, तर कधी विनोदी नायक म्हणूनच त्याची निवड होऊ लागली.

अभिनयाचे एक जबरदस्त अंग त्याच्याजवळ होते. कोणतेही अंगविक्षेप न करता केवळ मुद्राभिनयातून प्रेक्षकांत हास्याची कारंजी उडवण्याचे कसब आगाला साध्य झाले होते. चेहऱ्यावर मंद बुद्धीच्या माणसाचा भाव ठेवून वावरणे, एखादी गोष्ट ‘उशिरा ट्यूब पेटल्यासारखी’ समजणे किंवा शाब्दिक विनोद करणे ही आगाची खासियत होती.

एक इराणी दांपत्याच्या पोटी पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान जन्मलेल्या आगाला आपली नेमकी जन्मतारीख माहीत नव्हती. त्यामुळे इराणी नववर्षदिनाची २१ मार्च ही तारीख त्याने आपली जन्मतारीख म्हणून जाहीर केलेली होती. असा हा आगा विनोदी अभिनेता म्हणून प्रसिद्ध झाला होता, त्याच वेळी दिग्दर्शक अमिया चक्रवर्ती यांच्याशी त्याचा परिचय झाला. आगामधील अभिनयाचे गुण त्यांनी ओळखले. दोघांची मैत्री झाली. आगाला त्याच्या हास्य अभिनेत्याच्या इमेजमधून बाहेर काढायचे अमिया यांनी ठरवले. ‘पतिता’ या चित्रपटात त्यांनी आगाला एक वेगळी भूमिका दिली. नायिकेला आत्महत्येपासून परावृत्त करणारा एक भणंग माणूस म्हणून आगा या चित्रपटात आपल्याला दिसतो. त्यामध्ये एक रडण्याचा प्रसंग होता. आगाला हे जमणार नाही असे अनेकांनी सांगितले; पण अमिया यांचा आगाच्या अभिनयक्षमतेवर विश्वास होता. त्यामुळे त्या प्रसंगाच्या चित्रणाच्या आधी त्यांनी ठणकावून सांगितले, की आगाने हा शॉट उत्कृष्ट दिला नाही, तर मी चित्रपटसृष्टी सोडून देईन! आगा हा शॉट उत्कृष्ट देणारच!

आणि आगाने आपल्या मित्राचा हा विश्वास सार्थकी ठरवला. तो शॉट त्याने उत्कृष्टपणे दिला! खरे तर विनोदी भूमिका करण्यापेक्षा करुण रसप्रधान भूमिका करण्याकडे आगाचा जास्त कल होता; पण त्याच्या वाट्याला त्या भूमिका जास्त आल्याच नाहीत. तरीही ज्या भूमिका वाट्याला आल्या, त्या त्याने उत्तमपणे साकार केल्या. ‘पुनवेची रात’ या मराठी चित्रपटामध्येही त्याने भूमिका केली होती.

‘ज्वारभाटा’ या दिलीप कुमारच्या पहिल्या चित्रपटात आगा महत्त्वाच्या भूमिकेत होता. आणि मीनाकुमारीच्या ‘बच्चों का खेल’ या नायिका म्हणून असलेल्या पहिल्या चित्रपटात तो मीनाकुमारीचा नायक होता. ‘गोमती के किनारे’ या मीनाकुमारीच्या अखेरच्या चित्रपटामध्ये तो मीनाकुमारीचा भाऊ झाला होता.

अभिनेता म्हणून उत्कृष्ट असलेला आगा एक उकृष्ट मित्रही होता. अमिया चक्रवर्तींची व त्याची खास मैत्री! अमिया ‘कठपुतली’ चित्रपटाची निर्मिती करत असताना देवाघरी गेले. मित्राला दिलेला शब्द पाळण्यासाठी आगाने तो अर्धा चित्रपट बलराज सहानी, वैजयंतीमाला यांच्या साह्याने पूर्ण केला. 

साठ वर्षांच्या चित्रपट जीवनात आगाने बऱ्याच भूमिका केल्या आणि हजारो माणसे पाहिली, अनुभवली. अंधांच्या राष्ट्रीय संघटनेसाठी निधी संकलनाचे काम केले. पश्चिम भारतीय फुटबॉल संघटनेचा पदाधिकारी म्हणून त्याने काम केले. १९६२च्या चीन-भारत युद्धातील जवानांचे मनोरंजन करण्यासाठी प्रत्यक्ष सीमेवर जाऊन त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले होते.

असा संपन्न व्यक्तिमत्त्वाचा अभिनेता त्याच्या अखेरच्या दिवसांत पुणे येथे वास्तव्य करून राहिला होता. १९९२मध्ये त्याने जगाचा निरोप घेतला. त्याच्यावर चित्रित झालेले ‘पतिता’ चित्रपटातील गीत आज आपण सुनहरे गीत म्हणून पाहणार आहोत. ‘पतिता’ चित्रपटात दिग्दर्शक अमिया चक्रवर्ती यांनी बलात्कारित स्त्रीची कहाणी मांडली होती. दुःखाने खचलेली नायिका (उषा किरण) आत्महत्या करण्यासाठी निघते, तेव्हा तिच्या मनातील भाव, तिची अवस्था दर्शविणारे गीत गीतकार शैलेंद्रने लिहिले होते. अमिया चक्रवर्तींमधील कुशल दिग्दर्शक हे गीत पडद्यावर दाखवणारा आत्महत्या करायला जाणाऱ्या नायिकेला गायला लावत नाही, तर त्यासाठी तो एका भणंग माणसाच्या तोंडी हे गीत दर्शवतो. ती भणंग माणसाची भूमिका आगा यांनी केली होती.

जीवनात दुःखाने हैराण होऊन निराश झालेले ते मन काय म्हणते -

अंधे जहाँ के अंधे रास्ते, जाए तो जाए कहाँ
दुनिया तो दुनिया, तू भी पराया, हम यहाँ न वहाँ

या जगात सर्वत्र (दुःखाचा) अंधारच दाटला आहे. येथील मार्गही अंध:कारमयच आहेत. (त्यामुळे) येथे जाऊन जायचे तर कोठे जायचे? हे जग (त्यातील लोक यांच्याबद्दल काय सांगायचे? ते सारेच) परके आहे (आणि आम्ही दुःखाने पिडलेले आहोत. त्यामुळेच) आम्हाला कोठेच आसरा नाही.  

पुढे हा त्रस्त जीव म्हणतो - 

जीने की चाहत नाही, मर के भी राहत नाही 
इस पार आँसू, उस पार आहें, दिल मेरा बेजुबाँ

(या दुःखामुळे) जगण्याची इच्छाच आता उरली नाही. (आणि) मेल्यावर तरी आम्हाला शांती (राहत) मिळेल काय? (खरेच काहीच कळत नाही. येथे एका टोकाला अश्रूंचे समुद्र आहेत, तर दुसऱ्या टोकाला दुःखाने टाकलेले उसासे (आह) आहेत. (म्हणूनच हे सारे बघून) मी माझे तोंड बंद ठेवले आहे. (कारण याबाबत बोलायचे तरी काय? आणि तक्रार तरी कोणाकडे करायची?) या जगातील सर्व मार्ग अंधकारमय आहेत. 

आमची येथे अवस्था कशी आहे तर - 

हम को ना कोई बुलाए, ना कोई पल्के बिछाए 
ए गम के मारो मंझिल वही है दम ये टूटे जहाँ

(आम्ही असे कमनशिबी व कोणतेही प्रेम न मिळालेले आहोत, की) आम्हाला कोणी बोलावत नाही, डोळे लावून आमची कोणी वाट बघत नाही. आम्हा दुःखितांचा हा प्रवास त्याचं ठिकाणावर संपेल जेथे आम्ही शेवटचा श्वास घेऊ! जेथे आमचे जगणे संपुष्टात आले असेल.

हे माझ्या मना - 

आगाज हे दिन तेरा, अंजाम तय हो चुका 
जलते रहे हैं, जलते रहेंगे ये जमी आसमाँ 

(हे मना) सुरुवात (आगाज) झाली त्या दिवशी तुझा (पुढचे तुझ्या हातात काहीच नाही. तुझा) शेवट (अंजाम) निश्चित झालेला आहे. (आणि तुझा शेवट झाल्यावर तुझी जीवनकहाणी संपल्यावरसुद्धा) ही जमीन, हे आकाश असेच राहणार आहे. (म्हणजे तुझ्या जाण्याने कोणाचे काही अडणार नाही. हे सृष्टीचे चक्र असेच चालू राहणार आहे.)

पार्श्वगायक तलत मेहमूद यांनी गायलेले, संगीतकार शंकर जयकिशन यांनी स्वरबद्ध केलेले हे गीत किती प्रकारांनी वेगळे आहे! याचा आशय, सूर निराश व्यक्तिमत्त्वाच्या भावनांचा आहे. त्यामुळे ते चित्रपटाच्या नायिकेवरील दुःखद प्रसंगाला साजेसे ठरते. दुःखी आशयाची गाणी हे पार्श्वगायक तलतचे खास वैशिष्ट्य. त्यामुळे त्याचा स्वर गीताला न्याय देतो. आता हे गीत पडद्यावर एक भणंग माणूस गाणार आहे. त्या दृष्टिकोनातून संगीतकार शंकर-जयकिशन यांनी या गीताची चाल तयार केली, साजेसा असा वाद्यमेळ जमवला! आणि पडद्यावर आगा हा अभिनेता - नेहमी हास्यविनोदात रमलेला; पण येथे दुःख व्यक्त करताना गाणारा! एक वेगळे एकत्रीकरण या गीतात आहे. आणि म्हणूनच त्याला ‘सुनहरे’ म्हणावेसे वाटते.

- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या त्यांच्या ‘सुनहरे गीत’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/8ABN2G या लिंकवर एकत्रितपणे उपलब्ध आहेत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search