Next
गणपतीच्या स्वागताची शिस्तबद्ध मिरवणूक
BOI
Tuesday, September 11, 2018 | 03:40 PM
15 0 0
Share this article:

मिरवणुकीचे संग्रहित छायाचित्र

रत्नागिरी :
अलीकडे उत्सवांमध्ये थिल्लरपणाचे प्रमाण वाढत चाललेले असताना रत्नागिरी शहराजवळील कर्ले-आंबेशेत गावातील मिरवणुकीने मात्र जाणीवपूर्वक परंपरा जपून ठेवली आहे. गावातील घरगुती गणपतींची आगमन मिरवणूक १३ सप्टेंबरला दर वर्षीप्रमाणेच दिमाखदार पद्धतीने काढण्यात येणार आहे. मिरवणुकीत कोणतेही हिडीस नृत्य, धिंगाणा याला स्थान नसते. केवळ उत्साह आणि शिस्तीचे प्रदर्शन व खेळीमेळीचे वातावरण त्यात असते. गेली ३३ वर्षे अशा प्रकारे ही मिरवणूक जल्लोषात काढली जात आहे. विसर्जनाच्या मिरवणुका अनेक ठिकाणी असतात; पण गणेश आगमनाची ही मिरवणूक वैशिष्ट्यपूर्ण म्हणावी लागेल.

शिस्तबद्ध मिरवणूक सकाळी साडेनऊ वाजता रत्नागिरी शहरातील लक्ष्मी चौकातील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून सुरू होईल. ही मिरवणूक सुमारे पाच ते सहा तास रंगते. दुपारी साडेतीन वाजता ती कर्ले, आंबेशेत येथे पोहोचेल.

मिरवणुकीचे संग्रहित छायाचित्र

या मिरवणुकीमध्ये सुमारे १०० ते १२५ लहान-मोठ्या गणेश मूर्ती घेऊन भाविक विविध वाहनांवरून सहभागी होतात. ढोल-ताशे, झांजपथक, बागलकोटचे बँडपथक, ढोलपथके यात सहभागी होतात. या वेळी शहीदांना श्रद्धांजली वाहिली जाणार असून, स्वच्छता अभियान, प्लास्टिक बंदी यांबद्दल जागृती केली जाणार आहे. 

या मिरवणुकीचा पाया शाहीर (कै.) मधुकर (आप्पा) सुर्वे यांच्या शिस्तबद्ध नेतृत्वाखाली रचला गेला. सुर्वे सरांच्या निधनानंतर मिरवणूक समितीचे नूतन अध्यक्ष महेंद्र सुर्वे अणि माजी अध्यक्ष जयसिंगराव घोसाळे यांच्या नेतृत्वाखाली व कार्यकारी मंडळ समिती उपाध्यक्ष, सेक्रेटरी, सदस्य आणि दक्षता समिती सदस्य, सहकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ ही भव्यदिव्य लोकप्रिय व शिस्तबद्ध मिरवणूक साकारत आहेत.

या मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे दर वर्षी या मिरवणुकीमध्ये नावीन्य असते. रत्नागिरीतील नागरिक, चाकरमानी दुतर्फा गर्दी करून आपल्या सहकाऱ्यांना, मुलांना ही मिरवणूक पाहायला आवर्जून आणतात. एवढी मोठी मिरवणूक असूनसुद्धा अतिशय नीटनेटके, शिस्तबद्ध आयोजन हे वैशिष्ट्य जपले जाते.

(‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील गणेशोत्सवाच्या विशेष बातम्या व लेख https://goo.gl/X8v1iW या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search