ग्रेस, जगदीश खेबूडकर, वि. सी. गुर्जर, नारायण सावरकर
BOI
Thursday, May 10, 2018 | 03:45 AM
1500
Share this story
‘माय डीअर रीडर, यू आर नॉट अलोन व्हाइल रीडिंग माय पोएट्री, माय लोनलीनेस इज विथ यू!,’ असं म्हणणारे कवी ग्रेस, एकाहून एक सरस आणि लोकप्रिय मराठी चित्रपटगीतं लिहिणारे जगदीश खेबूडकर, कथाकार वि. सी. गुर्जर आणि चरित्रकार नारायण सावरकर यांचा दहा मे हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा परिचय...
........
माणिक सीताराम गोडघाटे
दहा मे १९३७ रोजी नागपूरमध्ये जन्मलेले माणिक सीताराम गोडघाटे ऊर्फ ‘ग्रेस’ हे बेभान आणि मुक्तपणे आपल्या भावना काव्यातून व्यक्त करणारे कलंदर कवी! एकाहून एक विलक्षण शब्दकळा त्यांच्या लेखणीतून सहज उतरत असतात. त्यांच्या काव्यप्रतिमा बऱ्याच अंशी दुर्बोध असल्याचा आरोप नेहमीच होत आलाय. कारण त्यांच्या कविता वाचल्यावर अर्थबोधाचं आव्हान जाणवतं. असं असूनही हृदयनाथ मंगेशकर आणि श्रीधर फडके यांच्यासारख्या संगीतकारांनी त्यांच्या कवितांना अवीट, गोड चाली बांधून त्या रसिकांपर्यंत पोहोचवल्याने त्यांच्या कविता विलक्षण लोकप्रियही झाल्या आहेत.
त्यांच्या कविता रोमँटिक, तरीही रसग्रहण करणं कठीणच! त्यांच्याविषयी आणि त्यांच्या कवितांमधून दिसणाऱ्या अनवट अभिव्यक्तीविषयी बोलताना अनेक मान्यवरांनी ‘मंत्रकविता,’ ‘मॅजिक पोएट्री’, ‘ग्रेसची भूल’, ‘इंद्रजाल’, ‘मायानगरीचा पाहुणा’, ‘ग्रेस नावाचं गारूड’ अशा प्रकारचे शब्द वापरले होते.
त्यांच्या अलौकिक शब्दकळेची काही उदाहरणे -
‘कधी वृक्ष ढळती कधी वृक्ष गळती
नदीच्या तीराला जडे खिन्नता
तुझा नेत्रप्रारंभ भंगून प्यावा
जशी मृत्यूला ये निळी मंदता
मला हात नाही जशा बाभळीना
नसाव्या फुलांच्या कधी ओंजळी
दिठीच्या तळातील कारुण्य माझे
जळे देह त्याची गळे सावली..... ’
किंवा -
‘तुझी पावले गे धुक्याच्या महालात
ना वाजली ना कधी नादली
निळागर्द भासे नभाचा किनारा
न माझी मला अन् तुला सावली...
मनावेगळी लाट व्यापे मनाला
जसा डोंगरी चंद्र हा मावळे
पुढे का उभी तू, तुझे दु:ख झरते?
जसे संचिताचे ऋतू कोवळे... ’
चंद्रमाधवीचे प्रदेश, राजपुत्र आणि डार्लिंग, सांध्यपर्वातील वैष्णवी, बाई! जोगियापुरुष, संध्याकाळच्या कविता, सांजभयाच्या साजणी, सारंगसुधा, असे त्यांचे कवितासंग्रह लोकप्रिय आहेत.
त्यांच्या काव्याइतकंच त्यांचं ललितलेखनसुद्धा वाचकाची मती गुंग करणारं! ‘वाऱ्याने हलते रान’ या त्यांच्या ललितबंधाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. कावळे उडाले स्वामी, मितवा, मृगजळाचे बांधकाम, ओल्या वेळूची बासरी, संध्यामग्न पुरुषाची लक्षणे, चर्चबेल, असं त्यांचं गद्यलेखन वाचकप्रिय आहे.
घर थकलेले संन्यासी, ती गेली तेव्हा रिमझिम, तुला पाहिले मी नदीच्या किनारी, पाऊस कधीचा पडतो, भय इथे संपत नाही, अशा त्यांच्या कवितांना हृदयनाथ मंगेशकर आणि श्रीधर फडक्यांच्या चालींनी लोकप्रियता लाभली आहे. त्यांना जी. ए. कुलकर्णी सन्मान, नागभूषण पुरस्कार, महाराष्ट्र शासन उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती पुरस्कार, विदर्भ गौरव पुरस्कार, असे अनेकविध पुरस्कार मिळाले होते. २६ मार्च २०१२ रोजी त्यांचं पुण्यात निधन झालं.
(ग्रेस यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा. ग्रेस यांच्याबद्दलचे ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील साहित्य वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
......
जगदीश खेबूडकर
दहा मे १९३२ रोजी कोल्हापुरात जन्मलेले जगदीश खेबूडकर हे अत्यंत लोकप्रिय मराठी गीतकार म्हणून ओळखले जातात. गांधीजींच्या खुनानंतर त्यांचं घर जाळलं गेलं, तेव्हा त्या राखेच्या ढिगाऱ्याकडे पाहून त्यांनी ‘मानवते तू विधवा झालीस’हे काव्य रचून आपल्या प्रतिभेची चुणूक किशोर वयात दाखवून दिली होती. चित्रपटगीते या प्रकारात हातखंडा असणाऱ्या खेबूडकरांनी पोवाडा, अभंग, ओवी अशा सर्वच प्रकारात आपली प्रतिभा सिद्ध केली होती.
धुंद आज डोळे, धुंद एकांत हा, धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना, धुंदीत गाऊ मस्तीत राहू, नाच गं घुमा कशी मी नाचू, कंबर लचकली, निसर्गराजा ऐक सांगते, निळे गगन निळी धरा, पिकल्या पानाचा देठ, प्रभू सोमनाथा, प्रेमाला उपमा नाही, बाई बाई मन मोराचा, बिब्बं घ्या बिब्बं शिक्कंकाई, ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर, मला इष्काचि इंगळी डसली, मला लागली कुणाची उचकी, मला हे दत्तगुरू दिसले, मला हो म्हनत्यात लवंगी मिरची, मी आज फूल झाले, मी जलवंती मी फुलवंती, या रावजी बसा भावजी, राजा ललकारी अशी रे, रुणझुणत्या पाखरा, वारा गाई गाणे, विठू माऊली तू माऊली जगाची, शुभंकरोति म्हणा मुलांनो, सख्या रे घायाळ मी हरिणी, सत्यम शिवम सुंदरा, स्वप्नांत रंगले मी, स्वप्नात साजणा येशील का, हलके हलके जोजवा, हवास मज तू हवास तू, हिरवा निसर्ग हा भवतीने, ही कशानं धुंदी आली, अगं नाच नाच राधे, अरे मनमोहना, आकाशी झेप घे रे पाखरा, आज प्रीतिला पंख हे लाभले रे, आली ठुमकत नार लचकत, एक लाजरा न् साजरा, एकतारीसंगे एकरूप झालो, ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे, कशी नशिबानं थट्टा आज मांडली, कसं काय पाटील बरं हाय का?, किती सांगू मी सांगू कुणाला, कुठं कुठं जायचं हनिमूनला, कुण्या गावाचं आलं पाखरू, कोण होतीस तू काय झालीस तू, चंद्र आहे साक्षिला, छबीदार छबी मी तोऱ्यात उभी, तुम्हांवर केली मी मर्जी, दाम करी काम येड्या, दिसला गं बाई दिसला, दे रे कान्हा चोळी अन् लुगडी, देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, अशी त्यांची कित्येक गाणी आजही लोकांच्या ओठांवर असतात.
त्यांना महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार, गदिमा पुरस्कार, फाय फाउंडेशन पुरस्कार, व्ही. शांताराम पुरस्कार, शाहू पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. तीन मे २०११ रोजी त्यांचं कोल्हापूरमध्ये निधन झालं.
(जगदीश खेबूडकर यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)
........
विठ्ठल सीताराम गुर्जर
दहा मे १८८५ रोजी रत्नागिरीमध्ये जन्मलेले विठ्ठल सीताराम गुर्जर हे कथाकार आणि कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी ३००हून अधिक कथा, दहाहून जास्त नाटकं लिहिली होती. मासिक मनोरंजन, विविधवृत्त यांसारख्या नियतकालिकांतून त्यांनी कथा लिहिल्या.
जीवनसंध्या, पौर्णिमेचा चंद्र, स्वप्नभंग, नागमोड, देवदास, चरित्रहीन, संगम हे त्यांनी केलेले बंगाली कादंबऱ्यांचे अनुवादही गाजले होते. गडकऱ्यांच्या ‘एकच प्याला’ या नाटकासाठी त्यांनी लिहिलेली पदं लोकप्रिय झाली होती. १९ सप्टेंबर १९६२ रोजी त्यांचा मृत्यू झाला.
........
नारायण दामोदर सावरकर
दहा मे १८८९ रोजी जन्मलेले नारायण दामोदर सावरकर हे कादंबरीकार आणि चरित्रकार म्हणून ओळखले जातात. हिंदूंचा विश्वविजयी इतिहास, जाईचा मंडप, मरण की लग्न, सेनापती तात्या टोपे, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. १४ ऑक्टोबर १९४९ रोजी त्यांचा मृत्यू झाला.
(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)