Next
डॉ. सुयश शिंदे यांच्या लघुचित्रपटाला अनेक पुरस्कार
प्रेस रिलीज
Tuesday, May 22 | 05:01 PM
15 0 0
Share this story

दिग्दर्शक डॉ. सुयश शिंदे

पुणे : प्रतिकूल परिस्थितीमध्ये पापमार्गाने न जाता;सद्सद्विवेकबुद्धीला साद घातली, तर जगण्याचा नवा पर्याय उपलब्ध होऊ शकतो असा संदेश देणाऱ्या ‘मयत’ या लघुपटाने राष्ट्रीय पुरस्कारासह अनेक पुरस्कार पटकावले आहेत. डॉ. सुयश शिंदे  दिग्दर्शित या लघुपटाने ६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट लघुपटाचा मान पटकावला, तर  जयपूर फिल्म फेस्टिवलमध्ये  इंटरनॅशनल पॅनोरमा विभागात सादर होणाऱ्या चित्रपटांमध्ये  त्याला  सर्वोत्कृष्ट स्क्रिप्टचे पारितोषिक प्राप्त झाले. 
 
ही कथा आहे एका खेड्यात मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या नामदेव याची. मोलमजुरी करण्यासाठी अनेक ठिकाणी चकरा मारूनही त्याला काम मिळतनाही. घरात खायला अन्नाचा कण नाही. अशा परिस्थितीत त्याला मयताच्या अंत्ययात्रेच्यावेळी टाकण्यात येणारे पैसे गोळा करण्यातून उदरनिर्वाहाचे साधन प्राप्त होते. अशी वेगळे कथाबीज घेऊन डॉ. सुयश शिंदे यांनी ही कथा पडद्यावर फुलवली आहे. 
 
या लघुपटाबद्दल बोलताना डॉ. सुयश शिंदे म्हणाले, ‘मयत’ लघुपट हा पूर्णपणे व्यावसायिक सेटअप वापरून तयार केलेला आहे. जवळपास दीड वर्षांपासून यावर काम सुरू  होते. सर्वसाधारणपणे कोणताही लघुचित्रपट तत्कालीन समस्येवर सामाजिक संदेश देतो. त्यामधून लोकजागृती करणे हा उद्देश असतो,मात्र या संकल्पनेला छेद देत मी प्रेक्षकांना माझ्या चित्रपटातून तात्विक संदेश देण्याचे ठरवले. त्यामुळे ‘मयत’ हा लघुपट प्रेक्षकांना अंतर्मुख करून जगण्याचे तत्वज्ञान देण्याचा प्रयत्न करतो. 

याच्या स्क्रिप्टवर पाच-सहा महिने काम चालू होते. या लघुचित्रपटाच्या लोकेशनसाठी सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी प्रवास करून चित्रपटाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारी लोकेशन निवडण्यात आली. कॅमेरामन गिरीश जांभळीकर यांनी प्रत्येक लोकेशनला आपल्या फ्रेममध्ये सुंदर रीतीने दाखवल्यामुळे छायाचित्रणातूनही लघुपट व्यक्त होतो. इतर तांत्रिक बाजूसंभाळणाऱ्यांमध्ये विपुल कदम (संकलन), सायली कुलकर्णी (ध्वनी), संगीत (गंधार) यांच्या कामगिरीने चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवतो.  या लघुपटाचे सलग सहा दिवस चित्रीकरण सुरु होते. चित्रीकरणासाठी स्थानिक गावकऱ्यांनी देखील खूप सहकार्य केले. त्यानंतर पोस्ट प्रॉडक्शनसाठी   तीन ते चार महिने लागले.  सगळ्या टीमने केलेल्या कष्टाचे फळ मिळाले.’  

 कैलास वाघमारे यांनी नामदेवची भूमिका  जिवंत केली आहे. मीनाक्षी राठोड यांनी त्याच्या पत्नीची भूमिका समरसून केली आहे. इतर भूमिकांमध्ये नामदेवची मुलगी (सुरभी) आणि अन्य कलाकारांनी उत्तम साथ दिली आहे.  
 
राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केलेल्या दिग्दर्शक डॉ. सुयश शिंदे यांचा हा सलग तिसरा लघुचित्रपट आहे. यापूर्वी २०१६ मध्ये स्वच्छ भारत फिल्म फेस्टिवलमध्ये देशभरातून तीन  मिनिटांचे लघुचित्रपट मागविण्यात आले होते. त्यात चार हजार ५००  चित्रपटांमधून डॉ. शिंदे यांनी तयार केलेल्या ‘शेल्फी’ या लघुचित्रपटाला तिसरा क्रमांक मिळाला होता. त्यांच्या ‘अजान’ लघुचित्रपटाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले होते.  

डॉ. सुयश शिंदे हे व्यवसायाने दंतवैद्य असून, ते मूळचे सातारा जिल्ह्याच्या कोरेगाव तालुक्यातील चौधरवाडी गावचे आहेत. त्यांना अभिनय आणि दिग्दर्शनाची आवड असून, पुण्यात वैद्यकीय शिक्षणासाठी महाविद्यालयात असताना पुरुषोत्तम करंडक, सकाळ करंडक अशा एकांकिका स्पर्धेतून त्यांनी भाग घेतला आहे.  ‘देऊळ’  चित्रपटासाठी त्यांनी दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांच्याबरोबर काम केले आहे. आगामी काळात एक डार्क कॉमेडी  लघुचित्रपट बनविण्याचा डॉ. शिंदे यांचा मानस आहे.  
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link