Next
‘म. फुले यांच्या अखंडांना नीला भागवत यांच्या बंदिशींमुळे नवी ओळख’
डॉ. सदानंद मोरे यांचे गौरवोद्गार
BOI
Monday, April 22, 2019 | 02:28 PM
15 0 0
Share this article:

गायिका नीला भागवत यांच्यावरील ‘समांतर’ या माहितीपटाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. सदानंद मोरे, नीला भागवत, ज्योती सुभाष, विद्या बाळ आदींसह कल्याण तावरे, महावीर जोंधळे, सुरेंद्र जोंधळे व सारीशा आर्ट्सच्या सर्व महिला आणि मान्यवर.

पुणे : येथील ‘सारीशा आर्टस्’ या स्त्रियांच्या चित्रपट निर्मिती संस्थेतर्फे ग्वाल्हेर घराण्याच्या ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका नीला भागवत यांच्या संगीत प्रवासावर आधारित ‘समांतर’ या माहितीपटाची निर्मिती करण्यात आली आहे. नीला भागवत या केवळ ग्वाल्हेर घराण्याच्या शास्त्रीय गायिका नसून, त्यांनी संत कबीर, संत तुकाराम, संत मीराबाई, महात्मा फुले, संत सोयराबाई, संत चोखामेळा तसेच महात्मा गांधी यांच्या रचनांवर अनेक बंदिशींची निर्मिती केली आहे.

रविवारी, २१ एप्रिल रोजी या माहितीपटाचे प्रसारण ज्येष्ठ विचारवंत व संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, लेखिका इंदुमती जोंधळे व अभिनेत्री ज्योती सुभाष यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या वेळी नीला भागवत यांनी सादर केलेल्या संत कबीर, महात्मा गांधी आणि संत मुक्ताबाईच्या रचनांना रसिकांची वाहवा मिळाली. आर्याबाग सांस्कृतिक परिवारातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या परिवाराचे संस्थापक अध्यक्ष कल्याण तावरे, बालभारती किशोरचे संपादक व आर्याबागचे सदस्य किरण केंद्रे, सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ, ज्येष्ठ पत्रकार महावीर जोंधळे, लेखक सुरेंद्र जोंधळे, शोभा भागवत आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. 

या वेळी  ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे म्हणाले, ‘संगीत हे साधनमूल्य नसून, लोकांना शहाणं करण्याचेही माध्यम आहे. नीलाताई हे काम करत आहेत. महात्मा फुले यांनी लिहलेल्या अखंडांना बंदिशींमध्ये आणून एक नवी ओळख भागवत यांनी करून दिली आहे. चौकटीत राहून चौकटीबाहेरचे कार्य संगीताच्या माध्यमातून नीलाताई भागवत यांच्याकडून झाले आहे. शास्त्रीय संगीताच्या उच्चस्थपदी त्या पोहोचल्या असून, त्या आता नुसत्या नीला भागवत नसून ‘पंडित’ नीला भागवत आहेत. त्यांचं संगीतातील योगदान, तसेच स्त्रिया व समाजातील शोषित घटकाच्या समस्यांसाठी केलेलं कार्य त्यामुळे माहितीपटाला दिलेलं ‘समांतर’ हे नाव समर्पक आहे.’

नीला भागवत

नीला भागवत म्हणाल्या, ‘नियम आणि स्वातंत्र्य याचे बेमालूम मिश्रण अभिजात कलेमध्ये आहे. नायिका म्हणून, गायिका म्हणून आपल्याला दिसणार जग वास्तव आपल्या कलेद्वारे नाही मांडलं, तर त्या कलेचा काय उपयोग, स्त्रीवाद हा स्त्रियांपुरता मर्यादित नसून, ही सगळ्यांना सामावून घेणारी संकल्पना आहे.’

ज्येष्ठ अभिनेत्री आणि दिग्दर्शिका ज्योती सुभाष म्हणाल्या, ‘दृक श्राव्य माध्यम हे अतिशय प्रभावी माध्यम असून, या माध्यमातून सावनी अर्जुन यांनी नीला भागवत यांचा चित्रित केलेला संगीतप्रवास हा वाखाणण्याजोगा आहे. समाजभान असलेला एक कलाकार कसा जगतो, कलेच्या माध्यमातून जीवन कसे मांडतो, हे या माहितीपटात अगदी उत्तम रित्या दाखवण्यात आलेले आहे. चिरंतन जे आहे ते बाजूला पडत चाललंय, ते जतन करण्याचे काम सारीशा आर्टस् या ग्रुपने केले आहे.’

लेखिका इंदुमती जोंधळे म्हणाल्या, ‘नीला भागवत यांचे गायन म्हणजे संवेदनशीलता आणि प्रायोगिकता यांचा संगम आहे.’ माहितीपटाच्या दिग्दर्शिका सावनी अर्जुन म्हणाल्या, ‘अभिव्यक्तीचे संपूर्ण स्वातंत्र्य नीला भागवत यांच्या गायकीत दिसते. गांधी, फुले, टागोर यांच्या बंदिशी भागवत यांनी केल्या हे अनेक लोकांना माहिती नाही. कदाचित या माहितीपटातून अनेक जण प्रेरणा घेतील असा विश्वास वाटतो.’

लेखक आणि दिगदर्शक धनंजय भावलेकर म्हणाले, ‘आधुनिक काळात साधने खूप आहेत, परंतु साधना कमी पडते आहे. कठोर साधनेचे प्रतिबिंब म्हणजे नीला भागवत. हा माहितीपट येणाऱ्या पिढयांना संदर्भ म्हणून नक्कीच अभ्यासता येईल.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search