Next
वामनवृक्ष कलेच्या प्रसारासाठी पुण्याचा पुढाकार
प्रेस रिलीज
Wednesday, February 07 | 04:45 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘पुरातन काळात भारतात अस्तित्त्वात असलेली ‘वामनवृक्ष कला’ परदेशात बोन्साय आर्ट म्हणून बहरली पण, भारतात मात्र तिचा विकास खुरटला. या कलेचे पुनरुज्जीवन व्हावे, तिची व्यावसायिक उपयुक्तता लक्षात यावी, या उद्देशाने ‘बोन्साय नमस्ते’ या बोन्सायविषयक पहिल्या भव्य आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शनाचे येत्या २२ ते २५ फेब्रुवारी दरम्यान आयोजन करण्यात आले आहे’, अशी माहिती येथील प्रसिद्ध बोन्साय कलाकार प्राजक्ता काळे यांनी दिली. 

‘कृषी महाविद्यालयाच्या मैदानात हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. प्रदर्शनाची वेळ सकाळी नऊ ते रात्री दहा असून, सर्वांसाठी ते विनामूल्य खुले असेल’, असे गिरीधर काळे आणि बोन्साय नमस्तेचे सल्लागार जनार्दन जाधव यांनी सांगितले.

या पहिल्या जागतिक परिषदेबद्दल माहिती देताना प्राजक्ता काळे म्हणाल्या, ‘वृक्षांविषयीच्या ‘बोन्साय’ या नावाने जगभरात प्रसिद्ध असलेल्या जपानी कलेचे मूळ हे प्राचीन भारतीय संस्कृतीत ‘वामनवृक्ष कला’ या नावाने पहायला मिळते. बौद्ध धर्माच्या प्रसाराबरोबरच याचा जगभरात प्रसार झाला. जपानमध्ये याला कलेचा दर्जा मिळाला. त्यानंतर सर्वत्र ही कला ‘बोन्साय आर्ट’ म्हणून प्रसिद्धीस आली. भारतात या कलेचे मूळ असून देखील या कलेला फारसे प्राधान्य आणि व्यासपीठ मिळाले नाही. हेच लक्षात घेत भारतीय मूळ असलेली ही कला आपल्या देशात वाढावी, सर्वसामान्यांना त्याची माहिती व्हावी आणि शेतीपूरक व्यवसाय म्हणून याचा विचार व्हावा या उद्देशाने आम्ही ‘बोन्साय नमस्ते’च्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत’.

त्या पुढे म्हणाल्या, ‘या प्रदर्शनात एक  मीटर उंचीचे सर्वांत जुने १५० वर्षांचे उंबराचे बोन्साय, तर ३ इंच उंचीचे सर्वांत लहान बोन्साय पहायला मिळणार आहे. मामे, शोहीन, स्मॉल बोन्साय, मिडीयम बोन्साय, लार्ज व एक्स्ट्रा लार्ज बोन्साय अशा अनेक प्रकारांची एक हजारांहून अधिक बोन्साय येथे असतील. प्रदर्शनाच्या ठिकाणी बोन्साय विषयक पुस्तकांचे एक ग्रंथालय देखील उभारण्यात येणार आहे.’

 ‘या वेळी भारतातील बोन्साय कलाकारांना आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या ज्येष्ठ बोन्साय कलाकारांचे मार्गदर्शन विविध कार्यशाळांच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. बेल्जियम, इटली, इंडोनेशिया, जपान, इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, व्हिएतनाम आदी १६ विविध देशांतील बोन्साय कलाकार (मास्टर्स) या परिषदेत सहभागी होणार आहेत. कृषी व फलोत्पादन महाविद्यालातील विद्यार्थ्यांना या कलेची ओळख व्हावी आणि त्याचा शेतीपूरक व्यवसायासाठी विचार व्हावा यासाठी काही विशेष प्रात्यक्षिकेदेखील आयोजित करण्यात येणार आहेत, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.   

‘भारतातील वातावरण व भारतात आढळणाऱ्या वृक्षांच्या प्रजाती या बोन्साय कलेसाठी अत्यंत पोषक असून देखील याचा फारसा प्रसार भारतात झाला नाही याचे मुख्य कारण म्हणजे प्री बोन्साय मटेरियलची कमतरता. भारतात इतर देशांच्या तुलनेत बोन्साय कला जोपासणा-यांमध्ये स्त्री कलाकारांचे प्रमाण हे खूप जास्त आहे. शेतीशी संबंधित स्त्रीयांना यासंबंधीचे प्रशिक्षण दिल्यास प्री बोन्साय मटेरियलची निर्मिती अगदी सहज होऊ शकते, जी देश विदेशातील बोन्साय कलाकारांना उपलब्ध करून देता येईल. यामुळे शेतीपूरक व्यवसाय वाढीस चालना मिळेल. याबरोबरच भारतात असलेले वृक्षांचे अनेकविध प्रकार लक्षात घेत बोन्साय कलेच्या वाढीसाठी आपला देश एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरू शकतो,’ असेही प्राजक्ता काळे यांनी स्पष्ट केले.

आपल्या या छंदाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, ‘१९८४च्या सुमारास बोन्साय कलेच्या कार्यशाळेची जाहिरात वाचनात आली. त्यात मी सहभागी झाले आणि मला त्याची आवड निर्माण झाली. सुरुवातीला पुस्तकांच्या माध्यमातून आणि त्यानंतर इंडोनेशियातील प्रसिद्ध बोन्साय कलाकार रुडी नजोन यांच्या मार्गदर्शनाखाली बोन्सायमधील प्रशिक्षण घेतले. रुडी वर्षातून एकदा भारतात येऊन मार्गदर्शन करत असत. पुण्यात काही महिला या क्षेत्रात कार्यरत होत्या, त्या गटात मी सहभागी झाले. बोन्साय करण्याच्या कलेने मला अक्षरशः झपाटले आहे. गेली २० वर्षे मी या कलेला वाहून घेतले आहे. यामुळे आपण ताणतणावापासून दूर राहू शकतो. संयम,सहनशीलता वाढते. भारतात प्री बोन्साय मटेरियल नाही, फक्त महिलाच यात काम करतात अशी कारणे परदेशी तज्ञ, कलाकार देऊन भारतात येण्यासाठी नकार देत. ही परिस्थिती बदलायला हवी, असा माझा निश्चय होता. त्यामुळे भारतीय प्रजातींच्या वनस्पती ज्यामध्ये वड, पिंपळ, लिंबू, आवळा आदींचा समावेश आहे. त्यांची बोन्साय विकसित करण्यावर भर दिला.बिबडेओहोळ येथे तब्बल तीन हजारहून अधिक  बोन्सायचे फार्म विकसित केले.

या सगळ्या प्रवासात माझे पती गिरीधर काळे, सासूबाई कावेरीबाई काळे यांनी मोलाची साथ दिली आहे तसेच;सुचेता अवदानी, कामिनी जोहारी, राहुल राठी आणि मार्क डिक्रुज या समविचारी मित्र मैत्रिणींच्या सहकार्याने ‘बोन्साय नमस्ते’ या नावाने संस्था सुरु केली असून त्याद्वारे बोन्साय कलेच्या प्रसारासाठी कार्य करत आहे’.  

बोन्साय म्हणजे नेमके काय ? 
निसर्गात आढळणाऱ्या वृक्षांच्या लघु प्रतिकृतीच. बोन्साय करीत असताना वृक्षांबद्दलचे ज्ञान, फलोत्पादनाचे तंत्र आणि सर्जनशीलता यांच्या मदतीने निसर्गाचे संतुलन, साधेपणा आणि सुसंवाद साधण्याचा प्रयत्न कलाकार करीत असतो. बोन्साय या शब्दाचा अर्थ ‘बोन’ अर्थात कुंडी आणि ‘साय’ म्हणजे वृक्ष. म्हणजे कुंडीत वाढविण्यात येणारे वृक्ष असा होय. या कलेचे मूळ हे भारतीय संस्कृतीत आहे. पूर्वी आपले मुनी/ ऋषी, वैद्य विविध औषधे निसर्गातून घेत होते. पण ते वयोवृद्ध अथवा प्रवासात असताना त्यांना जंगलात जाणे शक्य नसायचे म्हणून ते हे वृक्ष घरी आणून झाडे कुंडीत वाढवू लागले. ही झाडे वर्षभर खुडत राहिल्यामुळे वैद्यांना वर्षभर त्याचा फायदा मिळे व झाडेही छोटी राहत. ही झाडे वामनासारख्या बुटक्या स्वरूपात दिसत असल्याने या कलेला ‘वामनवृक्ष कला’ असे नाव पडले.औषधोपचारासाठी असलेल्या या वृक्षांना हे ‘वामनवृक्ष’ अर्थात ‘बोन्साय’ असे नाव पडले. भारतातून बौद्ध धर्माबरोबरच या कलेचाही जगभर प्रसार झाला. जपानमध्ये याला ख-या अर्थाने कलेचा दर्जा मिळाला आणि नंतर जगभरामध्ये ती ‘बोन्साय आर्ट’ म्हणून प्रसिद्धीस आली. आज जगभरात या कलेचा प्रसार होत आहे. ही कला जोपासत असताना कलाकार आणि बोन्साय यांमध्ये एक नातेच जणू तयार होत असते. प्रत्येक कलाकार आपले बोन्साय हे आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर बनवीत असतो. त्यासाठी तो संयमाने अनेक वर्षे काम करीत असतो. हे करीत असताना ताणतणाव दूर ठेवता येतातच याबरोबर निसर्गाच्याही जवळ जाता येते.  

 (प्राजक्ता काळे यांनी साकारलेल्या बोन्साय फार्मचा  व्हिडिओ सोबत देत आहोत.) 
 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link