Next
जो यंत्रावरी विसंबला..!
BOI
Monday, August 05, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

‘गुगल ट्रान्सलेट’चा नको तिथे आणि अतिरेकी वापर केला, तर काय घडू शकते, याचा प्रत्यय देणाऱ्या दोन घटना गेल्या आठवड्यात घडल्या आणि त्यांचे पडसाद संसदेत आणि समाजमाध्यमांवर उमटले. कोणत्या होत्या त्या दोन घटना?
...............
यंत्रे ही मानवाच्या सोयीसाठी आहेत. त्यांच्यावर विसंबून राहून आपले कार्य करू पाहणारी व्यक्ती कधी ना कधी गोत्यात येणारच. भाषा असो वा व्यवहार, त्यात मानवी स्पर्श महत्त्वाचाच आहे, हे दाखवून देणाऱ्या दोन घटना गेल्या आठवड्यात घडल्या. यातील एका घटनेचे पडसाद थेट संसदेत उमटले, तर दुसरीचे समाजमाध्यमांत. 

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षांमध्ये इंग्रजीच्या प्रश्नांचा अनुवाद ‘गुगल ट्रान्सलेट’च्या माध्यमातून केला जात आहे. आता गुगल ट्रान्सलेट ही बॉट म्हणजे यंत्राच्या आधारे काम करणारी प्रणाली आहे. ही यंत्रे आपल्या मगदुराप्रमाणेच काम करणार. त्यामुळे या प्रणालीच्या माध्यमातून बाहेर पडलेला अनुवाद हिंदीच्या विद्वानांनाही समजत नाही, तेथे विद्यार्थ्यांना काय समजणार? भारतीय जनता पक्षाचे खासदार हरनाथ सिंह यादव यांनी हा मुद्दा गेल्या आठवड्यात लोकसभेत उपस्थित केला. ‘यूपीएससी’च्या परीक्षेतील गुगलच्या या विचित्र अनुवादाबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. 

त्या वेळी त्यांनी ‘स्टील प्लांट’ या शब्दाचे एक उदाहरण दिले. स्टीलचा प्रकल्प असा या शब्दाचा अर्थ; मात्र गुगलच्या प्रणालीने त्याचे रूपांतर ‘इस्पात का पौधा’ असे केले. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी जगभरात जिथे जातात तिथे इंग्रजीत बोलतात, त्या वेळी भारतीयांची छाती फुलून येते; मात्र देशात हिंदी आणि सर्व भारतीय भाषा केवळ मूठभर लोकांच्या हातात एकवटल्या आहेत. सी-सॅट परीक्षांमुळे हिंदी माध्यमाचे विद्यार्थी आता ‘यूपीएससी’च्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होण्याचे प्रमाण कमी होऊ लागले आहे,’ असे यादव म्हणाले.

याचे कारण म्हणजे या परीक्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका इंग्रजीत असतात आणि अन्य भाषांमध्ये त्यांचे अनुवाद केले जातात. हे अनुवाद चुकीचे येतात. कारण ते ‘गुगल ट्रान्सलेट’ने केलेले असतात. ‘यूपीएससी’ने अनुवादासाठी ‘कमिशन फॉर सायंटिफिक अँड टेक्निकल टर्मिनॉलॉजी’ची (सीसॅट) शब्दावली स्वीकारली आहे. 

सी-सॅट परीक्षांमुळे २०१८मध्ये हिंदी माध्यमाचे केवळ २.७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकले. म्हणजेच १२२२ विद्यार्थ्यांपैकी हिंदी माध्यमाचे केवळ १२६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. अन्य भाषक माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी तर हे प्रमाण अत्यंत कमी आहे. कारण या भाषांतील केवळ २७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यापूर्वी २० टक्के विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकत असत. 

यूपीएससी परीक्षेतील इंग्रजी व अन्य भाषांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये विसंगती असल्याचा मुद्दा २०१४ साली पहिल्यांदा पुढे आला होता. त्या वेळी इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकांचा हिंदीत अनुवाद करण्याची पद्धत ‘यूपीएससी’ने संकेतस्थळावर जाहीर केली होती; मात्र ही पद्धत पाळली जात नसल्याचे या निमित्ताने पुढे आले. या परीक्षांच्या माध्यमातून आयएएस, आयपीएस आणि आयएफएस अधिकाऱ्यांची निवड केली जाते. हेच लोक देशाची धोरणे ठरवतात आणि पुढच्या अधिकाऱ्यांच्या निवडीची पद्धतही तेच ठरवतात. त्यामुळे त्यांच्या विचारप्रक्रियेवर इंग्रजीचा पगडा बसला असल्यास नवल नाही. यादव यांनी देशाच्या भाषांची मालकी मूठभरांच्या हातात एकवटल्याचे जे म्हटले आहे ते या अर्थाने. 

दुसरे उदाहरण देशाच्या दुसऱ्या टोकाला, केरळमध्ये घडले. तिथे एका महिला आमदाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून लिहिलेले पत्र सोशल मीडियात चर्चेला कारण ठरले. यू. प्रतिभा नावाच्या या आमदार वकील असून, कायद्याच्या पदवीधर (एलएलबी) आहेत. त्यामुळे तर त्यांच्या भाषिक कौशल्याची जास्तच खिल्ली उडवली गेली. त्या कायमकुळम येथील आमदार आहेत.  ‘Sir you are the Prime Minister of the most celebrated democracy in the world where the citizens lived. Like brothers and sisters...’ या थाटाची अनेक वाक्ये त्यात आहेत. इंग्रजीतील विरामचिन्हे, मोठ्या व छोट्या अक्षरांचे नियम इत्यादी सर्वांना त्यात धाब्यावर बसविले आहे. जे पत्र जाहीर झाले आहे ते इंग्रजीत आहे; मात्र ते मूळ मल्याळममध्ये लिहिलेले असावे, हे ते वाचल्यावर कळते. 

या सगळ्या गफलतींचे मूळ मशीन ट्रान्सलेशनमध्ये (यांत्रिक भाषांतर) आहे. ही इंटरनेटने दिलेली देणगी आहे; मात्र तिचा अतिवापर करून त्या देणगीची रया घालवली जात आहे. शब्दांचे संदर्भ, वाक्प्रयोगातील खाचाखोचा आणि गर्भित अर्थ समजून घेण्याचे सामर्थ्य माणसांमध्येच असते. 

‘उदीरितोऽर्थः पशुनापि गृह्यते हयाश्च नागाश्च वहन्ति चोदिताः।
अनूक्तमप्यूहति पण्डितो जनः परेङ्गितज्ञानफला हि बुद्धयः।।’ 

असे संस्कृत सुभाषित आहे. बुद्धी नसलेले पशूसुद्धा इशारा दिल्यावर मालकाच्या मनातील गोष्ट समजतात. चाबूक मारल्यावर घोडे आणि अंकुशाचा मार बसल्यावर हत्तीसुद्धा ओझी वाहतात; मात्र दुसऱ्याने न उच्चारलेले परंतु त्याच्या मनात असलेले भाव ओळखण्याची कला बुद्धिमान मनुष्यातच असते, हा या सुभाषिताचा अर्थ. ही क्षमता आज तरी यंत्रांत नाही. 

म्हणूनच याहू या संकेतस्थळाने जेव्हा अशीच भाषांतराची सेवा पहिल्यांदा सादर केली, तेव्हा त्यात मशीन ट्रान्सलेशन आणि ह्यूमन ट्रान्सलेशन (मानवी अनुवाद) असा स्पष्ट फरक केलेला होता. वापरकर्त्याला आपल्या गरजेप्रमाणे पर्याय निवडण्याची संधी होती आणि मानवी अनुवादासाठी शुल्कही ठेवले होते; मात्र गुगलने आपल्या विस्ताराच्या ज्या योजना आखल्या, त्यात लोकांना अधिकाधिक मोफत सेवा देणे, हा मुख्य भाग होता. त्यामुळे गुगल ट्रान्सलेट सेवाही मोफत ठेवण्यात आली. ही सेवा मोफत आहे याचा अर्थ ती उत्कृष्ट आहे किंवा विश्वासार्ह आहे, असा होत नाही. ‘ऊस गोड लागला म्हणून काय मुळापासून खावा,’ हा एकनाथांनी विचारलेला प्रश्न येथेही लागू होतो. ही सेवा उपलब्ध आहे, याचा अर्थ सारासार विचार न करता तिचा वापर करावा हा वैचारिक आळशीपणा झाला. 

अर्थात नोकरशहा आणि राजकारण्यांना हा आळशीपणा परवडण्यासारखा आहे. परंतु ज्यांना भाषेचा, शब्दाचा आणि मुख्य म्हणजे अर्थाचा कळवळा आहे, त्यांनी तरी तो मार्ग चोखाळू नये, हे उत्तम. ‘दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला,’ असे समर्थ रामदासांनी तीन शतकांपूर्वी सांगितले. त्या इतरांची जागा आता यंत्रांनी घेतली आहे; पण म्हणून विसंबण्याची वृत्ती गेली नाही.  त्यामुळे तो सावधानतेचा सल्ला आजही तितकाच लागू होतो. काळानुसार त्यात ‘जो यंत्रावरी विसंबला...’ असा बदल झाला इतकेच! 

– देविदास देशपांडे
ई-मेल : devidas@dididchyaduniyet.com

(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक आहेत. ‘बाइट्स ऑफ इंडियावरील त्यांचे सर्व लेख https://goo.gl/wvsqQ8 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search