Next
वेडात मराठे वीर दौडले सात... नाट्यातून उलगडला इतिहास..
सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे जिवंत देखावा
BOI
Friday, February 22, 2019 | 03:20 PM
15 0 0
Share this story


पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म... त्यांचे बालपण... तानाजी मालुसरे-शिवाजी महाराज भेट... अफझलखानाचा वध... बहलोल खानाचा धुमाकूळ... बहलोल खानास धुळीस मिळवा.. महाराजांचे फर्मान... आपल्या सहा सरदारांबरोबर प्रतापरावांनी बहलोल खानाच्या छावणीवर केलेली चढाई... अशा चित्तथरारक प्रसंगांतून ५० कलाकारांनी ‘वेडात मराठे वीर दौडले सात..’ हा इतिहास जिवंत केला.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने कोतवाल चावडी येथे शिवजयंती उत्सवानिमित्त ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या जिवंत देखाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अप्पर पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर, ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी, हेमंत रासने, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. 

सुमारे ४० बाय ४५ फूट आकाराच्या दुमजली रंगमंचावर सदाशिव पेठेतील श्रीमंत शिवसाई प्रतिष्ठानच्या कलाकारांनी आपली कला सादर केली. महेंद्र महाडिक यांनी याचे लेखन केले होते. महेश रांजणे यांनी नेपथ्य, तर  राहुल सुरते यांनी रंगभूषा केली होती. प्रतिष्ठानचे संस्थापक गणेश लोणारे, अतुल दळवी यांचे विशेष सहकार्य लाभले. या महानाटयापूर्वी नादब्रह्म ढोल-ताशा वादन रद्द करून, ट्रस्टचे कार्यकर्ते व पथकातील वादकांनी पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांना मानवंदना दिली. 

या वेळी रवींद्र सेनगावकर म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगी असलेला एक गुण जरी सर्वांनी आचरणात आणला, तर ती त्यांना खरी आदरांजली ठरेल.’  पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली अर्पण करून, ते म्हणाले,  ‘सीआरपीएफ जवानांनी दिलेले हे सर्वोच्च बलिदान आहे. सर्वांनी एकत्र येऊन सरकार जे पाऊल उचलेल त्याच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक आहे. जवानांच्या बलिदानाचे विस्मरण होता कामा नये.’ 

(वेडात मराठे वीर दौडले सात .. या जिवंत देखाव्याची झलक दाखविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link