Next
‘पुलसुनीत’ ठरणार दातृत्वामधील दुवा
दात्यांची साखळी तयार करून ‘पुलं’ना आदरांजली वाहण्याचा ‘आर्ट सर्कल’चा उपक्रम
अनिकेत कोनकर
Thursday, December 06, 2018 | 06:02 PM
15 0 0
Share this article:

रत्नागिरी : पु. ल. देशपांडे हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून आपल्याला माहिती आहेत. लेखनासह विविध कलांच्या त्यांनी केलेल्या आविष्काराचा आनंद आपण कोणत्या ना कोणत्या रूपात लुटत असतो. त्या पलीकडेही दातृत्व हा त्यांच्या जीवनाचा एक मोठा पैलू होता. समाजात तो पैलू वृद्धिंगत व्हावा, या उद्देशाने ‘पुलं’च्या जन्मशताब्दीनिमित्ताने दात्यांची एक साखळी तयार करण्याचा अनोखा उपक्रम रत्नागिरीतील ‘आर्ट सर्कल’तर्फे सुरू करण्यात आला आहे. ‘पुलसुनीत’ असे या उपक्रमाचे नाव असून, फेसबुक पेज हा त्यातील दुवा असणार आहे.

आपल्या आजूबाजूला कार्यरत असलेल्या आणि चांगले काम करणाऱ्या सामाजिक संस्थांना आर्थिक किंवा अन्य स्वरूपातील मदत करून त्या संस्थेचे नाव ‘पुलसुनीत’च्या फेसबुक पेजवर जाहीर करायचे, असे या उपक्रमाचे स्वरूप आहे. आपण किती मदत केली याचा उल्लेख आवश्यक नाही; मात्र कोणत्या संस्थेला मदत केली, याचा उल्लेख गरजेचा आहे. त्यातूनच आणखी काही जणांना ती संस्था आणि तिचे कार्य कळेल आणि मदतीचे आणखी काही मार्ग त्या संस्थेसाठी खुले होतील. चांगले काम करणाऱ्या जास्तीत जास्त संस्था लोकांना माहिती व्हाव्यात, त्यांच्या कार्याला समाजाचा हातभार लागावा आणि त्यातूनच या सर्वांची साखळी जोडली जावी, असा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. सोशल मीडियावर #पुलसुनीत याचाही वापरही करण्याचे सुचविण्यात आले आहे. या उपक्रमाला स्थळ-काळाच्या मर्यादा नाहीत. रत्नागिरीत सात ते नऊ डिसेंबर २०१८ या कालावधीत होणाऱ्या ‘पुलोत्सवा’च्या देणगी प्रवेशिकांच्या विक्रीतून येणारी रक्कमही ‘पुलसुनीत’ या उपक्रमालाच दिली जाणार आहे.

‘पुलसुनीत’च्या फेसबुक पेजवर मांडलेली उपक्रमामागची भूमिका :
आपण आपल्या माणसाची आठवण म्हणून, त्यांच्या चांगुलपणाच्या अभिव्यक्तीला दाद म्हणून, त्यांच्या दानयज्ञाला मानवंदना म्हणून त्यांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये आपल्या सभोवताली असलेल्या एका चांगल्या समाजसेवी संस्थेला यथाशक्ती पाठबळ देऊ या. आपण आपल्या जीवनात ही सामाजिक जाणीव जपत असालच. अशी देणगी किंवा आर्थिक पाठबळ देताना प्रसिद्धीपासून लांबही राहत असाल; पण आम्ही तुमचे आणि संस्थेचे नाव जाहीर करण्याची विनंती करतोय, ती कोणा व्यक्तीच्या प्रसिद्धीसाठी नसून, चांगले काम करणारी एक स्वयंसेवी संस्था प्रकाशात येण्यासाठी आहे. आज अनेकांना चांगल्या कामामध्ये आपला वाटा उचलायचा आहे; पण अनेकदा चांगले आणि स्वच्छ काम करणाऱ्या संस्था नजरेसमोर येत नाहीत. अशा चांगल्या संस्था या उपक्रमातून समोर येतील. त्यामुळे दर वर्षी आपल्याकडून उचलल्या जाणाऱ्या खारीच्या वाट्यामध्ये हा एक जास्तीचा वाटा ‘पुलं’च्या नावाने उचला आणि तो ही एका संस्थात्मक काम करणाऱ्या मंडळींना मदत करून. यातून जर मंडळी जोडली गेली, तर जगभर पसरलेल्या मराठी माणसांना जोडणारी साखळी पुन्हा एकदा ‘पुलं’मुळेच निर्माण होईल आणि त्यातून जगभर चालू असलेल्या अनेक सामाजिक संस्थांची माहिती सर्वत्र होईल.... अगदी तशीच, ज्याप्रमाणे ‘पुलं’मुळे आनंदवन किंवा मुक्तांगण यांसारख्या संस्था महाराष्ट्राच्या परिचयाच्या झाल्या.

फेसबुक पेजची लिंक : https://www.facebook.com/pulasunit
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search