Next
पुण्यात टेनएक्स ट्रू रायडर्स हेल्मेट राइडला उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रेस रिलीज
Tuesday, January 15, 2019 | 04:00 PM
15 0 0
Share this article:पुणे : झेनेक्स इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड व पुणे वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आणि प्रिमियर ग्रुप, रोटरी क्लब ऑफ आकुर्डी आणि संचेती हॉस्पिटल यांच्या सहयोगाने आयोजित टेनएक्स ट्रू रायडर्स हेल्मेट राइडला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रस्ता सुरक्षा आणि हेल्मेटचा वापर याबद्दल जनजागृती करण्याच्या हेतूने या राइडचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी दीड हजारांहून अधिक नागरिकांनी यात सहभाग नोंदविला. यामध्ये संचेती हॉस्पिटलचे १००हून डॉक्टर्स सहभागी झाले होते. ही राइड सीझन्स मॉल, मगरपट्टा, गोळीबार मैदान, एमजी रोड, सणस ग्राउंड, स्वारगेट, डीपी रोड कोथरूड, बालेवाडी आणि ऑटो क्लस्टर, चिंचवड या वेगवेगळ्या सहा ठिकाणांवरून सुरू होऊन शिवाजीनगर येथील पोलिस परेड ग्राउंड येथे संपली. या प्रसंगी पुणे पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटशम, झेनेक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुज गुप्ता, डीसीपी ट्रॅफिक पोलिस तेजस्वी सातपुते, संचेती हॉस्पिटलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. पराग संचेती, सहाय्यक पोलिस आयुक्त एसीपी नीलिमा जाधव, सहाय्यक पोलिस आयुक्त राजेंद्र सावंत, रोटरी क्लब ऑफ आकुर्डीचे अध्यक्ष गणेश जामगावकर आणि आरजे बंड्या आदी मान्यवर उपस्थित होते.वाहतूक शाखेच्या डीसीपी सातपुते म्हणाल्या, ‘जीवाला धोकादायक ठरू शकतात, असे दहा विविध प्रकारचे वाहतूक नियम उल्लंघन असतात. त्यामध्ये मद्यपान करून गाडी चालविणे, ट्रीपल सीट चालवणे, हेल्मेट व सीटबेल्ट वापर न करणे, सिग्नल तोडणे अशा नियम उल्लंघनांचा समावेश आहे. आजची हेल्मेट राइड याबाबत जागृती करण्यासाठी होती. हेल्मेटबाबतचा कायदा हा आधीपासून होता व त्याची अंमलबजावणीदेखील होत होती. या वर्षी आम्ही अधिक जागरूकता निर्माण करून ही अंमलबजावणी अधिक तीव्र करीत आहोत.’

संचेती हॉस्पिटलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संचेती म्हणाले, ‘काही दिवसांपूर्वी पोलिस आयुक्त संचेती हॉस्पिटलमध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी ते म्हणाले की आचार आणि विचार यामध्ये फरक नको. आता विचार आहेत, तर ते आचरणात आणणे ही जबाबदारी आपल्या सर्व नागरिकांची आहे. हेल्मेट घातल्यावर नीट दिसत नाही किंवा ऐकू येत नाही, अशी छोटी कारणे देऊन पुण्यात हेल्मेटची गरज नाही, असे विधान करतात; मात्र या गैरसोयीपेक्षा हेल्मेटमुळे मिळणारी सुरक्षा आणि मेंदूला मार लागण्याची जोखीम कमी होणे जास्त महत्त्वाचे आहे. दररोज आमच्या आपातकालीन विभागात २५ रुग्ण दाखल होतात, त्यापैकी सात ते आठ हे दुचाकी अपघातातील असतात. त्यापैकी एक, दोन रुग्णांना मेंदूला गंभीर दुखापत झालेली असते. अशा अपघातांचा परिणाम फक्त रुग्णावर नव्हे, तर त्यांच्या कुटुंबीयांवरदेखील होतो.’

‘झेनेक्स’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुज गुप्ता म्हणाले, ‘हेल्मेटच्या वापराबाबत जागृती निर्माण करणे हा या उपक्रमाचा हेतू होता. आम्ही सातत्याने हा उपक्रम सुरू ठेवू ज्यामुळे अधिक जागृती होईल. यावर्षी दीड हजारांहून अधिक लोकांनी सहभाग घेतला. पुढील वर्षी हा आकडा पाच हजारांपर्यंत जाईल, असा मला विश्‍वास आहे.’

रोटरी क्लब ऑफ आकुर्डीचे अध्यक्ष जामगावकर म्हणाले, ‘हेल्मेटला होणारा विरोध हा आश्‍चर्यकारक आहे. त्यामुळेच याबाबत अधिक जागरूकता निर्माण झाली पाहिजे. ‘झेनेक्स’ने हाती घेतलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search